Login

शशक त्रयी - १ सुरुवात ३ कथा

एकाच वाक्यापासून सुरू होणाऱ्या तीन शत शब्द कथा.. तुम्हाला कोणती आवडली?
ह्यात तीन लघुकथा आहेत ज्यांची सुरुवात एकाच वाक्याने होते पण शेवट वेगवेगळा होतो. तुम्हाला कोणती आवडली?

"बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."


1. नजरभेट


"बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."


आजचा सलग तिसरा दिवस, आधीच बोलके डोळे, मैत्रिणीशी बोलताना अजूनच घायाळ करत होते. तेव्ढ्यात पम्याच्या मागोमाग बसही आली.


ती त्या गर्दीत दिसेनाशी झाली तसा तोही नेहेमीच्या शिताफीने बसमध्ये चढला.


समोर बघतोय तर साक्षात ती.


आता त्याच्या लक्षात आलेलं, डोळ्याच्या कोपऱ्यातून तीही त्याच्याकडेच कटाक्ष टाकत्ये.


चलाख पम्याने संधी साधून त्याला हटकले, "तुझा नवा नंबर ९८३३ ६४३४१२ आहे ना ?"


तीक्ष्ण कानांनी हिनेही नंबर टिपून घेतलेला ह्याच्या डोळ्यांनीही टिपला.


खुशीत शीळ घालत स्टॉपवर उतराला


इकडे हिची घालमेल, आजचा कोर्सचा शेवटचा दिवस, नेहेमीचा तिचा घोळ झालेला ६४३४१२ की ३४६४२१ की ६४३४२१ की ... ?


...................................................


2. निरागस हास्य


"बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."


ती त्याच्याकडेच अपेक्षेने बघत होती.


तिचं निरागस हसू बघून त्याची पावलं सवयीनं तिच्याकडे वळली.


"आज दोन दे .."


टपोरे गुलाब ती देत असतानाच बस आली, तसं घाईघाईने जास्तीची दहाची नोट तिच्या हातात कोंबत तो तिथून सटकला.


"दादा .. दादा .. दहा जास्तीचे... "


तो तसाच बस मध्ये घुसला..


***


दोन स्टॉप आधीच उतरला,


वृद्धनिवासातल्या आर्यमाने आजींचा आज वाढदिवस, आठवणीने आणलेली फुले बघताच त्या अश्रूंच्या मागचा त्यांचा तो हसरा चेहरा ...


एका दगडात दोन पक्षी .. नव्हे...


एका दिवसात फुलवलेली दोन निरागस हास्ये..


समाधानाने तो स्वतःशीच हसला...


.....................................................


3. मायलेक


बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.....


" अरे गणू, कानात हे काय घातलयस? आणि एव्हढी धाप का लागलीय तुला.?"


" आता जायचंय ना त्याची तयारी, रोज जॉगिंग..."


"म्हणजे?."


" पूर्वी उकडीचे किंवा तळणीचे असायचे, आता


खवा, काजू, गुलकंद, झालच तर sugarless... असंख्य प्रकार आणि SOMIच्या फोटोसाठी ही आरास मांडलेली.. राहवत नाही ग ताव मारल्याशिवाय म्हणून तर हा व्यायाम"


"आणि कानातले earbuds, मुंगळा- झिंगाटचा धिंगाणा अति झाला की लताच्या गणराज रंगी वर tune-in करायला.."


तेव्हढ्यात "गणपती बाप्पा मोरया" चा गजर कानावर येतो...


"आली वाटतं मंडळी.. आई येतो ग.. भेटू १० दिवसांनी."

0