वर्गमित्र भाग 1

मैत्रीच्या नात्याला हळुवार स्पर्श करणारी हलकी फुलकी कथा वर्गमित्र जरूर वाचा.

वर्गमित्र भाग -1
©®राधिका कुलकर्णी.

सकाळ पासुन माझी लगबग चाललेली.काय करू अन् काय नको असे झालेले.घर सापडेल ना नीट?कुठे वाट बीट चुकणार तर नाही ना.?
आल्यावर काय बोलु? काहीच समजेनासे झाले होते.थोडा आनंद थोडीशी धास्ती संमिश्र भावनांची नुसती खिचडी चाललेली डोक्यात.

तेवढ्यात दारावरची बेल वाजली.तोच असेल,मी लगेच झरकन दार उघडायला जवळ जवळ धावलेच.पुन्हा मागे आले ओझरते आरशात स्वत:ला ठिक करत दार उघडले.

दारात तोच उभा हसतमुख चेहऱ्याने.काळजाचा ठाव घेतला त्याच्या हसण्याने.
मीही सुहास्यवदनाने त्याला आत घेतले.

शाळेतला माझा वर्गमित्र आज अचानक घरी येतोय म्हणल्यावर मी ही त्याच वयात जाउन पोहोचले.
मनपाखरू कधी शाळेच्या वर्गात बागडायला लागले कळलेच नाही.

इतक्यात जाणवले की तो त्याच्या बॅगेत काहीतरी शोधत होता.
"प्रसाद काय शोधतोएस?"
"काही नाही ग,पाण्याची बाटली शोधतोय काल निघताना घेतलेली.."
आत्ताशी कुठे मी भानावर आले.
त्याला आल्यापासुन पाणी ही विचारायचे विसरले होते.
"किती मी बावळटऽऽ.. !!" 

विचार करतच किचन मधुन पाण्याचा ग्लास ट्रे मधे घेतला आणि घाईतच येत होते.लक्ष मात्र त्याच्यावरच.
इकडे ट्रेमधला ग्लास वाकडा होतोय हे माझ्या लक्षातच येत नव्हते.पाणी जवऴपास त्याच्या अंगावर सांडण्याच्या बेतात,त्याने ट्रे सावरला, " अगंऽऽहळुऽ हळुऽ ..किती घाईऽ!!"
मलाही समजत होते की मी उगीचच नर्व्हस होतेय.कदाचित त्यानेही हे हेरलेय का?
त्या विचाराने पुन्हा घाबरायला झाले अन् वरवर हसुन मी नॉर्मलच असल्याचा दिखावा करत आमच्या औपचारिक गप्पा सुरू झाल्या.

त्याची फॅमिली कामकाज मुले बाळे इ.तो सांगत होता. 
एका मोठ्या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणुन काम बघत होता.काही इंटरव्ह्युज् साठी वन ऑफ द कमिटी मेंबर हा ही होता.आणि तेच इंटरव्ह्युज घ्यायला तो माझ्या शहरात आला होता.

शाळेतला प्रसाद तर मला आठवतच नव्हता फारसा.
म्हणजे पहिल्यांदा जेव्हा शाळेचे गेट टुगेदर झाले तेव्हा तर अशा नावाचा कोणी आपल्या वर्गात आहे हेच मला आठवत नव्हते.पण नंतर गप्पामधुन एफबी च्या माध्यमातुन मैत्री वाढली आणि वर्गातला अनोळखी चेहरा कधी छान मैत्रीच्या नात्यात गुंफला गेला कळलेच नाही.

तो बराच वेळचा बोलत असावा पण मी भूतकाळात माझ्याच विचारात इतकी गुंग होते की,
"अगंऽ,ऐकतेस ना? लक्ष कुठेय तुझे?"
ह्या त्याच्या बोलण्याने मी भानावर आले.
"अरेऽबोल ना,ऐकतेय मी".
मी म्हणले खरी पण माझे कानच फक्त ऐकण्याची औपचारिकता निभावत होते.

कशीबशी सारवासारव करत मीही माझे पती घर संसार असे सगळे बोलुन त्याला दुजोरा दिला.तो बऱ्यापैकी सहज होता पण मी का उगीचच कॉन्शस होत होते काही कळत नव्हते.

चहा, नाष्टा गप्पा असे सगळे चालु असतानाच नवराही आला.
त्याला सकाळीच मित्र येणार सांगितल्याने तोही नेहमी पेक्षा लवकरच काम संपवुन घरी आला.त्यांच्या गप्पा सुरू झाल्या आणि मी ही किचनमधे स्वैयंपाकाच्या तयारीत गुंतले.
~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:-1)
®©राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला आजचा भाग ?
वर्गमित्र कथा आवडतेय की नाही ?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all