2 स्टेटस भाग ११
कवल आणि श्रेयसचे लग्न झाले. ते दोघे हनिमूनवरूनही आले.. आता सुरूवात झाली त्यांच्या सांसारिक जीवनाला..
"काकी.. सॉरी हा.. मला उशीर झाला उठायला.. काय मदत करू तुम्हाला?" कवलने शोभाताईंना विचारले..
" अग, आता काकी बोलणे थांबव.. आई बोल नाहीतर सासूबाई.. काकी विचित्र वाटते ग." शोभाताई म्हणाल्या.
" हो, काकी सॉरी आई.." कवल हसत म्हणाली..
" आणि ठिक आहे, आज उशीरा उठलीस ते.. मी नाश्ता, आणि डबा केला आहे.. तो करून घ्या. मी निघते. मला नाहीतर शाळेत जायला उशीर होईल. आज तुझा घरात पहिलाच दिवस आहे म्हणून तुझ्यासाठी थांबले होते. आणि अजून एक गोष्ट जाताना भांडी सिंकमध्ये ठेवा.. म्हणजे मावशी घासून ठेवतील.. नाहीतर त्या काही हात लावणार नाही. टेबलावरच्या भांड्यांना.."
" हो आई. बाबा आणि सुमित कुठे आहेत?"
" अग सुमित सकाळी लवकरच कॉलेजला जातो. आणि ह्यांना पण लवकर जावे लागते ऑफिसमध्ये.. तुम्ही किती वाजता निघणार?"
"आज निघू थोडे उशिरा.. उद्यापासून रोजच्याच वेळेस निघू.. "
" ठिक आहे.. मी पण जाते.. फक्त लक्षात ठेवा सांगितलेले.."
" हो आई.."
" तुझी आई गेली आहे.. हे झोपेचे नाटक बंद केलेस तरी चालेल.." कवल श्रेयसला हलवत म्हणाली..
" मी नाटक करत होतो?" श्रेयस डोळे चोळत म्हणाला.
" ना.. अजिबात नाही.. चल आवर लवकर नाहीतर ऑफिसला जायला उशीर होईल.. ऐक ना आज ऑफिसचा पहिला दिवस आहे लग्नानंतरचा.. काय घालू मी? साडी, ड्रेस कि जीन्स?"
" साडी नेस.. मस्त दिसशील..आणि छानसे दागिने पण घाल.."
" पण मला साडी नेसता येत नाही नीट.." कवल तोंड पाडत म्हणाली..
" डोन्ट वरी मॅम.. युवर हजबंड इज ॲट युवर सर्व्हिस.. मी करतो तुला मदत.."
" थॅंक यू.. तू आवर.. मी नाश्ता, चहा टेबलवर ठेवते.." कवल चिवचिवत म्हणाली.. श्रेयस आवरून डायनिंग टेबल वर आला.. तिथे कवल तोंड पाडून बसली होती..
" काय ग काय झाले? आता तर बरी होतीस?"
" काकी म्हणाल्या होत्या, नाश्ता करून ठेवला आहे.. पण इथे हा उपमा आहे.. मला अजिबात आवडत नाही.. आणि मला खूप भूक लागली आहे.." कवल रडवेली झाली होती.
" थोडा खाऊन तर बघ.. माझी आई खूप छान करते.. तुला आवडेल.. नाहीतर दुसरे काही खाशील का बिस्किट वगैरे?" श्रेयसने विचारले.
कवलने एक घास तोंडात घातला..
"ये तो मिठा है. मै नही खा सकती.."
श्रेयसने चव पाहिली.. " अग नाही नेहमीसारखाच आहे.. तुला नाही आवडला तर राहू दे.. आपण जाताना हॉटेलमध्ये काहीतरी खाऊ.."
" मी पटकन तयार होते.. तू तुझा नाश्ता करून घे.." कवल आवरायला गेली.. 'पहिलाच दिवस असा मग बाकीचे कसे?' असा विचार करत श्रेयसने उपमा खायला सुरुवात केली.
बाहेर नाश्ता करायला जायच्या गडबडीत दोघेही डबे घरीच विसरले आणि टेबलावरचा पसाराही तसाच होता.. हॉटेलमध्ये मनसोक्त आलूपराठा खाल्ल्यावर कवलचा जठराग्नी शांत झाला मग तिला ठेवलेल्या पसार्याची आणि विसरलेल्या डब्यांची आठवण झाली.
तिने तसे श्रेयसला सांगितले.
" आई, ओरडतील का रे आता?" ती थोडी घाबरली होती..
" नाही ओरडणार.. मी सांगतो आईला आपण विसरलो म्हणून.." श्रेयस कवलची समजूत काढत म्हणाला खरा पण त्याचा स्वतःच्याच शब्दांवर विश्वास नव्हता..
" हॅलो मॉम.."
" कवल, कधी आलात तुम्ही काल? आता आहेस कुठे?"
" मॉम, काल रात्री खूप उशीर झाला यायला.. आणि आज सकाळी लगेच ऑफिसला आलो.. म्हणून फोन नाही केला.."
" अच्छा.. काही खाल्लेस का? तुला सवय आहे आधी काहीच खायचे नाही. नंतर भूक लागली म्हणून रडायचे.."
" हो मॉम, मी आलूपराठा खाल्ला. " कुठे ते मात्र कवलला आईला सांगावेसे वाटले नाही." आणि अग डबा घरीच विसरले.. आता बघते काय करायचे ते.."
" काही बघू नकोस.. मी सुखीला पाठवते तुमच्या दोघांचाही डब्बा घेऊन.. खाऊन घे.."
" थॅंक यू मॉम.. मला खरेच तुझ्या हातचे खावेसे वाटत होते.. पण तुला त्रास नको म्हणून बोलले नाही.."
" आली मोठी.. त्रास न देणारी.. चल फोन ठेव.. मी काहीतरी पाठवते.. व्हेज.."
तिथे बसलेले पापाजी हे सगळे ऐकत होते..
" क्या हुआ?"
" मुली लग्नानंतर किती बदलतात ना? लग्नाआधी हे करून दे, ते करून दे म्हणणारी माझी मुलगी आता म्हणते तुला त्रास नको म्हणून डब्बा मागवला नाही. चला जाते मी. पनीरपराठा बनवून देते. म्हणजे श्रेयसपण खाईल."
दुपारी सुखीला भेटून, त्याच्यासोबत बोलून, आईच्या हातचा डबा खाऊन कवलला खूप बरे वाटले.. श्रेयस पण तेवढ्यातला तेवढ्यात त्याला हायहॅलो करून गेला..
"कवल संडे का क्या प्लॅन है?" सुखीने विचारले.
" बरा आहेस ना तू? काल तर आलो हनिमूनवरून. आज लगेच प्लॅन?"
" अरे ऐसा नही.. जैसे तू घरसे गई है ना मॉम ना रोती रहती है.. तू आना मिलने. उसकोभी अच्छा लगेगा.." हे ऐकून कवल थोडी इमोशनल झाली.
" मी रविवारी संध्याकाळी येते.. पण काही अजून प्लॅन नको करूस. दोघेही खूप दमलो आहोत तिथे फिरून फिरून. "
" श्रेयस तू घरी फोन केला होतास?"
" नाही ग, तू बघितले ना आज किती काम होते मला. सुखीसोबत पण बोलता आले नाही.. आणि ममीजींना न विसरता माझ्याकडून थॅंक यू सांग पराठ्यासाठी."
" हो ते मी सांगते. ऐक ना सुखी सांगत होता मॉमना सतत रडत असते.. आपण जाऊया रविवारी भेटायला? प्लीज?"
" नक्की जाऊ.."
" थॅंक यू नवर्या."
दोघेही घरी येताना छान हसतखेळत आले. पण घरी परिस्थिती फार वेगळी होती. सुमित हॉलमध्ये त्याचे काम करत होता. बाबा टिव्ही पहात होते.. आई स्वयंपाकघरात काम करत होती.
पुढच्या युद्धाची हि नांदी आहे, हे श्रेयसला कळले होते.. पण या सगळ्यापासून कवल अनभिज्ञ होती.
" बाबा आमच्या ऑफिसमध्ये ना हे स्पोर्ट्सचे नवीन बुक आले आहे. मला वाटले तुम्हाला आवडेल म्हणून मी तुमच्यासाठी विकत आणले.. आवडले तर सांगा, मग मंथली घेता येईल.."
बाबा खुशतर झाले. पण त्यांनी तोंडावर बोट ठेवून आत इशारा केला.
" सासरा काय बोलला, ते लक्षात राहिले, पण सासू काय सांगून गेली ते लक्षात नाही.." शोभाताईंचा आवाज आला.
" सॉरी आई.. मी तुला फोन करणारच होतो. पण कामाच्या गडबडीत विसरून गेलो.." श्रेयसने मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला..
" तू मध्ये बोलू नकोस. मी तिला सांगून गेले होते.. दुपारी शाळेतून घरी आले, तर हा पसारा.. सांगितले होते भांडी सिंकमध्ये ठेवा.. पण नाही. खाल्लेल्या प्लेट्स सुद्धा तशाच.. सगळं मला आवरायला लागले आल्यावर.."
" सॉरी.." कवल कसेबसे म्हणाली.. आणि रडत आपल्या खोलीत गेली.
" बरी जमतात हि रडण्याची नाटके?" शोभाताई अजूनही तणतणत होत्या.
" अग, आता बस करना. किती बोलशील? आज तसा बघायला गेलो तर लग्नानंतरचा तिचा पहिलाच दिवस आहे आपल्या घरातला. त्यावरही तू अशी चिडणार? " बाबांनी श्रेयसला जाण्याचा इशारा केला.. पडत्या फळाची आज्ञा घेऊन श्रेयस तिथून पळाला..
" घ्या तिचीच बाजू घ्या. म्हणजे मला जो त्रास झाला तो काहीच नाही?"
" तुला त्रास झाला नाही, असे म्हणत नाही. पण हे वेगळ्या शब्दात , वेगळ्या पद्धतीने पण सांगता आले असते ना?" बोलून झाल्यामुळे शोभाताईंचा राग थोडा कमी झाला होता.. त्या काहीच न बोलता परत स्वयंपाकघरात गेल्या..
बेडरूममध्ये श्रेयस कवलची समजूत काढत होता..
" नको ना रडू.. आई फटकळ आहे. पण तिच्या मनात काही नसते.."
कवल काहीच न बोलता श्रेयसच्या मिठीत फक्त रडत होती..
" मी सॉरी बोलतो तुला.. हवेतर कान पकडतो.. आता रडणे बंद कर ना प्लीज.."
" माझ्याघरी मला कोणीच बोलले नाही.. सुखीने मला जास्त चिडवले तरी डॅड त्यालाच ओरडायचे.. मला नाही सवय याची.."
" बेबी.. मी सॉरी बोलतोय ना तुला? आणि प्रॉमीस उद्यापासून मी तुला मदत करेन.."
लग्नानंतरचा कवल आणि श्रेयसचा पहिलाच दिवस असा गेला.. नंतर काय होईल.. बघूया पुढच्या भागात..
हा भाग कसा वाटला सांगायला विसरू नका..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा