2 स्टेटस..
मागील भागात आपण पाहिले कि श्रेयस कवलजीतच्या घरी जातो.. आणि आता तो तिला स्वतःच्या घरी घेऊन जाणार आहे.. कवलच्या घरच्यांना श्रेयस आवडला आहे, श्रेयसच्या घरच्यांना कवल आवडेल का पाहूया...
" श्रेयस पण तू घरी कळवलंस तर बरे होईल असे मला वाटते.." कवलने सुचवले..
" ओके मॅडम.. आता फोन करतो.. हॅलो आई, तू कुठे बाहेर आहेस का?"
" का रे?"
"काही नाही. खूप गोंगाट ऐकू येतोय म्हणून विचारले.."
" हो, जरा मावशीकडे आलो आहोत आम्ही दोघेही. तूही बाहेर गेलास , सुमीतसुद्धा आज अभ्यासासाठी मित्राकडे गेला आहे.. एकटेच होतो.. म्हणून आलो.. का रे?"
" काही नाही.. घरी कधी पोचणार तुम्ही?"
"काही काम आहे का तुझे? असेल तर निघतो आता.. "
" नको.. लगेच नका येऊ.. तुमचे बोलून झाले कि निघा.."
श्रेयसने फोन ठेवला. कवल त्याच्याकडे प्रश्नार्थक बघत होती..
" काय झाले?"
" बरे झाले घरी फोन केला, आईबाबा मावशीकडे गेले आहेत.."
" मग तू त्यांना मी घरी येते आहे, असे का नाही सांगितलेस?"
" अग सगळ्यांसमोर नको म्हणून नाही बोललो.. एनीवेज ते संध्याकाळी घरी जातील.. तोपर्यंत काय करायचे? मूव्ही कि असेच फिरायचे?"
" लॉंग ड्राइव्ह?"
आणि दिवसभर भटकून दोघे शेवटी श्रेयसच्या घरी पोचले. श्रेयसचे आईबाबा नुकतेच घरी आले होते..
" आई, बाबा ही कवलजीत.."
" कवल, आई, बाबा.. त्या दिवशी बोललो होतो ना?" कवलजीत त्यांच्या पाया पडली..
" श्रेयस, आधी थोडीतरी कल्पना द्यायचीस रे, काहीतरी तयारी करता आली असती.." शोभाताई म्हणाल्या..
" अग, मला तुम्हाला सरप्राईज द्यायचे होते.."
" अच्छा, म्हणून तो फोन होता का सकाळी?"
" अहो, आता अशाच बोलत राहणार कि त्यांना आतही घेणार?"
" अरे हो, ये ग कवलजीत.. बस.. काय घेणार चहा , कॉफी , सरबत?"
" काही नाही काकी.. तुम्ही बसा फक्त.."
" अरे वा.. चांगलं मराठी बोलतेस कि तू. कसे काय?"
" ॲक्चुली आमच्या इथे बरेचसे महाराष्ट्रीयन फॅमिलीज आहेत.. सो थोडे बोलता येते.."
" अरे वा.. चांगले आहे.."
" तुम्ही बसा. मी पटकन कॉफी घेऊन येते.. श्रेयस एक पाच मिनिटांनी आत येशील का?"
" श्रेयस हि कॉफी घेऊन जा.. आणि आता पटकन खायला काय करू ते सांग.. कि ती जेवायला थांबेल?"
" आई, तिलाच विचारू का? कारण आम्ही पण दुपारी उशीरा खाल्ले आहे."
" बरे.. तूच विचार.."
बाहेर कवलच्या आणि श्रेयसच्या बाबांच्या गप्पा रंगल्या होत्या.. दोघांचीही खेलविषयक चर्चा चालली होती..
" तू सगळ्या स्पर्धा बघतेस?"
" कुठे अंकल? ऑफिसमध्ये काम असते, ममीच्या सिरियल्समधून वेळ मिळाला तर डॅडी न्यूज बघतात नाहीतर आमचा सुखी माझा मोठा भाऊ हिंदी मूव्हीज.. मोबाईलवर बघते.. जमेल तसे.."
"आपले छान जमेल मग.." श्रेयसचे बाबा खुश होऊन म्हणाले..
"सो कवलजीत, तू श्रेयसच्याच ऑफिसमध्ये आहेस ना? किती वर्ष ओळखता एकमेकांना?" आईने विचारले..
" चार वर्ष काकी.."
" मग कधी आली नाहीस घरी ते? कायरे अजिबात समजू दिले नाहीस कधी?"
" असे काही नाही ग आई.. तुला सांगणारच होतो ना.."
" आई खायला काय आहे? खूप भूक लागली आहे..." सुमित ओरडतच घरात आला.. आणि वातावरण पटकन बदलले...
" ओह्हो.. वहिनी पण आली आहे?" त्याने विचारले..
" तू कधी भेटलास हिला?" आईने आश्चर्याने विचारले..
" मी कधी भेटणार ,अग दादाच्या मोबाईलमध्ये कसले भारी फोटो आहेत हिचे?"
" तू कधी पाहिलेस?" श्रेयसने रागाने विचारले..
" तू त्या दिवशी मोबाईल खोलीत ठेवून गेला होतास.. मला पाहायचे होते कोणासोबत तू एवढे रात्री चॅटिंग करतोस ते.."
" तुला ना... नंतर बघतो.." श्रेयसने सुमितला धमकी दिली..
"तुम्ही दोघे जरा शांत बसाल का? आणि सुमित तू काय खाणार बरे?" आईने दोघांना शांत केले..
"ऑम्लेट?"
" ओके.. तुम्हाला चालेल का?"
"हो.." बाबा आणि श्रेयस म्हणाले..
" कवलजीत, तुला चालेल ऑम्लेट?"
" हो काकी चालेल." (श्रेयस तर pure veg आहे मग ऑम्लेट?? कवल मनात विचार करत होती..) मी काही मदत करू का तुम्हाला?"
" नको.. मी करते. तुम्ही गप्पा मारा... सुमित फक्त ब्रेड घेऊन येशील का?"
शोभाताईंनी डायनिंग टेबलवर ऑम्लेट, ब्रेड, पुदिन्याची चटणी, सॉस असे सगळे तयार ठेवले होते. कवलजीतला ऑम्लेट जरा वेगळे दिसले, चवही वेगळीच होती..
" काकी हे ऑम्लेट कसले केले आहे?"
"टोमॅटोचे.. का ग? आवडले नाही का? "
" नाही मस्त झाले आहे.." \"आमच्याकडे ऑम्लेट म्हणजे अंड्याचे असते, हे थोडेच कवल बोलणार होती..\"
" तुमच्याकडे जेवण कसे असते? खूप तिखट असते का?"
" नाही, अजिबात नाही, थोडे मसाले असतात.. विचारा ना श्रेयसला , सकाळचा नाश्ता तिखट होता का?"
हे ऐकून श्रेयसला जोरात ठसका लागला. शोभाताईंनी त्याकडे दुर्लक्ष केल्यावर त्याच्या डोक्यात धोक्याची घंटी वाजली..
" अच्छा, हा आज आला होता का तिथे?"
" हो काकी.. आणि मॉम डॅड ने तुम्हाला विचारायला सांगितले आहे कि पुढचे बोलायला तुम्ही घरी येणार कि त्यांनी यायचे?"
" अग, काय घाई आहे.. आत्ताच तर भेटलो आहोत.. थोडी ओळख तर होऊ दे.." या वाक्याने कवल आणि श्रेयसचे चेहरे उतरले. ते पाहून सुरेशराव म्हणाले," तू दे मला त्यांचा नंबर कि श्रेयसकडे आहे? मी बोलतो त्यांच्याशी"..
" काका, काकी मी निघू आता? खूप उशीर होईल नाहीतर.."
" मी जातो हिला सोडायला.." इतका वेळ फक्त खाण्यात मग्न असलेला सुमित म्हणाला..
" तू गप रे.. आई मी येऊ का हिला सोडून?" श्रेयसने विचारले..
" कवलजीत जरा आत येतेस का?"
शोभाताई तिला आत घेऊन गेल्या.. त्यांनी तिला कुंकू लावून हातात साडी दिली..
" तू पहिल्यांदाच आलीस.. माहिती नव्हते नाहीतर तुझ्या आवडीचा ड्रेस वगैरे आणला असता.. "
" काकी, हि साडी पण छान आहे.."
कवलने दोघांना वाकून नमस्कार केला. आणि ते दोघे निघाले..
" श्रेयस, तुझ्या घरी मी आवडले असेल का?"
" मग काय? म्हणून तर आईने तुला साडी दिली ना.. काय म्हणतात तुमच्याकडे शगुन ना?"
" तुला काय वाटते.. होईल का आपले लग्न? मला भिती वाटते रे..."
" वेडी आहेस का? आज भेटलो ना मी तुझ्या घरी, तू माझ्या घरी.. आणि माझे बाबा तर तुझ्या डॅडींना फोन पण करणार आहेत ना.. आणि अजूनही भिती असेल तर माझ्याकडे एक उपाय आहे, करू?" श्रेयस कवलच्या जवळ जात म्हणाला..
" चल झुठा... ये सब शादी के बाद.. तू येतोस आत? "
" नको.. उशीर होईल.. पण हे सगळे नंतर वसूल करीन.. "
कवलला सोडून श्रेयस घरी परतला.. आई त्याची वाटच पहात होती.. "आपण बोलूयात का थोडे?"
श्रेयस गुपचूप खाली बसला..
"तू आज तिच्या घरी गेला होतास मग आम्हाला का नाही सांगितलेस?"
"आई, अग ते होकार देतील कि नाही थोडी भिती होती.." श्रेयसचे ततपप झाले..
"आमच्या बाबतीत असे नाही वाटले? आणि तिने तू येणार असे घरी सांगितले त्यामुळे त्यांना व्यवस्थित तयारी करता आली.. पण आम्हाला माहीतच नसल्यामुळे आम्हाला काहीच करता आले नाही.. तिला काय वाटले असेल?"
" I am sorry आई.. मी असा विचारच केला नाही.." श्रेयस म्हणाला..
" मग आता करायला शिक.. लग्न करायचे आहे ना?"
" तुम्हाला मान्य आहे?"
" आता तू एवढे तिला घरी आणलेस, म्हटल्यावर आम्ही काय बोलणार?" शोभाताई मस्करीने बोलत होत्या..
" तुम्हाला ती पसंत नाही?"
" आवडली रे.. म्हणूनच तर साडी दिली ना तिला.. आणि बाबा करणार आहेत ना तिच्या घरी फोन.."
" थॅंक यू आई..."
" जा झोप आता.."
शोभाताई आपल्या बेडरूममध्ये आल्या. सुरेशराव जागे होते..
" झोपला नाहीत अजून..?"
" तुला थॅंक यू म्हणायला थांबलो होतो.."
" कशासाठी?"
"मुलाच्या इच्छेला महत्त्व दिल्याबद्दल"
"म्हणजे?"
" मला माहीत आहे तुझ्या मनात श्रेयससाठी दुसरी एक मुलगी होती.. तरिही आज सगळे तू सांभाळून घेतल्याबद्दल.."
" जाऊ दे. आपल्या नशिबात नव्हती ती म्हणायचे.. आता लागू तयारीला लग्नाच्या.. तुम्ही बोलून घ्या तिच्या आईवडिलांशी..."
पुढच्या भागात पाहूया.. या दोघांचे लग्न कसे होते.. पंजाबी पद्धतीने कि महाराष्ट्रीयन...
कथा कशी वाटली ते नक्की सांगा..
तुमचे अभिप्राय लिहायला हुरूप देतात..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा