२७ फेब्रुवारी, कविश्रेष्ठ " कुसुमाग्रज "यांना त्यांच्या जन्मदिवशी विनम्र अभिवादन.
आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी...
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी...
एवढ्या जगात माय मानतो मराठी.
सुरेश भट
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी "कुसुमाग्रज" यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी" मराठी भाषा गौरव दिन " म्हणून साजरा केला जातो.
कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. त्यांना सहा भाऊ व एकुलती एक लाडाची बहीण कुसुम. तिच्या नावावरून म्हणजे कुसुमचे अग्रज. (अग्रज-अग्र म्हणजे आधी, ज म्हणजे जन्मलेला. कुसुमच्या आधी जन्मलेला म्हणजे तिचा मोठा, थोरला भाऊ) यावरून कुसुमाग्रज या टोपण नावाने ते सर्व परिचित झाले.
रूप लावंण्याने मोहरून पार्टीत वावरली मराठी...
सीमोल्लंघन करीत अटकेपार तडपली मराठी...
देहू पंढरीच्या स्पर्शाने गोदातीरी धडकली मराठी...
चकाकणाऱ्या इंग्रजीच्या कुंपणात अडकून हाल सोसते मराठी.
एका व्यक्तीचे म्हणणे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे काम भाषा करीत असते. कोणतीही भाषा ही त्या- त्या मानवी भाषिक समूहाच्या संस्कृतीचे प्रतीक असते. आपली मातृभाषा आपल्यासाठी अधिक महत्वाची असते कारण आपले अस्तित्व खऱ्या अर्थाने तिच्यापासूनच व्यक्त होत असते.
माझ्या मराठीची बोलु कौतुके...
परि अमृतातेही पैजा जिंके...
ऐसी अक्षरे रसिके मेळविण.
संत ज्ञानेश्वर
असे म्हणत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे.
" अमृतालाही पैजेत जिंकणारी अक्षरे "अशी अमृतवाणी ज्ञानेश्वरांच्या प्रत्येक शब्दा शब्दातून व्यक्त झाली आहे.
मराठी भाषा आमची आहे महाराष्ट्राची शान...
भजन, कीर्तन, भारुड ऐकताच हरपून जाते भान...
काना, मात्रा, वेलांटीचे मिळाले आहे वाण...
साहित्य आणि इतिहासातही आहे खूप मान...
अशा मराठी भाषेचा बाळगा थोडा गर्व...
" मराठी भाषा गौरव दिन " आनंदात साजरा करूया आपण सर्व.
कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांमध्ये "कणा "
ओळखलंत कां सर मला........
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा...
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या " कणा "या कवितेतील काही ओळी.
असे हे मराठी भाषेचा "कणा" कविश्रेष्ठ कुसुमाग्रज.
सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना...
तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना.
अशा एकाहून एक सरस कवितेचे रचियेता कुसुमाग्रज.
पुनश्च एकदा कुसुमाग्रज यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.
फोटो- साभार गुगल
सौ. रेखा देशमुख
फेसबुकवरील सर्व ब्लॉग लिंक ओपन होण्यासाठी, आपल्या आवडत्या लेखकाला पाठिंबा देण्यासाठी आणि वाचन अखंड सुरू ठेवण्यासाठी आजच सबस्क्रिप्शन घ्या
Subscription Plan
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा