2 स्टेटस भाग ५
मागील भागात आपण पाहिले कि श्रेयस आणि कवलजीतचा रोका झाला.. आता सुरू आहे त्यांच्या लग्नाची बोलणी.. पाहूया काय होते पुढे..
आमच्याच पद्धतीने लग्न करायचे असे दिलजीत म्हटल्याबरोबर शोभाताईंचा चेहरा पडला.. पापाजी पुढे बोलत होते.."कसं आहे बहेनजी.. लग्नाचा सगळा खर्च आम्ही करणार. मग लग्न आमच्या पद्धतीने व्हायला पाहिजे असे जर मी म्हटलं तर ते चुकीचे आहे का?"
शोभाताईंमधली शिक्षिका जागी झाली.." पण कोणी सांगितले कि सगळा खर्च तुम्ही करायचा म्हणून? आपण अर्धा अर्धा करू.. तुम्हाला पण टेन्शन नाही, आम्हालाही नाही.."
" ऐसी कैसी बात कह रही है बहेनजी.. आमच्याकडे तर सगळा खर्च मुलीकडचेच करतात.." ममीजी म्हणाल्या.. " आम्ही तर कार पण घेणार आहोत.. कोणती घ्यायची ते तुम्ही सांगा.."
" होंडा सिटी.." सुमीत पटकन बोलला.. ते ऐकून शोभाताईंनी रागाने त्याच्याकडे पाहिले.. सुमीत गप्प बसला.. ते पाहून सुखविंदर म्हणाला, "चल मी तुला माझी खोली दाखवतो.. नाहीतरी यांच्या गप्पांमध्ये आपण बोरच होणार.." शोभाताईंनी मानेने होकार दिल्यावर सुमीत सुखीसोबत त्याच्या खोलीत गेला.. ती खोली बघून सुमीत खुश झाला कारण जिथे तिथे कारचे पोस्टर्स लावले होते..
" वॉव.. मस्तच. सॉलिड आहेत रे.. मला ना कार्स खूप आवडतात.."
" मग तर आपले खूप जमेल.. तुला वेळ मिळेल तेव्हा फोन कर.. मित्राचे गॅरेज कम दुकान आहे.. मस्त जुन्या गाड्या बघायला मिळतात.. हवे तर चालवायला पण देईन.."
" ग्रेट.. नक्कीच आवडेल.."
सुमित आणि सुखी जसे तिथून गेले तसे कवल आणि श्रेयसला जाता येत नव्हते.. त्यांना खरेतर लग्न कसे होते यामध्ये काहीच रस नव्हता.. लग्न होणे महत्त्वाचे होते..
" हे बघा, कवलचे आई बाबा, हुंडा घेणारे, लग्नाचा दोन्ही बाजूंचा खर्च करायला सांगणारे लोक असतात.. आम्ही नाही म्हणत नाही.. पण आम्ही त्यातले नाही.. एवढेच सांगावेसे वाटते. आणि कार वगैरे तर खूपच जास्त आहे.. आमच्याकडे आधीच एक कार आहे जी श्रेयस ऑफिसला जाताना वापरतो. माझ्या ऑफिसची कार मला सोडायला आणि न्यायला येते.. त्यामुळे आम्हाला कारची खरेच गरज नाही.. आणि लागली तर ती आम्ही नक्कीच घेऊ शकतो.." सुरेशराव म्हणाले..
" एक बात बोलू भाईसाब.. मला खूप खुशी झाली कवल श्रेयसशी लग्न करणार आहे याची.. आम्ही अशी लोकं सुद्धा पाहिली आहेत ज्यांच्याकडे सगळे काही असून सुद्धा मुलाच्या लग्नात मुलीकडून सगळे घेणारी.. कधी कधी तर मुलीच्या बापाची ऐपत नसताना पण हे सगळे त्याला करावे लागते.. दिल सचमें खुश हो गया आप लोगोंसे मिलके.." दिलजीत आणि परमिंदर दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते..
" अरे असे काही नाही.. मी तर म्हणतो देवाने मला मुलगी दिली नाही, ती कमी हि कवलजीत भरून काढेल.." सुरेशराव म्हणाले..
" पण इथे आपला लग्न कोणत्या पद्धतीने करायचे ते ठरवायचे राहूनच गेले असे नाही का वाटत?" शोभाताई म्हणाल्या..
" त्याचे काय आहे बहेनजी, आम्ही लग्न नाही करून दिले तर आमचे नातेवाईक आम्हाला खूप बोलतील.. समजून घ्या ना.."
शोभाताई काही बोलायच्या आत बाबा बोलले," चालेल, लग्न तुमच्या पद्धतीने करू.."
हे सगळे ऐकत असलेले सुखी आणि सुमित म्हणाले," एक सुचवू का?"
" बोलो, तुमभी बोलो.." पापाजी म्हणाले..
" मला आता सुखी सांगत होता, तुमच्या लग्नात हळदी, मेहंदी, संगीत, सगाई असे खूप काही असते.. माझ्या मित्राचे नवीनच बांधलेले फार्महाऊस आहे.. तिथे हे केले तर? दोन तीन दिवसांसाठी बुक करू.. सगळेच मजा करतील.. आपण ttmm करू. हाय काय आणि नाय काय.."
"Ttmm म्हणजे?"
" आमच्या नातेवाईकांचा खर्च आम्ही करू, तुमच्या तुम्ही.. कोणाला काही कळणारच नाही.."
" हा.. आणि माझ्या मित्राच्या बसेस आहेत.. त्या घेऊन जाऊ.." सुखी म्हणाला..
"It sounds great.." श्रेयस आणि कवलजीत एकदम म्हणाले..
" आयडिया कोणाची?" सुखी आणि सुमित एकदम म्हणाले..
" भाऊ कोणाचे?"
हे असे वाढत जाणार इतक्यात पापाजी म्हणाले..
" मस्त आयडिया आहे.. सुमित बेटा तू विचार तीन दिवसांसाठी ते मिळेल का? मग तसे सगळे ठरवू.."
घरी येताना श्रेयस हवेतच तरंगत होता.. आल्या आल्या तो त्याच्या खोलीत गेला.. सुमित मित्राकडे अभ्यास करायला गेला.. आई बाबा दोघे आपल्या खोलीत बोलत होते..
" तुम्ही लगेच त्यांच्या पद्धतीला होकार द्यायला नको होता.." शोभाताई रुसून म्हणाल्या..
" असा का विचार करतेस तू?"
" मग काय ? माझी हि काही स्वप्ने होती. माझ्या मुलाच्या लग्नात मला नऊवारी पैठणी घालून कारल्याच्या मंडपाखालून प्रवेश करायचा होता.. सगळे दागिने घालून वरमाय म्हणून मिरवायचे होते.. कितीतरी स्वप्ने होती. सीमंतपूजन वगैरे सगळेच विधी करायचे होते.. सगळ्यावर बोळा फिरवलात.." शोभाताई रागावल्या होत्या..
" तुला आठवते, आपल्या लग्नात तुला डाळिंबी रंगाचा शालू आवडला होता.. आणि माझ्या आईने तुला जांभळ्या रंगाचा घ्यायला लावला.."
" कसे विसरीन ते.. सगळ्या लग्नाचा मूड गेला होता.. माझा सगळ्यात न आवडता रंग होता , आहे तो.. पण कोण बोलणार तुमच्या आईला.. मला नाजूक दागिन्यांची आवड तर यांनी सगळे जुन्या धाटणीचे मला दिले.."
" अजूनही वाईट वाटते?"
" कोणाला नाही वाटणार? आपल्या लग्नात तुमच्या घरची मंडळी सतत हे असेच का? ते असेच का? असे म्हणून नावे ठेवत होती.. तो लग्नसोहळा कधी एकदाचा संपेल असे झाले होते सगळ्यांना.."
" इतकी वर्षे झाली आपल्या लग्नाला.. आले का ग हे सगळे तुला विसरता?"
" कसे विसरणार? प्रत्येकजण आपल्या लग्नाबाबत किती उत्साही असतो. पण असे काही झाले कि ती गोष्ट टोचत असतेच ना.."
" तेच सांगायचे आहे मला तुला. माझ्या आईने तुला दिलेला शालू, दागिने पसंत पडले नाहीत तरी घालायला लागले हा सल तुला इतक्या वर्षांनंतरसुद्धा आहे.. तेव्हा तर ना मी एवढा कमवत होतो ना तू.. त्यामुळे ते जे काही करतील ते करून घेणे भाग होते.. आता तर हि मुलगी आणि श्रेयस दोघेही चांगले कमवतात. तरिही आईवडील आहोत म्हणून त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मौल्यवान क्षणांचा फक्त आपल्या हौसेखातर सत्यानाश करायचा का , हे तू ठरव.. आणि आपल्याला दोन मुले आहेत या नाहीतर त्या लग्नात तुझी हौस होईल ही.. पण त्यांना एकच मुलगी आहे ना.. होऊ दे कि त्यांच्या मनासारखे.. आपण पण जरा वेगळ्या पद्धतीचे लग्न एन्जॉय करू.."
"कोणाचीही कशी समजूत घालायची ते तुम्हाला चांगले कळते. आणि हा पंजाबी मुलगी आणतोय घरी तो बंगाली आणतोय कि गुजराती देवच जाणे.. जाऊ दे. नकोच तो विषय. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट राहिली आहे. "
" कोणती?"
" आपल्या सगळ्या नातेवाईकांच्या कानावर हे लग्न ठरल्याची बातमी घालायची.."
"आपण एक काम करू, दोन दिवसांनी बँक हॉलिडे दिसतो आहे.. सगळ्यांनाच जेवायला बोलवू..आणि एकदाच सांगू.."
" चालेल.. मग तसे मॅसेज करते.."
" अजून एक.."
" बोला ना.."
" जरा छान हस.. हसलीस कि छान दिसतेस तू.."
" इश्श.. काहिही.."
कवलजीतच्या घरी...
" चला.. डोक्यावरचे एक ओझे तरी उतरले.."
" डॅड.. मी ओझे आहे का?"
" अग तू नाही.. पण एक गोष्ट नक्की ती माणसे चांगली आहेत.. त्यामुळे थोडा सकुन मिळाला जिवाला.."
" मला फक्त त्याची आई थोडी कडक वाटली.." ममीजी म्हणाल्या..
" हे बघ, त्या शाळेत शिकवतात.. त्यामुळे तुला असे वाटले असेल.. पण ती लोक दहेजच्या विरूद्ध आहेत हे पाहून खूप बरे वाटले.. आता वेळ न घालवता पंडितजींशी बोलून घेऊन मुहूरत काढू.."
" हे भगवान, आपण त्यांच्या नातेवाईकांबद्दल विचारलेच नाही.. कोण कोण आहे.. कोणाला काय द्यायचे?"
" तू तर असे बोलतेस जसे उद्या लग्न आहे.."
" ते तर आहेच.. पण सगळ्यात धोकादायक काम राहिले आहे."
" कोणते?" सगळ्यांनीच एकदम विचारले..
" आपल्या नातेवाईकांना सांगायचे.. मला तर सुखीच्या बुआची खूप भिती वाटते.. त्या त्यांच्या नणंदेच्या जावेसाठी कवलचा हात मागत होत्या.."
" अरे छोड यार.. एक काम करते है, इस शनिचर सबको घर बुलाते है, और एक साथ बताते है.."
" चंगा जी..."
पुढच्या भागात बघू नातेवाईकांची काय रिऍक्शन असेल या लग्नावर..
कथा कशी वाटली ते सांगायला अजिबात विसरू नका..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा