भाग - २
मॅमोग्राफी चे रिपोर्ट्स तर ती गाठ कॅन्सरचीच असल्याचे संकेत देत होते. रिपोर्ट पाहून सवितेच्या पायाखालची मात्र जमीन सरकली होती.
" सुरुवातीला जेव्हा तुम्हाला गाठ हाताला लागली ना तेव्हाच तुम्ही आल्या असत्या ना तर कदाचित जास्त चांगलं झालं असतं. आता मात्र ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. पण ऑपरेशन करण्या आधी आपल्याला तो कोणत्या स्टेज ला आहे, लिम्फ पर्यंत तो पोहचला आहे का? वगैरे सगळं बघावं लागेल आणि त्यासाठी पुन्हा काही कराव्या लागणाऱ्या तपासण्यां बद्दल डॉक्टरांनी तिला समजावून सांगितले आणि त्यांचे रिपोर्ट्स आल्यानंतरच त्यावरून पुढच्या उपचारांची दिशा ठरवावी लागेल याची डॉक्टरांनी तिला कल्पना दिली.
कॅन्सर, त्यासाठी करावे लागणार ऑपरेशन, लेकीच्या सुरू असलेल्या परीक्षा ,सगळीकडून अगदी चक्रव्यूहात अडकल्यासारखी तिची अवस्था झाली होती. काय करावे ,कसे करावे? काहीच तिला सुचत नव्हते. मुळात कॅन्सर नावाच्या आजाराचे नाव घेतले की भल्या भल्यांच्या तोंडचे पाणी पळते तिथे सविते सारख्या सामान्य संसारी स्त्रीची काय अवस्था असेल...
डॉक्टरांच्या केबिन मधून ती बाहेर निघाली आणि किर्तीच्या खांद्यावर डोकं ठेवून आपल्या अश्रूंना तिने वाट करून दिली.
सविताची अवस्था बघून किर्ती सुद्धा अगदी हतबल झाली होती. सविताचे फक्त पोकळ सांत्वन करणे एवढेच तिच्या हातात उरले होते. तेवढ्यात त्या हॉस्पिटलचा कर्क सेवक त्यांच्याकडे आला. कॅन्सर या आजारामुळे रुग्णांची बिघडणारी मानसिकता बघून त्यांच्यासाठी, त्यांची हिम्मत वाढवण्यासाठी नियुक्त केलेल्या समुपदेशकाकडे तो त्यांना घेऊन गेला.
समुपदेशनानंतर तिला थोडं हलकं वाटलं. आजूबाजूला तिच्याच सारख्या असलेल्या अनेक रुग्णांना बघून थोडी समदु:खी पणाची भावनाही मनात जागृत झाली. वेळेत ऑपरेशन झाले आणि कॅन्सर जर पसरलेला नसला तर पेशंट बरा होण्याचे बरेच चान्सेस असतात याची तिला जाणीव झाली.
"कॅन्सर हा आजारच असा आहे की त्याचे जेवढ्या लवकरात लवकर निदान होईल आणि त्यावर जेवढ्या शीघ्रतेने उपचार केले जातील तेवढेच त्या आजारातील धोके कमी असतात. त्यामुळे शक्य होईल तितक्या लवकर तुम्हाला ऑपरेशन करावे लागेल." हे डॉक्टरांचे वाक्य तिच्या मनावर चांगलेच कोरले गेले.
लेकीच्या पुढे असणाऱ्या परीक्षांचा तिच्या मनात एकदा विचार आला पण त्या सुरळीत पार पडाव्यात असं वाटत असेल तर आपलं असणं सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे याचीही जाणीव सविताला झाली. "सर सलामत तो पगडी पचास" या वाक्याचा नव्याने अर्थ कळून लवकरात लवकर ऑपरेशन करून घेण्यासाठी तिने तिच्या मनाची तयारी करून घेतली.
पण हे सगळं घडत असताना लेकीच्या पुढच्या परीक्षांवर त्याचा काहीही परिणाम होऊ नये म्हणून तिला काहीच न कळू देता हे सगळे पार पाडणे गरजेचे होते. मनातल्या भीतीवर तर तिने विजय मिळवला होता पण एखादे व्यवस्थित कारण सांगून लेकीला अंधारात ठेवून हे सगळं पार पाडणे म्हणजे एखाद्या अग्निदिव्यापेक्षा कमी नव्हते तिच्यासाठी.
दुसरीकडे ती ज्या विचित्र परिस्थितीत जगत होती त्यामुळे तिच्या मुलीची जी मानसिकता बनली होती त्यामुळे मुलीला एकटे सोडून जाणे किती कठीण आहे हा विचार करून ती फार अस्वस्थ होत होती.पण ही आर या पार ची लढाई लढण्याशिवाय दुसरा उपाय तरी कुठे होता तिच्याकडे?
एकतर तिचा नवरा आणि ती एकत्र राहात असले तरी त्यांच्या मनाच्या तारा कधी जुळल्याच नव्हत्या. परतीच्या प्रवासात तिचं मन नकळत भूत काळात पोचलं होतं.
ती लग्न होऊन आली तेव्हा ती या घरची मोठी सून होती. सासरे नव्हतेच. एक लग्न झालेली नणंद , दीर आणि सासू एवढी मंडळी घरी होती.
नणंद लग्न होऊन तिच्या घरी सुस्थितीत होती. नुकतंच दीराचं शिक्षण आटोपलं होतं आणि तो नोकरीच्या शोधात होता. सासरे लवकरच गेल्याने सासू आणि तिचा नवरा या दोघांवरच संसाराचा अतिरिक्त भार आला होता. एकटी आई आणि पदरी तीन पोरं . तिचा नवरा सगळ्यात मोठा असल्याने नकळत्या वयातच त्याच्या खांद्यावर जिम्मेदारीचं ओझं आलं होतं. भावा बहिणीचे शिक्षण, बहिणीचे लग्न या साऱ्याची जबाबदारी त्याने अगदी स्वतःच्या खांद्यावर पेलली होती. पण हे सगळं करताना त्याच्या स्वतःच्या इच्छा ,आकांक्षा, स्वप्न सारे मागेच राहून गेले होते. त्यामुळे त्याच्या स्वभावात रुक्षता अन् नकळत थोडा चिडचिडेपणा आला होता. त्याच्या आईचे आणि त्याचे सुद्धा नेहमीच वैचारिक मतभेद असायचे.
सविता लग्न होऊन आली तेव्हा जेमतेम बी कॉम पूर्ण केली होती. माहेरी अगदी लाडाकोडात वाढलेली ती आणि इकडचं वातावरण यात फारच तफावत होती. तिच्या संसार सुलभ कल्पना आणि सासूचा आणि नवऱ्याचा स्वभाव यांचा कुठेच ताळमेळ बसायचा नाही. नवरा श्रीधर स्वभावाने तसा चांगलाच होता पण त्याचा चिडचिडा स्वभाव त्याच्या चांगुलपणावर मात करायचा. सविताला या सगळ्या गोष्टींची सवय नसल्याने तिच्या आणि तिच्या नवऱ्याच्या मनाची तार कधी जुळलीच नाही. ती सतत त्याला वचकूनच असायची. चिडल्यानंतर काही वेळाने तो तिच्याशी चांगलं बोलायचा पण त्याच्या चिडण्याची जी दहशत तिच्या मनात बसून गेली होती, ती काही केल्या कमी होत नव्हती. त्यातल्या त्यात त्याचं आणि त्याच्या आईचेही थोडे वैचारिक मतभेद असल्याने त्या दोघांच्या मधातही तिचीच घुसमट व्हायची. मुळात सविता आणि श्रीधर हे दोघे वाईट नसतानाही एक नकळत अढी मात्र दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल बसली होती.बस लग्न झालेल्या अनेक जोडप्यांप्रमाणे उपचार म्हणून त्यांचं हे नातं सुरू होतं.
सुरुवातीला तर तिला हे नातं सोडून आपण निघून जावं की काय असं वाटे पण तिच्या पाठच्या बहिण भावाची लग्नं, तिच्या असं करण्याने पूर्ण घरावर होणारा परिणाम याचा विचार करून ती गप्प बसायची. पुढे काही दिवसातच येणाऱ्या बाळाची चाहूल लागली आणि सविता तिच्या वेगळ्याच विश्वात विहरू लागली.
दिवस पूर्ण होताच एका गोंडस लेकीला तिने जन्म दिला. श्रीधर चा गोरा रंग आणि सविताचा रेखीव चेहरा असं सुंदर रूप घेऊन आलेली ती बालिका आता घराचा विरंगुळा झाली होती. सगळं घर तिच्या बाल लीलांमध्ये रमलं होतं. श्रीधर अलीकडे तिच्याशी सलगी करायचा प्रयत्न करायचा पण तिच्या डोक्यात त्याच्या तापट स्वभावाची जी प्रतिमा निर्माण झाली होती ती काही पुसली जात नव्हती त्यामुळे ती मात्र त्याच्यापासून थोडं अंतर राखूनच असायची.
नोकरीची वाट पाहून थकलेल्या दिराने शेवटी किराणा दुकान घातले. स्वावलंबी होताच त्याने आणि सविताच्या सासूने वेगळे राहायचा निर्णय घेतला. आता एका घराची दोन घरं झाली होती. सविताने सुरुवातीपासूनच गोगलगायीप्रमाणे आपल्या मन आणि भावनांना इतकं आक्रसून घेतलं होतं की कुटुंबातल्या कुणाशीच तिच्या मनाच्या तारा कधी जुळल्याच नाही. मोहल्ल्यात सुद्धा तिची फारशी कोणाशी सलगी नव्हती. फक्त तिची मैत्रीण किर्तीशी मात्र तिचे चांगले सूर जुळले होते. कालांतराने दीराचे सुद्धा लग्न झाले. त्याचे लग्न झाल्यानंतर वर्षभरातच सासूबाई पुन्हा वेगळ्या राहू लागल्या.एका घराचे आता तीन घरं झाले होते.
ती आणि तिची लेक हेच तिचे विश्व होते. गावातीलच एका पतसंस्थेत नोकरीला असणारा तिचा नवरा स्वभावाने तापट असला तरी त्या दोघींना काहीच कमी पडू देत नसे. वडिलांच्या जाण्याने अतृप्त असलेल्या त्याच्या साऱ्या इच्छा ,आकांक्षा यांची भरपाई तो आपल्या लेकीवरच्या प्रेमातून भरून काढायचा पुरेपूर प्रयत्न करायचा. हे सगळं सवितेला दिसत असूनही तिच्या मनात त्याच्याविषयी असलेला ग्रह मात्र अजूनही कमी झाला नव्हता. लेक थोडी मोठी झाल्यावर ती सुद्धा एका संस्थेमध्ये अकाउंटंट म्हणून नोकरी करायला जाऊ लागली.वेळ पडल्यास सासू बाई तिच्या लेकिकडे लक्ष द्यायच्या तेवढाच काय तो त्यांचा तिला आधार होता. बाकी दोघींच्याही एकमेकींकडून काही विशेष अपेक्षा नव्हत्या.
श्रीधर आणि सविता दोघेही एकुलत्या एका लेकीवर अतोनात प्रेम करायचे. तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये याचा पुरेपूर प्रयत्न करायचे. पण दोघांचे कधीही न जुळलेले सूर, त्या दोघांचे वैचारिक मतभेद, सविताला असलेला माहेरचा ओढा या सगळ्या प्रकारांमुळे आई-वडिलांचे सुदृढ प्रेम लेकीला कधी लाभलेच नाही. श्रीधरनी बरेचदा आपला तापटपणा सोडून मवाळ व्हायचा प्रयत्न केला. पण त्याने इतकी तयारी दाखवूनही सविता वर या बदलांचा कधी काही परिणाम झालाच नाही. त्यामुळे पुन्हा त्याची चिडचिड कमी होण्याऐवजी दिवसागणिक अजून वाढतच गेली. आई-वडिलांची नेहमी होणारी भांडणं आणि सविताचे नेहमी श्रीधरला दूषणं देणं यामुळे लेकीच्या सुद्धा मनात त्याची प्रतिमा तशीच निर्माण झाली. या सगळ्याचा परिणाम असा झाला की श्रीधरने लेकीवर अगदी मनापासून प्रेम करूनही लेक मात्र मनाने त्याच्यापासून दुरावली गेली.
कंडक्टरने बस ची बेल वाजवली आणि सविता त्या विचारांच्या तंद्रितून बाहेर निघाली. बस मधून उतरून ती आणि कीर्ती घराच्या रस्त्याला लागल्या. आता घरी जाऊन लेकीला काय सांगायचं ? हा एक मोठाच प्रश्न सवितेसमोर आ वासून उभा होता.
क्रमशः
काय झालं असेल पुढे ? हे जाणून घ्यायला वाचा कथेचा पुढचा भाग.
धन्यवाद!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा