Login

“जीवनात लोक येतात, जातात… आपण फक्त उरतो”

“In life, people come and go… we are the only ones left”
खूप दिवस आपण लोकांपासून दूर गेलो की जग आपल्याला विसरतं… ही कडू पण खरी जाणीव आहे. चार दिवस नजरेआड गेलो, फोन बंद ठेवला, भेटणं कमी केलं की नाव हळूहळू लोकांच्या आठवणींतून पुसटलं जातं. कालपर्यंत “कसा आहेस?” म्हणणारे, आज “तो कोण?” असा प्रश्नही विचारत नाहीत. यावरून एक गोष्ट प्रकर्षाने समजते आपण स्वतःला जितकं महत्त्व देतो, तितकं जग आपल्याला देत नाही. माणूस कायम या भ्रमात जगतो की लोक त्याच्याशिवाय राहूच शकत नाहीत, त्याच्याशिवाय सगळं ठप्प होईल. पण वास्तव याच्या अगदी उलट असतं. आपण असलो किंवा नसलो, जग आपल्याच गतीने पुढे चालत राहतं.

आपल्या आयुष्यात लोक आपल्याला भरभरून मान-सन्मान देतात, इज्जत देतात, मोठ्या शब्दांत कौतुक करतात. पण हा सगळा मान बहुतेक वेळा आपल्या अस्तित्वासाठी नसतो, तर आपल्या उपयोगासाठी असतो. ज्याला तुमची जितकी गरज, तितकीच तुमची किंमत. तुमचं काम आहे तोपर्यंत तुमचं नाव, तुमचं स्थान आहे. काम संपलं की तुमचं अस्तित्वही अनेकांच्या आयुष्यातून आपोआप गळून पडतं. हे ऐकायला कठोर वाटतं, पण अनुभवाने सिद्ध झालेलं सत्य आहे.

आपण झाडासारखे असतो. झाड हिरवं, फुललेलं, फळांनी लगडलेलं असतं तोपर्यंत त्यावर पक्ष्यांची गर्दी असते. पण ज्या दिवशी झाड सुकतं, त्या दिवशी तेच पक्षी आपापला ठिकाणा बदलतात. यात पक्ष्यांचीही चूक नसते आणि झाडाचीही नसते. निसर्गाचा हा नियम आहे. म्हणूनच म्हणतात

“ना रूकी वक्त की गर्दिश,
ना जमाना बदला;
पेड़ क्या सुखा,
तो परिंदों ने भी ठिकाना बदला.”

या ओळींत अख्खं जीवनदर्शन सामावलेलं आहे. वेळ वाईट नसतो, काळ दोषी नसतो, जमाना अचानक बदलत नाही आपल्या आयुष्यातील परिस्थिती बदलते आणि त्याबरोबर लोकांचे वागणं बदलतं. आपण वर असतो तेव्हा सगळे सोबत असतात, आणि खाली येतो तेव्हा वास्तवाचे सगळे मुखवटे गळून पडतात.

याचा अर्थ असा नाही की माणसानं कोणावर प्रेम करू नये, कोणावर विश्वास ठेवू नये. पण अंधविश्वास करू नये. आपल्या अस्तित्वाची किंमत कायमस्वरूपी असल्याचा गैरसमज मनात ठेवू नये. आज तुम्हाला हजार फोन येत असतील, तुमच्याभोवती गर्दी असेल, उद्या तेच सगळं शांत होऊ शकतं. म्हणून बाहेरच्या इज्जतीपेक्षा स्वतःच्या आत्मसन्मानाला जास्त महत्त्व द्या. लोक देणाऱ्या टाळ्या क्षणिक असतात; पण स्वतःचा खंबीरपणा आयुष्यभर उपयोगी पडतो.

खरं तर, आयुष्य आपल्याला हेच शिकवतं की माणसाने स्वतःच्या मूल्यावर उभं राहावं, लोकांच्या गरजांवर नाही. गरज संपली की नातीही बदलतात, ओळखीही बदलतात आणि व्यवहारही बदलतात. हे जाणून घेतल्यावर मनाला थोडं दुःख होतं, पण त्याच वेळी एक प्रकारचं प्रबोधनही होतं “आपण कुणासाठी अपरिहार्य नाही, पण स्वतःसाठी मात्र अत्यंत आवश्यक आहोत.”

म्हणूनच, लोक तुमच्याशी कसे वागतात यावर तुमचं जगणं उभं करू नका. लोक येतात, जातात, विसरतात, बदलतात. पण तुम्ही स्वतः बदलू नका. तुमची माणुसकी, तुमचा आत्मसन्मान, तुमची मूल्यं यांना कधीच बाजारभाव लावू नका. कारण शेवटी उरतं ते एकच सत्य
लोकांचा सहवास गरजेपुरता असतो, पण स्वतःचा आधार आयुष्यभराचा असतो.
सुनिल पुणे 9359850065
0