2 स्टेटस भाग २
कवलजीत श्रेयसला घेऊन घरात आली.. तिचे घर बघून श्रेयस थक्कच झाला.. बाजूबाजूचे दोन फ्लॅट एकत्र करून मोठे केलेले घर.. सगळीकडे असलेला अस्सल पंजाबी ठसा..
" अरे पुत्तर, आओ जी अंदर आओ" , कवलच्या वडिलांनी त्याचे जोरदार स्वागत केले. एवढी घट्ट मिठी मारली त्यांनी श्रेयसला कि क्षणभर ते अफझलखान आणि आपण शिवराय आहोत असेच त्याला वाटले. पण तो त्यांच्या मिठीत गुदमरायच्या आत कवलच्या आईने त्याला वाचवले..
" अजी , छोडो उसको. बच्चा घबरा जायेगा.. हे पण ना असे आहेत.. जे दिसेल त्याला अशाच मिठ्या मारतात.."
" इट्स ओके आंटी, मी ठिक आहे." श्रेयस श्वास घेत म्हणाला..
" ये बेटा.. बस.. थोडा नाश्ता कर.. आम्ही थांबलो आहोत तुझ्यासाठी.." परमिंदर प्रेमाने बोलली..
" नाश्ता? आंटी मी घरून पोहे खाऊन आलो आहे.."
" अरे, पोहे काय नाश्ता आहे? कवलजीत नाश्ता आण." पापाजींनी कवलला हाक मारली. ती तर श्रेयसला या दोघांच्या हवाली करून आत पळाली होती..
आतून कवलजीत हातात प्लेट घेऊन आली.. तिने सगळ्या प्लेट्स डायनिंग टेबल वर ठेवायला सुरुवात केली..
" चलो पुत्तर, वहाँ बैठे.. "
तो नाश्ता बघूनच श्रेयसच्या पोटात गोळा आला.. दोनतीन प्रकारचे पराठे,भजी, गाजराचा हलवा ( त्यातून ओतप्रोत वहात असलेले तूप आणि सुकामेवा) , दोनतीन प्रकारची लोणची.. आणि ते लस्सीचे मोठे मोठे ग्लास..
" चलो पुत्तर, शुरू करो..खाते खाते बात करेंगे "
" हे एवढे?"
" इतनासा तो है.. देखते देखते हजम हो जायेगा.. चलो शुरू करो.."
\" हे आमच्या जेवणापेक्षाही जास्त आहे..\" श्रेयस अर्थातच मनातल्यामनात बोलला..
नाश्ता खाण्यापेक्षा कवलला बघणे श्रेयसला जास्त छान वाटत होते. तेवढ्यात सुखविंदरही आला.. पुन्हा एकदा हाय हॅलो झाले. श्रेयसने सुद्धा नाईलाजाने खायला सुरुवात केली..
"तो बेटा, तू हमारी कवलसे शादी करना चाहता है?"
" हा.. जर तुम्ही परवानगी दिली तर."
" आणि नाही दिली तर?" कवलजीत आणि श्रेयस दोघांचेही तोंड उतरले..
"आम्ही अजून तो विचारच केला नाही पापाजी.."
" भागके शादी नही करोगे?" त्यांनी पुढे विचारले.. कवलच्या आईला पण कळत नव्हते काल लग्नाला तयार झालेले हे असे का बोलत आहेत. पण मध्ये बोलायला नको म्हणून ती शांत राहिली.. पळून जाऊन लग्न म्हटल्यावर श्रेयसच्या डोळ्यासमोर हातात लाटणे घेतलेली त्याची आई उभी राहिली.."माँ नही मानेगी." हे शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडले. ते उत्तर ऐकून पापाजी खुश झाले..
" हेच ऐकायचे होते मला.. अरे जो आईवडिलांचा एवढा विचार करतो, तो माझ्या मुलीला खुश ठेवणारच.. हेच बघायचे होते मला.. आमची परवानगी आहे लग्नाला.."
" थॅंक यू पापाजी.." श्रेयस त्या दोघांच्याही पाया पडला..
" देख सुखविंदर, तू पण शिक याच्याकडून काही.."
" आता मी काय केले?" गाडी आपल्यावर वळली हे पाहून सुखविंदर गांगरला..
" ती शर्लिन सतत आपल्याकडे का येते , तू तिथे का जातोस.. हे आम्हाला कळत नाही असे वाटले का तुला? चलो अच्छा है , एक बेटी जायेगी तो दुजी घर आयेगी?"
" पापाजी आप भी ना? मेरा ऐसा कुछ नही है." सुखविंदर तोंडातल्या तोंडात पुटपुटला..
" उसके बारे में बादमें बात करेंगे.. बेटा घरमें कौन कौन है?"
" मी, आईबाबा आणि भाऊ.. आई शाळेत शिक्षिका आहे, बाबा मंत्रालयात आणि भाऊ इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात आहे."
" अच्छा, तू हिच्यासोबत कामाला आहेस म्हणजे तू पण चांगलाच कमावत असशील.. पुढे काय बाहेर जाण्याचा विचार?"
" अजून तरी नाही.."
" अच्छा.. बरं आता मला सांग तुझ्या घरी सांगितलंस?"
" सांगितले आहे.. तुमची परवानगी असेल तर आज कवलला घरी घेऊन जाऊ.."
" जा ना.. आणि आईबाबांना विचार पुढची बोलणी करायला ते इथे येणार कि आम्ही येऊ.."
" नक्की."
" बरे आता तुम्ही गप्पा मारत बसा.. मी हा पहिल्यांदाच आला आहे तर काही तरी खास बनवते.." कवलची आई म्हणाली..
" ममीजी, अभी बिल्कूल जगह नही पेटमें.." श्रेयस पटकन म्हणाला..
" अरे यार, तु भी ना..थोडा पैलवानी वगैरा चालू कर.." सुखविंदर म्हणाला. " चल पंजा लडाते हैं.."
" मी??"
" अरे हो.. आज तूच.. मी आणि पापा नेहमीच खेळतो.. आता तू ही आमच्या फॅमिलीत येणार आहेस तर तू पण सुरुवात कर.."
" भय्या जरा धीरेसे.." कवल घाबरून म्हणाली.
" अरे वा, आतापासूनच एवढी काळजी.." सुखविंदरने चिडवले..
श्रेयसची किरकोळ शरीरयष्टी पाहून त्याला असे वाटले कि याला मी पटकन हरवीन.. पण योगा करत असलेल्या श्रेयसने त्याला टफ फाईट देत हरवले. इतर गोष्टींपेक्षा जास्त या गोष्टीने ते सगळे श्रेयसवर खुश झाले..
" चलो इस बात पर एक एक लस्सी हो जाये.." यावेळेस सुखविंदर म्हणाला..
श्रेयसने डोळ्याने कवलला खुणावले..
" मॉम मी तयार होऊन येते.."
कवल मस्त साडी नेसून, छान वेणी घालून आली.. श्रेयस तिच्याकडे बघतच राहिला.. नेहमी जीन्स टॉप मध्ये असणारी ती आज चक्क साडीमध्ये होती.. आणि छानच दिसत होती.. "चले?"
" अरे बेटा खाना खाके जाते ना?"
" अभी नही ममीजी.. फिर कभी.."
ते दोघेही कारमध्ये बसून निघाले..
" कवल, सॉलिडच दिसती आहेस.. असे वाटते...."
" ते वाटतच राहू दे.. आणि मी काय आजच छान दिसते आहे?"
" तशी तू नेहमीच छान दिसतेस.. पण आजही साडी, वेणी.. 1 नंबर दिसते आहेस..."
" ओहो.. सो आता काय प्लॅन? तुझ्या घरी जायचे आहे?"
" तू सांग.. "
" थोडा वेळ बाहेर फिरूया का? थोडे बाहेरच खाऊ . मग संध्याकाळी घरी जाऊ. तुझ्या घरी चालेल ?"
" आता तुझ्यासोबत आहे तर चालेल.. पण तू घरी सांगितलं आहेस का?"
" तू आज घरी येणार आहेस हे नाही सांगितले.. सरप्राईज देऊ या.."
पुढच्या भागात पाहू श्रेयसच्या घरी कवलजीतचे कसे स्वागत होते ते..
कथा आवडली तर नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा