अनैतिक अंतिम भाग

स्वतःसाठी जगणाऱ्या एका स्त्रीची गोष्ट Story Of Immoral Love Relationship
अनैतिक अंतिम भाग


मधुली परत सासरी गेली नाही. तिच्या सासरच्या लोकांनीही तिला घरी बोलावलं नाही. बायको घरी नाही आणि आई वडिलांची साथ ही नाही म्हणून अमितही दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला. अमितचं हे असं प्रतारणा करणं, स्वतःच्याच मैत्रिणीने आपल्या, घरात संसारात अशी आग लावणं मधुलीला सहन करणं जड जात होतं. तिचं मन स्वतःलाच खूप खायचं. एकट्यात बसून ती शून्यात बघत राही. स्वतःलाच दोष देऊन, स्वतःची चिडचिड ती मुलांवर काढायची. एकट्यात बसून, रडून, रडून तिचे डोळे सुजायचे, रात्र रात्र तीला झोप यायची नाही. दिवस दिवस ती जेवतही नसे. असेच काही दिवस गेल्यानंतर नोकरीवरून परत येताना तिचा एक छोटासा अपघात झाला. त्यावेळी तिला योगायोगाने अमितच्या जुन्या सहकार्याने इस्पितळात नेलं, दोन दिवस ती इस्पितळात होती, तेव्हा त्याने तिची देखभाल केली, तिच्यासाठी औषधं, फळं आणली. लग्न झाल्यावर तिला जो मानसिक, भावनिक आधार अमित कडून अपेक्षित होता, तो अनपेक्षितपणे तिला अमितच्या जुन्या सहकार्याकडून, त्या दोन दिवसात मिळाला. मधुलीच्या मनाने उभारी घ्यावी, तिच्या मनाला बरं वाटावं, म्हणून तो सहकारी तिच्याशी बऱ्याचदा बोले, अधून मधून त्याचं मधुलीच्या घरी येणं जाणंही वाढलं. मधुलीच्या मुलांनी तो कधी मैत्रीच्या नात्याने, तर कधी प्रेमाने वागवे. मुलांनाही त्याच्या सहवासात बरं वाटे.

खरंतर अमितच्या या सहकार्याची बायको प्रचंड संशयी स्वभावाची असल्यानं त्यालाही वैवाहिक सुख असं नव्हतंच. दैवयोगानं म्हणा किंवा नियतीचा नियम म्हणा, मधुली आणि अमितचा सहकारी ‘अजय’ अगदी अनपेक्षित रित्या जवळ आले.

त्यांची ही जवळीक सुरुवातीला भावनिक होती. पण हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि मग एकत्र येण्यात झालं.

मधुलीला अजय हवा होता पण त्याचा संसार, मुलंबाळं असल्याने, त्याने कधीच कुठलही खोटं वचन मधुलीला दिलं नाही, मधुली त्याला अनेकदा घरी बोलावी पण त्याने कधीच मिळालेल्या संधीचा गैरफायदा घेतला नाही. त्यानं मधुलीला हर प्रकारे समजून सांगितलं, तिने दुसरं लग्न करावं असंही सुचवून पाहिलं पण मधुलीचा आता वैवाहिक आयुष्यावर विश्वास उरला नव्हता.

अमितने अनेक वेळा मधुलीची माफी मागितली. तिच्या हातापाया पडून त्याने कसातरी एकदाचा तिच्या घरात प्रवेश मिळवला, पण मधुलीच्या मनात मात्र त्याला प्रवेश करता आला नाही. मधुली त्याला जवळ येऊ देत नव्हती म्हणून तो उगाच तिच्याशी भांडणाचा प्रयत्न करे, पण मधुलीही त्याला सडेतोड उत्तर देई.

अजय बद्दल मधुलीला प्रेम वाटत होतं, तिचं अजयला केवळ एकच म्हणणं होतं,”मला माझं आयुष्य आनंदानं आणि भरभरून जगायचं आहे. किती दिवस मी स्वतःच्या मनाला आणि इच्छांना आवर घालू? माझ्या नवऱ्यानं हेतूपुरस्सर माझी प्रतारणा केली, माझा विश्वासघात केला, आणि मी पण काही सती सावित्री नाही. मला माझ्या शारीरिक, भावनिक गरजा पूर्ण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. माझा नवरा माझ्या मुलांचा आता केवळ बाप आहे, पण तो माझा जोडीदार होऊ शकत नाही. मी स्वतःला तुझ्यात गुंतवणं थांबवू शकत नाही आणि आता ते मला शक्यही नाही. मला माहिती आहे आपल्या दोघांच्या काही संसारिक जबाबदाऱ्या आहेत, आपल्या दोघांवर सामाजिक बंधनही आहेत, सध्या आपण आपल्या नात्याला कुठलंही नाव देऊ शकत नाही. पण माझी एवढीच इच्छा आहे की हे नातं निदान तू नाकारू तरी नकोस. आपल्यामध्ये प्रेम आहे की नाही माहित नाही ,पण मला तुझी ओढ आहे आणि तुलाही ती जाणवते. कदाचित आपल्या संसारिक जबाबदाऱ्या संपल्यानंतर आपण आपल्या नात्याला नक्कीच नाव देऊ शकू.” एवढं बोलून मधुलीने अजयच्या उघड्या पाठीवर आपल्या बोटांनी स्वतःचं आणि त्याचं नाव कोरलं आणि त्यावर आपले ओठ टेकवले. अजयनेही तिला आवेशाने परत एकदा घट्ट मिठीत घेतलं.

©® राखी भावसार भांडेकर. नागपूर

सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, या कथेच्या माध्यमातून कुठल्याही असामाजिक गोष्टींना खत पाणी घालण्याचा किंवा त्यांचं समर्थन करण्याचा लेखिकेचा उद्देश नाही. तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही


🎭 Series Post

View all