घरकोन भाग 21

नात्यांची वीण घट्ट सांधणाऱ्या अल्लड प्रेमळ रेवाची सुंदर प्रेमकहाणी घरकोन जरूर वाचा..

घरकोन -21
®©राधिका कुलकर्णी.

आज तिसऱ्या दिवशी सायली रोजच्या प्रमाणे क्लासमधे दिसली.पण का कुणास ठाऊक रेवाला तिच्याशी बोलण्याची मुळीच इच्छा उरली नव्हती.शक्यतो होईल तेवढे ह्या विषयापासून आणि त्याच्याशी निगडीत लोकांपासुन दूरच राहणे बरे असे रेवाने मनाशी पक्के केले होते.त्यामुळे सायली आणि ती एकत्र कुठे येतील अशी जागा,ठिकाणे टाळतच रेवा कॉलेजमधे वावरत होती.
सुशांत गेल्यानंतर त्यांच्या प्रोजेक्टचा लिडर म्हणुन उन्मेशची नेमणुक सरांनी केली तेव्हाही रेवाला हायसे वाटले.
आता कोणत्याच कारणास्तव तिचा सुशांतशी डायरेक्ट बोलण्याचा प्रसंग येणार नव्हता ही त्यातल्या त्यात जमेची बाब.
संध्याकाळी लायब्ररीतून बाहेर पडताना चहासाठी एकटीच कँटीनमधे बसलेली असताना कशी कुठुन अचानक सायलीही तिकडे पोहोचली.
रेवाला बघुन तिही रेवाच्याच टेबलला जॉईन झाली.
"काय ग कुठे होतीस?" "दिवसभर दिसलीच नाहीस तू आज?"
सायलीने सहजच प्रश्न केला.
"अग लायब्ररीत होते."इति रेवा.
"परवाही तू आली नाहीस हॉस्पिटलला?"
"काकूंनी किती वाट पाहिली तु येशील म्हणुन."
"तू कॉलेजलाही नव्हतीस त्या दिवशी,म्हणुन मीच उन्मेशला तूला निरोप द्यायला सांगीतला शेवटी."
"तूला निरोप मिळाला ना?"
"अगं हो.उन्मेशने केला होता फोन पण मलाच बरे नव्हते त्या दिवशी.
मी घरीच आराम करत होते म्हणुन नाही जमले यायला."
रेवाने त्रोटक उत्तर दिले.
मग सायलीच पूढे स्वत:हून सर्व गोष्टी सांगत सुटली.
अगदी गाडीच्या अॅरेंजमेंट पासुन काकुंना सोबत म्हणुन त्यांच्या सोबत जाण्यापर्यंतचा सर्व किस्सा कथन केला.
सायली ज्या पद्धतीने सगळे सांगत होती  कोणताही आडपडदा न राखता त्यावरून हेच दिसत होते की सायलीला जितके मी दोषी समजतीय तसे काही जाणवत नाहीये.
खरच का तिने फक्त कांकुंकडे बघुन इतकी सगळी मदत केली असेल?
तिच्या मनात खरच सुशांत बद्दल तशा काही फिलिंग्ज नसतील का?
हे फक्त माझ्या मनाचे खेळ आहेत की मग फक्त सुशांतलाच तिच्याबद्दल...

इथे रेवाची विचार शृंखला पुन्हा खंडीत झाली.
म्हणजे पुन्हा जसे मला सुशबद्दल वाटतेय तसेच फक्त सुशलाच सायली बद्दल काही वाटतेय का?
तसे असेल तरीही मग मी त्याच्या मनात नाहीच नाऽऽ...
परिस्थिती कशीही असली तरीही मी आता त्याच्या आयुष्याचा भाग नाही हे तर त्याने स्वच्छपणे त्याच्या वागण्यातुन दर्शवून दिलेच आहे.
म्हणजे आता माझा जो मार्ग मी निवडलाय तो तसाच राहणार हे ही तितकेच खरेय.
विचारांच्या गर्दीत सायली काहीतरी बोलतीय ते ही तिच्या कानावर पडत असुनही तिला कळत नव्हते.
शेवटी सायलीने खांद्याला स्पर्श करून तिला विचारले,"चल निघायचे ना?"
रेवा भानावर आली.
"होऽऽ चल निघुयात."
"मलाही उशीरच होतोय."
दोघी काही न बोलता कँटीन मधुन बाहेर पडल्या.
################
म्हणता म्हणता आठवडा उलटून गेला.
एक दिवस क्लासमधे अचानक नेहमीच्या रिकाम्या जागी सुशांत बसलेला दिसला आणि रेवाच्या ऋदयाची धडधड नकळत वाढली.
त्याने बघितलेच तर त्याला कसे टाळायचे हाच विचार करत ती आपल्या डेस्कवर जाऊन बसली.
अचानक न सांगता येणारी बेचैनी रेवाला जाणवायला लागली.
ह्या सगळ्याचा सामना कसा करू ह्याचीच ती मनातल्या मनात आखणी करत होती.आता प्रत्येक ठिकाणी त्यांची सतत भेट होणार होती.क्लास, लायब्ररी,प्रोजेक्ट रूम सगळीकडे एकत्र वावर करताना त्याच्या सोबत असुनही नसल्यासारखे वागणे आपल्याला जमेल का ह्या विचारांनी रेवाला पोखरायला सुरवात केली.
एकामागुन एक क्लासेस संपून लंचची वेळ झाली तशी ती पटकन क्लासमधुन बाहेर सटकली.एरवी बऱ्याचदा डब्यात काही स्पेशल असले की ती आवर्जुन सुशांत बरोबर डबा शेअर करायची.त्याची तर मेस होती.रोजचेच मेसचे आळणी मिळमिळीत जेवण जेवून कंटाळलेला सुशांत काही खास डब्यातले दिले की आवडीने खायचा पण आज मात्र ती त्याच्यापासून दूर जाण्यासाठी जागा शोधत होती.त्यांच्या नेहमीच्या सर्वच जागा सुशांतलाही माहितीच्या झालेल्या होत्या त्यामुळे कॉलेजमधला असा कॉर्नर जिकडे ते एकत्र कधीच जात नसत अशी जागा रेवाने निवडून आपला डबा एकटीच खात होती.
मनावर मणामणाचे ओझे कोणीतरी ठेवलेय असे तिला वाटत होते.हा पळापळीचा खेळ तिच्यासाठी खूप जीवघेणा होता.
आता रोजच असे किती दिवस मी त्याच्यापासून लपूनछपून वावरणार आहे?
ह्या प्रसंगाचा सामना मला करावाच लागणार आहे कधी ना कधी.
काय बोलू /कसे बोलू?
तो समोर आलाच तर मी कशी रिअॅक्ट होऊ?
एक ना अनेक विचार  भूतासारखे डोक्यात थयथयाट करत होते.
सगळे सोडून कुठेतरी दूर पळुन जावे असे काहीसे रेवाला त्या क्षणी वाटत होते.
विचारांच्या नादात पोस्ट लंच क्लासेसची वेळ झाल्याचे बझर वाजले तशी रेवा भानावर आली. त्याच्या नजरेचा सामना टाळावा म्हणुन मान खाली घालुन रेवाने क्लासमधे प्रवेश केला..
गुपचूप आपल्या जागी बसुन कसलेसे पुस्तक काढून ते वाचण्याचा अविर्भाव करत तिने इतर कोणाशीही नजरभेट शिताफीने टाळली.
सुशांत लंचनंतर तिला वर्गात येताना बघितला  पण तिने मान खाली घातल्याने तिचे लक्षच नव्हते की सुशांत तिला बघतोय.
नंतरही त्याने मागे वळुन रेवाला बघितले तेव्हाही ती वाचनात मग्न दिसली.वर्गात लेक्चरर येताना बघुन क्लास संपल्यानंतर बोलू असा विचार करून सुशांतने तात्पुरता तो विषय तिकडेच थांबवला.
क्लासेस संपल्यावर नेहमीच्या जागी रेवाला गाठुन बोलूया असा विचार करतच तो पार्कींग स्टँडकडे तिची वाट पहात थांबला.खूपवेळ झाला तरी रेवा तिकडे आलीच नाही.अखेर खूप वाट बघुन तोही तिकडून निघाला.
दुसरीकडे कुठेतरी दिसेल तर बघु म्हणुन तो पुन्हा क्लास कॉरीडॉर कडे आला.
समोरून बऱ्याच मुलींचा गृप येताना बघुन त्याला हायसे वाटले.
कोणाला तरी नक्कीच माहीत असेल की रेवा कुठे आहे किंवा रेवाला ह्यापैकी कोणीतरी नक्कीच बघितले असेल.
त्यातल्याच एकीला त्याने सहजच चौकशी केली तर कळले की ती मगाशी लायब्ररीत दिसली होती, एव्हाना घरीपण गेली असेल.
तो घाईघाईने लायब्ररीत गेला.
सगळीकडे नजर फिरवली पण रेवा कुठेही नव्हती.
आज कॉलेजचा पहिला असा दिवस होता ज्या दिवशी पुर्ण दिवसात तो रेवाशी एक शब्दही बोलला नव्हता.
खरच का रेवाने मला बघितले नसेल?
मी आल्याचे तिला माहितच नव्हते हे ठिक पण एकाच वर्गात तिचे माझ्याकडे एकदाही लक्षच गेले नाही हे अशक्य आहे.
म्हणजे ह्याचा अर्थ ती मला टाळतीयऽऽऽऽ??
आता सुशांतचे विचारचक्र वेगाने फिरू लागले.
आपण जे काही वागलोय त्याचा तिने विपर्यास तर करून नाही ना घेतला?
सुशांतची बेचैनी वाढायला लागली आता.
तो वेड्यासारखा तिला सगळीकडे शोधत होता पण रेवा त्याला चुकवून कॉलेजबाहेर पडण्यात आज तरी यशस्वी झाली होती.
सुशांत निराश मनाने हॉस्टेलवर पोहोचला.

दोन मने दोन दिशेला तरीही एकाच निराशेच्या वावटळीत अडकले होते.
कोळी जसे आपल्याच भोवती जाळे विणता विणता त्यातच अडकुन गुदमरून मरतो तशी काहीशी अवस्था सुशांतची झाली होती.
रात्रीच्या अंधारात असे उद्याचा उष:काल ह्या ओळी आठवतच उद्याचा दिवस कदाचित काहीतरी चांगले घेऊन उगवेल अशी आशा बाळगतच सुशांतने अंथरूणावर अंग टाकले.
~~~~~~~~~~~~~~~~~
क्रमश:-21
®©राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,कसा वाटला आजचा भाग?
घरकोन आवडतेय की नाही?
 हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all