Login

2 स्टेटस भाग ७

Love Story Of A Couple From Different States


2 स्टेटस भाग ७


मागील भागात आपण पाहिले कि श्रेयस आणि कवलच्या नातेवाईकांना पण लग्नाबद्दल कळले.. उत्साह दोन्ही बाजूंकडून आहे.. लग्नाचा खर्च जरी हे लोक लपूनछपून अर्धा अर्धा करणार आहेत तरी जावयाचा मानपान, कवलच्या शकुनाच्या पाच साड्या , अंगठ्या, मंगळसूत्र घ्यायचेच होते.. आता मंगळसूत्र घ्यायचे म्हणजे तिची पसंती पाहिजेच.. म्हणून श्रेयस त्याचे आईबाबा, कवल तिचे आईबाबा आणि श्रेयसच्या मावशीची मुलगी ऋता असे सगळे खरेदीला गेले.. बघूया खरेदी काय होते?


" आधी काय खरेदी करायचे? कपडे कि दागिने?" सुरेशरावांनी विचारले..
" मी काय म्हणतो, भाईसाब असेही आपल्याला फक्त पैसेच द्यायचे आहेत.. मग या खरेदीत अडकण्यापेक्षा आपण मस्त एका हॉटेलमध्ये बसू.. काही तरी खाऊ पिऊ गप्पा मारू. काय म्हणता?" पापाजींनी विचारले.. बाबांना सुद्धा खरेदीचा कंटाळाच होता.. त्यात लग्नाची खरेदी म्हणजे...
" मी काय म्हणतो," सुरेशराव घसा खाकरत म्हणाले," बसतो आम्ही दोघे हॉटेलमध्ये.. झाली तुमची खरेदी कि फोन करा. पैसे द्यायला येतोच आम्ही.
नाहीतरी बायकांच्या खरेदीतले आम्हाला काय कळते?"
" तुमची खरेदी?" आईने विचारले..
" पाच मिनिटात उरकणार.. तुम्ही दागिने वगैरे घ्या.. आलोच आम्ही.." आणि ते दोघेही बायकांना जास्त बोलू न देता सटकले..
" काय घेणार भाईसाब? एखादी बियर?" पापाजींनी विचारले..
" दुपारी?" बाबा थोडे हडबडले..
"थोडी चलती है.. किसी को पता नही चलेगा.. सच कहूं तो इसिलिए मैने आपको यहां अकेलेमें बुलाया है.."
" काही सिरियस?"
" हा थोडे तसेच आहे.."
" तुम्ही मला टेन्शन देताय.."
" टेन्शन तर आलेच पाहिजे, बहेनजींना कळले तर?"
" बोलून टाका हो पटकन.. बीपी वाढेल आता माझे.."
"अरे भाईसाब, देखो शादी हमारे तरिकेसे हो रही है, तो सब बाते हम करेंगे वैसेही आपभी करेंगे?"
" हो. हो.. पण काय ते सांगा आता?"
" तुमच्याकडचे सगळे पिणार ना??"
सुरेशराव जोरजोरात हसायला लागले..
" तुम्हीपण ना? मी किती घाबरलो होतो.. एवढे काय घाबरवयाचे?"
" अरे थोडेसे हंसी मजाक.. पण घेणार ना सगळे? आता हे बहेनजी समोर कसे विचारणार?"
" मी विचारतो त्यांना.. पण बहुतेक सगळेच थोडी थोडी घेतील.. पण फक्त हळदीच्या दिवशी.. "
" ये हुई ना बात.. घ्या बियर घ्या.."

इकडे बायका साड्यांच्या दुकानात घुसल्या होत्या.. आईने दुकानदाराला पैठण्या काढायला लावल्या.. आणि ममीजींना विचारले,
"ताई तुम्हाला मी साडी घेऊ कि ड्रेस?"
"तुमच्याकडे काय चालेल ते घ्या.."
" हि आमची ट्रेडिशनल साडी आहे.. तुम्हाला आवडेल कि दुसरी कोणती पाहू या?"
" नाही, यातच पाहूया.. अजून कोणते कलर्स असतील तर.."
" आणि कवल तू कोणत्या साड्या घेणार आहेस ते पण बघून घे.. माझ्याकडून पाच तरी आहेत.."
" ओके काकी.." कवल, तिची आई आणि श्रेयस तिच्यासाठी साड्या बघत असताना ऋता आणि शोभाताई नऊवारी साड्या बघत होत्या..
" किती सुंदर आहे न हि साडी.. मरफला ना अरफशीच सारफाडी मारफाझ्या सुरफुनेसारफाठी घ्यारफ्यायची होरफोती.." शोभाताई ऋताला म्हणाल्या..
" मरफग घेरफेना.." ऋताने सांगितले..
" नरफको ग.. आरफापन हौरफेसेनी घ्यायफ्यायची आरफाणी तीरफी नेरफेसणार नारफाही.. नरफकोच.."
समोरचा विक्रेता हतबुद्ध झाला होता..
" तुम्ही मराठीच आहात ना?" त्याने विचारले..
" हो.. का?"
" मग आता कोणती भाषा बोलत होता?"
" अच्छा, ती.. ती आमची सिक्रेट भाषा आहे.. अधूनमधून आम्ही बोलतो.."
" अच्छा.. मग नऊवारीत रंग दाखवू का?"
" नको.. सहावारीतच घ्या.."
तोपर्यंत कवलचीसुद्धा खरेदी झाली होती.. आता मोर्चा वळला सोनाराच्या दुकानात.. तिथे दोघांच्या अंगठ्यांची खरेदी झाली.. ममीजींनी श्रेयससाठी एक छानशी चेनही घेतली.. कवलला मंगळसूत्रांच्या डिझाईन पाहायला सांगून शोभाताई इथे तिथे फिरत होत्या.. फिरता फिरता त्यांची नजर एका हिऱ्याच्या मंगळसूत्रावर पडली.. खरेतर हे असे नाजूक धाटणीचे मंगळसूत्र गेले किती दिवस घ्यायचे त्यांच्या मनात होते.. पण मुलांची शिक्षणे आणि बाकीचे खर्च यात आधी परवडले नसते.. नंतर जे राहून गेले ते राहूनच गेले.. आज तसेच मंगळसूत्र पाहून परत ती आठवण झाली.. पण आता लग्नाचा खर्च होता.. त्यामुळे सुस्कारा टाकून त्या वळल्या.. ऋता , श्रेयस ,कवल आणि तिची आई यांना कोणतीच डिझाईन पसंत पडत नव्हती बहुतेक..
" कवल जे मंगळसूत्र घेशील ना थोडे मोठे घे.. म्हणजे साडीवर छान दिसेल.. हे असे.." त्यांनी एक दाखवले..
" वॉव.. हे इतका वेळ आपल्याला का नाही दिसले.. काकी मी हेच घेते.." कवल म्हणाली..
" आई, या मंगळसूत्राचे पैसे मी देणार.." श्रेयस म्हणाला..
" हो बाबा, तुझी बायको आहे.. दे तूच."
" दादा, हे एक आणि दुसरे ते हिऱ्याचे पॅक कराल?"
" पण श्रेयस मी एकच निवडले आहे.. छोटे मी आईसोबत येऊन नंतर घेणार आहे.." कवल म्हणाली..
" हे दुसरे आईसाठी आहे.." श्रेयस म्हणाला.." मला माहीत आहे आईला ते खूप आधीपासून हवे आहे.. आई प्रत्येक वेळेस पैसे जमा करायची आणि नेमका आमचा काहीतरी खर्च निघायचा.. सो ते घेणे राहूनच जायचे.. मला पण नंतर कधी लक्षात आले नाही.. आज परत जेव्हा आई ते बघत होती.. तेव्हाच मी ते घ्यायचे ठरवले.. हे आईला माझ्याकडून माझ्या लग्नाचे गिफ्ट.."
शोभाताईंचे डोळे पाणावले.. कसेबसे त्या फक्त "थॅंक यू म्हणाल्या.."
" बडा चंगा बेटा है जी.." न राहवून ममीजी सुद्धा म्हणाल्या..
" ऐसा कुछ नही ममीजी.. सच बात तो यह है कि इतना कमाने के बादभी सारा खर्चा तो यह दोनो हि करते है.. माझा पगार फक्त माझ्याकडेच असतो.. पण कधी सुचलेच नाही कि आईला आवडते ती वस्तू घ्यावी.. काही मोठे काम केले नाहीये मी..
चला आणि खरेदी संपली असेल तर बाबांना फोन करतो.. मग घरी जाता येईल.."

बाबा आणि पापाजींची एक म्हणता म्हणता दोन दोन बियर झाल्या होत्या.. त्यांच्या तोंडाला येणारा वास शोभाताईंना खटकला होता.. पण हातात असलेल्या मंगळसूत्रामुळे असलेला सुंदर मूड त्यांना घालवायचा नव्हता.. पण एकूण लग्नात काय होईल याचा त्यांना अंदाज आला.. आणि त्याचे टेन्शनही...
पण आता काय करणार??

लग्नाची खरेदी झाली.. ग्रहमुख झाले.. इथेही शोभाताई आणि सुरेशरावांसाठी आश्चर्याचा धक्का होता.. त्यांना आवडलेल्या नऊवारी साडीबद्दल ऋताने तिच्या आईला सांगितले. मग शोभाताईंच्या बहिणीने ती साडी आणि त्याला साजेसे कद,उपरणे असे खरेदी करून त्यांना आहेर केला.. त्यामुळे लग्न जरी मराठी पद्धतीने होत नव्हते, तरी ग्रहमुख मात्र मराठमोळ्या पद्धतीने पार पाडले.. पुणेरी पगड्या , कद, उपरणे घातलेले हे तिघे ( सुमीतला सुद्धा जबरदस्ती कद नेसायला लावले होते बाकीच्यांनी) आणि सगळे दागदागिने घालून नटलेल्या शोभाताई..

लगेचच यांची सगळ्यांची फार्महाऊसवर जायची तयारी सुरू झाली.. कारण सगळे विधी तिथेच होणार होते.. आपण आता भेटू थेट तिथेच सगाईसाठी...


आजचा हा भाग कसा वाटला नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all