घरकोन भाग 29

नात्यांची वीण घट्ट सांधणाऱ्या अल्लड प्रेमळ रेवाची सुंदर प्रेमकहाणी घरकोन...

घरकोन -29
©राधिका कुलकर्णी.

सुशांतने एका दुकाना समोरच गाडी थांबवून रेवाला उतरण्याचा इशारा केला.तिही यंत्रवत खाली उतरली.गाडी पार्क करून दोघेही आत शिरले.दाेन तिन मजल्यांच्या दुकानात प्रत्येक मजल्यावर वेगवेगळे वस्त्र प्रकार काचेच्या कपाटातून टांगुन  ठेवले होते.
सुशांतने पेढीवरच्या एक सेठ वजा दिसणाऱ्या माणसाला काहीतरी चौकशी केली आणि त्याच्या खुणे नुसार दोघेही तळमजल्यावरून वरच्या मजल्यावर गेले.
तिथे सर्वत्र विविध साड्यांचे प्रकार रंगानुसार छान पद्धतिने सजावटीने रचून ठेवले होते.आकर्षक रंगसंगती आणि योग्य मांडणीमुळे प्रत्येक साडी बघताक्षणी मनात भरत होती.
पण आपण इकडे साडी सेक्शनमधे इतक्या घाईघाईने,अगदी स्वत:ला जायला उशीर करून का आलोय? ह्याचा उलगडा रेवाला अजुनही होत नव्हता.पण आता कुठलेच प्रश्न आणि त्यावरची उत्तरे मिळवायची रेवाची इच्छाच उरलेली नव्हती.जितक्या पटकन इथले काम उरकेल तितक्या पटकन आपण इकडून निघू ह्याच विचाराने ती सुशांत बरोबर निमुटपणे जात राहिली.
एका काऊंटरपाशी सुशांतने तिथल्या माणसाला फक्त त्यालाच ऐकु जाईल इतक्या हळू आवाजात काहीतरी सांगितले.
तोही सांगितल्या सुचने प्रमाणे एक एक प्रकारातली साडी दाखवण्यास सुरवात केली.
रेवाला काहीच कळत नव्हते की नेमके काय चाललेय.?
आत्ता ह्यावेळी साडी खरेदी कशासाठी आणि कुणासाठी?
कदाचित मी!!  पण मला काय गरज आहे साडी घ्यायची?
आणि दुसऱ्या कुणासाठी असेल तर मला थांबवून आत्ताच त्याची खरेदी कशासाठी?
मनात प्रश्नांचे उठलेले काहूर काही केल्या थांबत नव्हते.तेवढ्यात सुशांतचा आवाज कानी पडला आणि रेवा भानावर आली.
"रेवा,बघ ह्यातली कोणती तूला पसंत पडतीय?"
"अरेऽ पण मला काय करायचीय साडी आत्ता?"
"मला काही नकोय साडी वगैरे.मला उशीर होतोय निघायला आपण निघु चल."
रेवा जरा वैतागातच बोलत होती.
साडी घेण्यामागचे प्रयोजनच कळत नव्हते मग उगीचच विनाकारण कुणाकडून अशा भेटवस्तू का घ्यायच्या?त्यातल्या त्यात काकूंनी रेवाला साफ नापसंत केल्यावर तर साडी वगैरेचा प्रश्नच नव्हता.
रेवा साडी नको म्हणतच तिकडून निघायला लागली.सुशांतला समजेना तिला कसे अडवावे.दुकानात सगळ्यांसमोर तमाशा नको म्हणुन तोही तिच्यापाठोपाठ खाली उतरला.
"अगऽऽ रेवा,थांब ना.कुठे चाललीस? "
"आईनेच तूला साडी घ्यायला सांगितली तुझ्या पसंतीने म्हणुन आलोय आपण इकडे."
"पण मला कुठे सांगितलेस तू की माझ्यासाठी खरेदीला आलोय,नाहीतर मी घरीच नाही सांगुन निघाले असते एव्हाना."
"मला जे मिळायचे होते ते गिफ्ट मिळालेय आधीच सुशऽऽ,अगदी आयुष्यभर लक्षात राहील असे गिफ्ट मिळालेय."
"आता दुसऱ्या कुठल्या गिफ्ट्सची काहीच गरज नाहीये."
"रेवा प्लिज इकडे वाद नको नाऽऽ.
आईने सांगितलेय म्हणुन तरी ऐक."
"हे बघ सुशांत,फक्त आईसाठीच करतोएस तर तूला जी आवडेल ती साडी निवड.मी येणार नाहीये वर."
रेवा वर जात नाही म्हणुन हट्टच धरून बसली.
सुशांतला त्यातले फारसे काहीच समजत नव्हते.
पण नाईलाज होता कारण रेवा तर ऐकायच्या मुडमधेच नव्हती.
तो पुन्हा वर गेला तिथल्या माणसाच्याच मदतीने रेवाला आवडत्या गुलाबी निळ्या कॉम्बिनेशनची एक साडी खरेदी करून तो दुकानाबाहेर आला.
घाईनेच दोघे घरी पोहोचले.
घरी पोहोचताक्षणी रेवाने बॅग उचलली आणि निघायलाच लागली.
काकुंना आणि सुशांतला दोघांनाही तिला अडवणे मुश्कील झाले होते. कारण तिला थांबवून ठेवण्यासाठी कुठलीच सबब आता शिल्लक उरली नव्हती.
शेवटी रेवा दाराजवळ पोहचून उंबरा आेलांडण्या आधीच काकूंनी तिला थांब सांगितले.
रेवाने चमकुन मागे वळून पाहिले.
"रेवा बेटा,इकडे ये.तुझ्यासाठी आणलेली साडी तर घेऊन जा."
काकुंनी देवघरातुन करंडा आणला.
रेवाला जवळ बोलवून म्हणाल्या,"घरच्या सुनेला अशी काही न देता कशी बरं जाऊ देऊ मी."
रेवाला स्वत:च्या कानावर विश्वास बसत नव्हता.मी चुकून काहीतरी वेगळे ऐकलेय का?काकू खरच मला सुन म्हणाल्या की माझ्या कानांना भास झालाय!"
रेवा संभ्रमावस्थेत पुतळ्यागत निश्चल उभी होती फक्त.मनातला राग,संताप,दु:ख,आश्चर्य आणि विस्मयाच्या सर्व छटा आलटून पालटून चेहऱ्यावर उमटत होत्या.तिने एक नजर सुशांतकडे बघितले तर तो गालातल्या गालात हसत होता तोंडावर हात ठेवून.
काकुंनाही तिची अवस्था बघवत नव्हती.शेवटी त्यांनी तिच्या डोक्यीवर हात फिरवून म्हणल्या, "वेडी गं वेडीऽऽ!!"
"अग आता तुमचे सुख तेच माझे सुख हो. मला तरी तुमच्या शिवाय कोण आहे म्हातारपणी आधार द्यायला?"मला माफ कर पोरी पण सुशांतनेच रचले हो सगळे नाटक."
"मलाही इच्छा नसताना सामिल करून घेतले त्यात."
"तुझ्यासारखी इतकी गोड मुलगी मला शोधुन तरी मिळेल का सांग पाहू?"
तूला पहिल्यांदा हॉस्पीटलात बघितले ना तेव्हाच मला अंदाज आला होता तुझा किती जीव जडलाय माझ्या लेकरावर ह्याचा.पण तुम्ही स्वत:हुन बोले पर्यंत मी गप्पच रहायचे ठरवले होते."
"पण आता नाही गप्प राहू शकत तूला असे रडवेले पाहून."
"ह्याला सवयच आहे चेष्टा मस्करीची."
"तूलाही इतक्या वर्षात ह्याच्या ह्या खोडी समजल्याच असतील की?"
"मला वाटले तू चटकन ओळखशील हा मस्करी करतोय हे पण....."
"असोऽऽऽ,,आता पुस ते डोळे आणि जवळ ये बघु माझ्या."
रेवाला काहीच समजत नव्हते.डोळ्यातून फक्त धारा वहात होत्या.
मनातल्या मनात सुशांतवर प्रचंड संतापली होती.पण काकुंसमोर व्यक्त करणे योग्य नसते दिसले म्हणुन गप्प उभी होती.
काकुंच्या कुशीत शिरून खूपवेळ रडून घेतल्यावर ती शांत झाली.
तिला शांत झालेल पाहून मग काकू बोलल्या,"हे बघ आता फार उशीर झालाय तेव्हा तू आजच्या दिवस इकडेच थांब.उद्या पहिल्या गाडीने जा हवेतर.मी नाही रोखणार उद्या तूला."
"आता देवघरात जा कुंकू लावून घेवून ही साडी नेसुन दाखव बरं मला."
ती निमुटपणे वर गेली.
आहे त्या ड्रेसवरच साडी नीटपणे नेसली.तेवढ्यात दारावर टकटक झाली.
दार उघडले तर दारात सुशांत उभा होता.
त्याला बघुन हिचा राग पुन्हा उफाळून वर आला. ह्यावेळी किती क्रुर थट्टा केली होती सुशांतने. कोणत्याही परीस्थितीत आज ह्याची चांगलीच कानउघाडणी करायची असे तिने ठरवलेच होते पण तो असा अचानक समोर येईल असे तिला वाटलेच नव्हते.ती काही न बोलता फक्त रागाने बघतच खोलीबाहेर पडली.सुशांतने तिला थांबवायचा प्रयत्न केला पण ती न थांबताच खाली गेली.
"काकू,बघा मला कशी दिसतीय साडी?"
साडीचा रंग खरचच तिच्यावर खूप खुलून दिसत होता.
"अगोबाई!!छानच दिसतीय हो साडी.रंगही खुलून दिसतोय तूला."
काकूंनी सुशांतला खाली बोलावले.
दोघांना देवघरात जाऊन जोडीने नमस्कार करायला सांगितले.
मग दोघांनीही जोडीने काकुंना नमस्कार केला.
दोघांना जवळ घेऊन
आशिर्वाद देताना काकुंच्या डोळ्यातही पाणी आले.हलकेच आपले डोळे साडीच्या पदराने पुसतच त्यांनी दोघांना जवळ घेतले आणि सुखी रहा,असेच आनंदी रहा आयुष्यभर असा तोंडभरून आशिर्वादही दिला.
रेवालाही अजुनही सगळे स्वप्नवत वाटत होते.त्यात सुशांतने केलेल्या नाटकामुळे त्याच्यावरही राग येत होता.
आता आज मुक्काम होता तेव्हा त्याच्याकडे बघुन घेईन हा विचार मनोमन करतच ती साडी बदलायला वर गेली.
रेवा आपल्यावर चिडलीय आणि काहीच बोलत नाहीये हे जाणुन सुशांतही आता धास्तावला होता.नुकतेच मागल्या काही दिवसापुर्वी तिची केलेली मस्करी अंगलट येता येता वाचली होती त्यात आता पुन्हा ह्या नविन नाटकाची भर  घालुन स्वत:च स्वत:वरच्या रागाला आमंत्रण देवून बसला होता.
आता "आलिया भोगासी...असावे सादर.." ह्या उक्तिनुसार तो मनाेमन रेवाच्या रागाचा सामना करण्याची 
तयारी करत होता.
~~~~~~~~~~~~~~~~
(क्रमश:)
घरकोन -29
©®राधिका कुलकर्णी.
-------------------------------------
नमस्कार मंडळी,
कसा वाटला हा भाग?
घरकोन कथा आवडतेय की नाही ?
हे कमेंटद्वारे जरूर कळवा.
(लेखन वितरणाचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन.माझ्या नावासकट कथा नक्की शेअर करू शकता.) 
धन्यवाद.

🎭 Series Post

View all