2 स्टेटस भाग ९
एका बाजूला सगळी मुले नदीकाठी मजा करत होते तर दुसरीकडे मोठ्यांची थोडी धुसफूस चालली होती. कवलच्या आत्याला अजूनही तिच्या नातेवाईकाला नाही म्हटल्याचा राग होताच. ती सांगत होती , " इतका खर्च केला लग्नासाठी.. पण तेच जर मुलगा आपल्या जातवाला असता तर किती बरे वाटलं असते ना?" हे सगळे बोलणे पापाजींनी ऐकले. त्यांना कळले हि कुजबुज उद्या मोठी होणार आणि इथे तर अजून दोन दिवस राहायचे आहे.. लग्नात काही अडचण येऊ नये, याची काळजी तर घ्यायलाच पाहिजे होती.. ते पण सगळ्यांमध्ये जाऊन बसले.."मला सांग जिजी. आज आपली गाडी बंद पडली यायला उशीर झाला.. तिथे जर पंजाबी दुल्हा असता तर, त्याने समजून घेतले असते का?"
आत्याची थोडी चुळबुळ झाली. "नाही पण घेणारे असतात ना?"
" तसे नाही,मला सांग तो प्रेस्टिज इश्यू केला असता कि नाही?"
" केला असता.."
"तुला माहिती आहे, या लग्नाचा अर्धा खर्च ते लोक करणार आहेत."
" पण परमिंदर तर बोलली..."
" ते तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून.. पण खरे सांगतो.. माझ्या मुलीला तो मुलगा आवडला.. आम्हाला पण तो आवडला.. एक बिनती करतो.. तिच्या लग्नाची वाट लावू नका.."
" आम्ही वाट लावू? तुला बोलावते तरी कसे हे?" आत्या थोडी दुखावून बोलली..
" जिजी, मी काय बोलते, सोडून द्याना हा विषय.. आपण छान लग्नाला आलोय. सगळेच मजा करत आहेत.. आता कशाला नको तो विषय.. तुम्हीपण सॉरी बोलून टाका जिजीला.." परमिंदर प्रसंग सावरत म्हणाली..
" हां जिजी. माफ करदो.. पण लग्नात नाराज नका होऊ कोणी.." पापाजी हात जोडत म्हणाले..
दुसरीकडे.. श्रेयसचे नातेवाईक..
" ताई, काय ग, काय काय दिले त्यांनी?"
" हे बघ.. मी त्यांना तुम्ही काय देणार हे विचारले नाही.."
" अग पण, काहीतरी बोलणी झालीच असतील ना?"
" नाही ग, बाई.. तुमचे तुम्ही आणि आमचे आम्ही असे ठरले.. आणि हा काय लग्नाच्या आदल्या दिवशी काढायचा विषय आहे का?"
" असे नाही ग, मला वाटले तू स्वतःहून सांगशील. पण कसले काय?"
"ते तसले विषय नकोच आता, चल आवरायला घे, उद्या सकाळी आपल्याला सगळ्यांना आहेर करायचे आहेत.. त्यानंतर हळदीची तयारी करायची आहे.. नंतर ते संगीत पण आहेच.."
" बाकी काही पण म्हण ताई.. लग्न मात्र एक नंबर चालू आहे.."
दुसर्या दिवशी शोभाताईंनी ममीजी, पापाजी, कवलची आत्या, मामामामी, काकाकाकी,मावशी सगळ्यांना बोलावून आहेर केले.. बायकांना छानशा नारायणपेठी साड्या आणि पुरूषांना चांदीच्या छोट्या वाट्या.. कवलच्या आईने सुद्धा श्रेयसच्या सगळ्याच नातेवाईकांना आहेर केला.. दोन्हीकडून आहेर मिळाल्याने सगळेच जरा शांत झाले होते..आहेर, जेवणे झाल्यावर बायका हळदीच्या तयारीला लागल्या.. पुरूषांनी सुखी आणि सुमीतला वेगळ्याच तयारीला लावले..
श्रेयसने पांढरा सदरा घातला होता. कवल छानशी पिवळी साडी नेसून आली होती.. त्यावर ऋतासोबत जाऊन घेतलेले हळदीचे खास दागिनेही घातले होते तिने.. तिचे रूप पाहून तिच्या आत्याने तिची अलाबला काढली.. सगळ्यांनी श्रेयसला आधी हळद लावली.. मग त्याची उष्टी हळद कवलला लावली.. तिथे सुमित, सुखी आणि ऋताने मिळून एक मोठे भांडे भरून हळद भिजवली होती.. मग काय नवरा नवरी सोबत फक्त चारपाच बायका होत्या , बाकी सगळे मिळून रंगपंचमीसारखी हळद खेळत होते.. सुमितच्या विनंतीवरून त्याच्या मित्राने स्प्रिंक्लर चालू केला होता.. त्याचे पाणी सगळ्यांच्या अंगावर उडत होते. वय विसरून सगळे मज्जा करत होते. त्यात सकाळची निर्माण झालेली कटुता कुठच्या कुठे धुवून गेली होती..
इथे कोणाचेच लक्ष नाही , हे पाहून कवलने आणि श्रेयसने सुद्धा गुपचूप एकमेकांना हळद लावून घेतली.. आणि तो क्षण पटकन कॅमेर्यात कैद झाला..
संध्याकाळच्या संगीतासाठी सगळेच उत्सुक होते.. ऋताने त्यासाठी खास सगळ्या ज्येष्ठ बायकांचा डान्स बसवून घेतला होता.. सगळेजण नटूनथटून लॉनवर आले.. सूत्रसंचालनाची जबाबदारी ऋताने घेतली होती.. सुमित आणि सुखी वेगळ्याच मिशनवर होते. त्यांना असे वाटत होते कि बायका लाजून नाचणार नाही म्हणून त्यांनी थोडे 'औषध'??? त्यांच्या सरबतात मिसळले होते.. आणि प्रत्येकजण ते सरबत घेईल अशी व्यवस्था करून आले होते.. पुरूष तर आधीच दों घोट पिऊन बसले होते..
सुरूवात ऋताने स्वतःच्या डान्सने केली..'गोरी गोरी पान' या गाण्यावर तिने आणि सुमितने मस्त डान्स केला. बायकांना सरबत थोडे चढले असावे, कारण शोभाताईंना डान्ससाठी बोलावल्यावर त्यांनी लगेच हो म्हटले आणि सुरेशरावांसोबत 'गोमू संगतीने माझ्या तू येशील का' वर नाचायला सुरूवात केली.. 'दो घूंट मुझेभी पिलादे' वर तर सगळ्याच बायकांनी हंगामा केला.. आणि त्यांची हि मजा सगळेजण रेकॉर्ड करत होते.. ममीजीनी कवलसोबत 'नवराई माझी लाडाची ग' सुरूवात केली.. सुखी आणि सुमितने 'झिंगाटवर' सुरूवात केली.. पण त्यांना कोणी नाचूच दिले नाही.. त्यांच्याआधीच बाकीच्यांनी स्टेजवर ताबा मिळवला होता.. पापाजी आधी नाहीच म्हणत होते.. मग कवलने जाऊन 'पापामें तेरी बिटीया' सुरू केले.. ते गाणे ऐकून कवलकडचे सगळेच रडायला लागले.. मग मात्र मूड हलका करण्यासाठी श्रेयस उतरला.. त्याने गाणे निवडले होते,'मेहेंदी लगाके रखना, डोली सजाके रखना..' रडके वातावरण क्षणात बदलून गेले..
लग्नाच्या दिवशी राहून राहून शोभाताईंना वाटत होते.. आपल्या पद्धतीने लग्न झाले असते, तर आत्ता होणारी नवरी गौरीहर पूजत असती.. तिच्या घरातल्यांनी छान रूखवत मांडले असते.. कारल्याच्या मंडपाखालून मी वरमाय म्हणून मिरवत आत आले असते.. छान नऊवारी नेसून दोघे सप्तपदी चालले असते.. पण.. त्यांनी जोरात सुस्कारा सोडला.. लग्नासाठी घेतलेली पैठणी नेसून सगळे दागिने घालून त्या त्यांच्या खोलीत बसल्या होत्या.. आज त्यांना कोणी त्यांच्या खोलीबाहेर सुद्धा जाऊ दिले नव्हते.. बाहेर काय गोंधळ सुरू आहे.. त्यांना काहीच माहित नव्हते.. त्या बघत होत्या.. सगळ्या मुलींनी, सुनांनी शरारे घातले होते.. मुलांनी शेरवान्या.. त्यांच्या वयाच्या सगळ्यांनी साड्याच नेसल्या होत्या.. पण त्यांना माहित होते कुठेतरी सगळ्यांनाच शरारा घालायचा होता.. पण एका लग्नासाठी कोण घेणार म्हणून त्यांनी घेतले नव्हते.. त्यांना पटकन आठवले, अरे आपण आज श्रेयसकडे गेलोच नाही.. तो मुलगा काय करतोय हे पाहिलेच नाही.. त्या लगबगीने त्याच्या खोलीत जाणार इतक्यात पळत पळत ऋता तिथे आली..
"मावशी कुठे चाललीस?"
" कुठे म्हणजे? श्रेयस काय करतो आहे बघायला नको?"
" नको.. खाली चल.. तुझ्यासाठी एक गंमत आहे.."
" तू बरी आहेस ना? आता विधींना सुरूवात करायची आहे. गंमत कसली?"
"तू चल तर आधी.."
त्या दोघींचा आरडाओरडा ऐकून बाकी सगळेपण आले..
" सगळ्यांनी मंडपात चला.. गुरूजी बोलवत आहेत.."
खोल्यांना कुलुप लावून सगळे निघालेच होते.. मंडपाजवळ येताच शोभाताईंना धक्का बसला.. तिथे छान कारल्याचा वेल सोडला होता.. आणि कवलच्या बहिणींनी पायघड्या घातल्या होत्या.. कवलची आई पैठणी नेसून त्यांच्या स्वागतासाठी उभ्या होत्या.. सोबत कवलची आत्या, मामी वगैरे मंडळी पण होती..
" कैसा लगा हमारा सरप्राईज बहेनजी?"
" काय बोलू.. शब्दच नाहीत माझ्याकडे.." शोभाताईंना खूप भरून आले होते.." थॅंक यू सो मच."
" थॅंक यू, आप ऋता और कवलको बोलिये.. उन दोनोंने मिलाकर ये प्लॅन बनाया था.."
" तुझ्याकडे ना मी नंतर बघते.." शोभाताई ऋताला हसत म्हणाल्या.. "आधी नाही सांगता येत?"
" आधी सांगितले असते तर तुला एवढा आनंद झाला असता?"
शोभाताईंनी प्रेमाने ऋताला मिठी मारली..
आता वेळ आली आहे मंगलघटिकेची. ज्याची आपण सगळेच वाट पहात आहोत..
भेटूया पुढच्या भागात...
हा भाग कसा वाटला सांगायला विसरू नका...
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा