Login

हो, ही आहे माझी आई ( भाग-३ अंतिम )

एका अशा आईची गोष्ट जिला समाजात उपेक्षित मान जातं त्याच आईने एकाला मुलाला ऑफिसर बनवले त्या आईची व मुलाची गोष्ट

#जलद लेखन स्पर्धा

विषय-देवता

शीर्षक:- हो, ही आहे माझी आई

भाग- ३ (अंतिम)

मागील भागात:-

लक्ष्मी सुदामासाठी घर, धंदा सोडते आणि नवीन सुरुवात करते. ज्यात तिला रजिया साथ लाभते.

आता पुढे:-

असेच दिवस निघून गेले. श्याम नावाचा एक भला माणूस एकदा तिच्या टपरीवर आला. त्याला तिच्या हातचा चहा व नाष्टा खूपच आवडला. तो एक मोठा समाजसेवक पण होता. त्याला तिच्याबद्दल कळल्यावर कौतुक वाटले. तिच्या हाताला चव असलेली पाहून त्याने तिला त्याचे शहरातील हाॅटेल चालवण्याचा प्रस्ताव ठेवला. तिचा शुद्ध हेतू व बाळाबद्दल प्रेम व ममता, त्याच्यासाठी असणारी तळमळ व धडपड पाहून त्याने तिला मदत केली.

तिने त्याचा प्रस्ताव स्वीकारला आणि ती शहरात गेली. तिथे गेल्यावर तिचे नशीबच पलटलं. श्यामचे छोटेसे हाॅटेल तिच्या येण्याने छान चालू लागले. सुरूवातीला एका किन्नरच्या हाॅटेलमध्ये कसे जायचे असे म्हणणारे लोक तिच्या हातचं खायला येऊ लागले. तिच्या जेवणाचे कौतुक करू लागले. सगळीकडे तिच्या हाताच्या चवीचं नाव होऊ लागलं.

श्यामच्या ओळखीने तिने सुदामाला सैनिक स्कूलमध्ये भरती केलं. त्याला भेटायला गेल्यावर मुलं तुझी आई किन्नर आहे म्हणून चिडवू लागले तेव्हा तिला वाईट वाटलं. आपल्यामुळे आपल्या लेकराला त्रास नको, कोणी वाईट बोलायला याचा विचार करून तिने त्याला पुन्हा तिथे जाऊन न भेटण्याचा निर्णय घेतला. नंतर ती त्याला कधीच भेटायला गेली नाही. पण तो मात्र सुट्टीच्या दिवशी तिला नित्यनेमाने भेटायला यायचा. तेव्हा तिला खूप आनंद व्हायचा. इतरवेळी तिला श्यामकडून त्याची खुशाली कळायची.

हळूहळू ते छोटे हाॅटेल लक्ष्मीच्या मेहनतीने मोठे पंचतारांकित हाॅटेल बनले. यातही रजियाची मोलाची साथ होती. इकडे सुदामाही मन लावून शिकत होता. प्रत्येक वर्गात तो प्रथम क्रमांक मिळवत शिक्षणाची एक एक पायरी यशस्वीपणे पार करत होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने स्पर्धा परिक्षा दिल्या. ज्यात उत्तीर्ण होऊन एक मोठा आॅफिसर बनला. छोटासा सुदामा इतका मोठा झाला की सगळीकडे त्याचे कौतुक होऊ लागले. हे सगळं तिला आठवलं तसं तिच्या डोळ्यांत आनंदाच्या आसवांची गर्दी दाटून आली. आपण केलेल्या कष्टांचे चीज झाले याचं तिला समाधान वाटतं होतं.

वर्तमान-

सुदामाच्या सन्मान सोहळा होता. म्हणून तो तिला सोबत चल म्हणून हट्ट करत होता; पण एक किन्नर त्याची आई आहे हे कळल्यावर त्याचा तिथे अपमान होऊन चार लोकांत त्याचं हसू होऊ नये म्हणून ती घाबरून जाण्याचं टाळतं होती. पण त्याला मात्र आपली आई या कौतुक सोहळ्याची उत्सवमूर्ती म्हणून हवी. ज्या आईमुळे या स्थानावर तो पोहचला हे सर्व जगाला त्याला सांगायचे होते. म्हणून तो हट्ट करत होता.

संध्याकाळी घरी आल्यावर सुदामाला तिचा नकार कळल्यावर तो नाराज झाला.

तिने नकार दिल्यावर तो नाराज झाला. ती येत नाही तर आपल्या जाण्याला अर्थच नाही म्हणून तो येणार असल्याचे आयोजकांना सांगण्यासाठी फोन करून कळवणार होता पण तिला त्याचा उदास चेहरा बघवला नाही. तिने त्याच्या हातून फोन काढून घेत सोबत येण्याची तयारी दर्शवली. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला झाला. आनंदाने तिला मिठी मारत तिला थँक्यू म्हणाला.

दुसऱ्या दिवशी तो लक्ष्मी, रजिया व श्याम सोबत कार्यक्रमाला गेला. लक्ष्मी चेहरा अर्धा चेहरा झाकेल असे डोक्यावर पदर घेऊन बसली होती. आपल्या मुलाचा कौतुक सोहळा पाहून ती भारावून गेली. मनोमन सुखावली. मनातच तिने त्याची दुष्ट काढली. त्याला सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.

सुदामाला चार शब्द बोलण्यासाठी सांगण्यात आले तेव्हा त्याने माईक हातात घेऊन बोलू लागला, "सर्व मान्यवर व आयोजकांचे मनापासून आभार.मी इथपर्यंत पोहोचलो ते फक्त आणि फक्त एका व्यक्तीमुळे.ती नसती तर आज हा सुदामा घडलाच नसता. ती माझी आई, बाप दोन्ही आहे. ती माझी देवता आहे. आज हे सन्मानचिन्ह मी तिला समर्पित करतो. तुम्हाला सर्वांना उत्सुकता असेल कोण आहे ती जाणून पाहण्यासाठी. ती तिथेच तुमच्याच बसली आहे." असे म्हणत तो स्टेजवरून उतरून खाली आला. ती नकारार्थी मान डोलावली येऊ नको व्हायला म्हणून खुणावत होती; पण तो न ऐकता तिच्या दिशेने पावले टाकत तिच्याजवळ आला.

सगळे लोक कुतूहलाने त्याच्याकडे पाहत होते. अशा मुलाला घडवणारी ती आई नक्कीच खास असेल असा अंदाज तिथल्या लोकांनी बांधला. तिच्याजवळ आल्यावर तो तिच्या पायांशी झुकत तिच्या पायांना स्पर्श करत आदरपूर्वक नमस्कार केला. तिने भरल्या डोळ्यांनी पाहत थरथरत्या हाताने मनापासून भरभरून आशीर्वाद दिला. नंतर तो उभा राहिला. तिला हाताला धरून उठवून स्टेजवर घेऊन आला. तिच्या डोक्यावर पदर अजूनही तसाच होता. त्यामुळे तिचा चेहरा दिसत नव्हता. म्हणून तिला पाहण्याची सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली. सगळे माना उंचावून तिला पाहण्याचा प्रयत्न करू लागले.

"आज माझ्या आईचा मला खूप अभिमान व गर्व वाटतो. अशी आई मिळायला भाग्य लागतं." असे म्हणत त्याने तिला जवळ ओढत खांद्याभोवती हात गुंफला. ओढ बसल्याने तिचा पदर खाली पडला. तिचा चेहरा पाहून लोकांचे डोळे विस्फारले. ते आपापसात कुजबुजू लागले.

"अरे, ही तर किन्नर आहे." काही कुत्सित हसू लागले तर काही हिणवू लागले. काहींच्याकपाळावर गडद आट्या पडल्या. सर्वांना शांत करत सुदामा म्हणाला,"हो, ही आहे माझी आई, किन्नर. किन्नर म्हणजे अर्धनारीनटेश्वर, साक्षात भगवान महादेवाचा अवतार आहे, माझी अम्मा देवता आहे. म्हणूनच मी तिला मगाशी देवता म्हणालो. सर्वसामान्य आई सर्व काही असूनही करू शकत नाही ती ही माझ्या असामान्य किन्नर आईने केले. तिने मला फक्त रस्त्यावरून उचलून आणलं नाही तर मला चांगले शिक्षण मिळावे, चांगला माणूस बनावं म्हणून स्वतःच घरं, धंदा सर्व काही सोडलं. माझी आईवडील बनली. चांगले संस्कार केले. तिच्या हिमतीवर व मेहनतीने एका पंचतारांकित हाॅटेलची मालकिन बनली. जन्म दिलं म्हणून आई होतं नसंत. बाळासाठी मनात ममता व मायेचा पाझर असावा लागतो. जे या माझ्या आईकडे आहे. मग ती एक किन्नर असली म्हणून काय झालं? ही माझी आई आहे."

त्याला मिळालेले सन्मानचिन्ह तिच्या हातात देत त्याने तिला मिठी मारली. सर्व लोक टाळ्या वाजवून कौतुक करू लागले.

समाप्त-

किन्नर, तृतीयपंथीय ही एक माणूस असतो. स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करून दुसऱ्याची ओळख निर्माण करण्यात तो देवता ठरतो.

©️ जयश्री शिंदे


प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. मनोरंजनातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

🎭 Series Post

View all