सकारात्मक बदल करण्यासाठी ५ पायऱ्या

फेसबुक वर सध्या अश्या खूप पोस्ट्स बघायला मिळतात, माझी चिडचिड होतेय..., मला राग येतोय..., मला निराश ??

फेसबुक वर सध्या अश्या खूप पोस्ट्स बघायला मिळतात, माझी चिडचिड होतेय..., मला राग येतोय..., मला निराश वाटतंय.... अश्या पोस्ट्स वाचताना लक्षात येतं कि अश्या लोकांसाठी नक्की काहीतरी करता येवू शकतं.

त्यांच्या जागी ते बरोबर आहेत. ते ज्या परीस्थितीमुळे असा विचार करत आहेत, ते त्यांच्या दृष्टीने बरोबर आहेत. पण हे हि तितकंच महत्वाचा आहे कि प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजूही असतेच. सध्या कोरोना पँडेमिक आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या बातम्या, माहिती या सगळ्या आपल्या पर्यंत एकदम निराशावादी पद्धतीने पोहोचत आहेत. जश्या कोरोबाधितांच्या बातम्या येत आहेत, तश्याच त्यातून वाचलेल्या , बऱ्या झालेल्या लोकांच्याही बातम्या येत आहेत. पण आपण नेमका फोकस करतो नकारात्मक गोष्टींकडे.

आपल्या पर्यंत पोहोचत असलेल्या बातम्या ज्या माध्यमातून येत आहेत, त्यावरूनही आपण त्या किती खऱ्या आहेत याचा अंदाज बांधत असतो. पण तो अंदाज सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून तयार झालेला असतो.

जर मी तुमच्या समोर फ्रुट सॅलड चा बाऊल ठेवला आणि विचारलं कि यामध्ये स्ट्रॉबेरी चे तुकडे किती आहेत. तर तुम्ही स्ट्रॉबेरी चे तुकडे लक्ष देऊन मोजणार आणि सांगणार. आणि ते मोजताना नकळत पणे तुमचे बाऊल मधल्या बाकीच्या फळांकडे दुर्लक्ष होणार. हे का होतं माहित आहे का, तुमच्या अवचेतन मनाला सूचना मिळाली असते कि स्ट्रॉबेरीचे तुकडे फक्त बघायचे आहेत, आणि मग आपण बाकीच्या फळांकडे दुर्लक्ष करतो.

तसच काहीसं आता या लॉक डाउन काळात होत आहे. आपलं अवचेतन मन त्याच गोष्टी लक्षात घेतं ज्यावर आपण फोकस करतो. आणि आपण फोकस अश्या गोष्टींवर करतो ज्या आपल्याला महत्वाच्या वाटतात. आणि आपल्या कुठल्या गोष्टी महत्वाच्या वाटतात ज्या गोष्टींचा आपल्यावर सतत मारा होत असतो.

आपला फोकस कशावर आहे? ज्या गोष्टीवर आपण आपला फोकस ठेवतो, त्याप्रमाणे आपण अनुभवतो, आणि हाच अनुभव आपल्या आयुष्याचा अनुभव बनतो. मग आता आपण नक्की कशावर फोकस ठेवायचा हे ठरवणं महत्वाचं होणार आहे, नाही का ?

आपण आपल्या मनाचे मालक बनायचं आहे. मला माझ्या आयुष्यात नक्की काय हवंय आजारपण, अनिश्चितता की आरोग्य आणि भविष्यकाळासाठी सकारात्मक उपाययोजना, हे मला माहित करून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी एक प्रयोग आपण करूया. एक वही घ्या आणि खाली दिलेल्या प्रश्नांची त्यामध्ये सविस्तर विचार करून उत्तरं लिहा.

सकारात्मक बदलासाठी ५ पायऱ्या.
१) अश्या गोष्टी लिहून काढा ज्या तुम्हाला बदलायच्या आहेत.
२) त्या बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्न करण्याचे का टाळले ?/ टाळत आहेत? ते लिहून काढा.
३) या गोष्टी जर नाही बदलल्या तर तुम्हाला कुठला आनंद मिळणार आहे? ते लिहून काढा.
४) जर आता तुम्ही नाही बदललात तर तुमचा नक्की काय नुकसान होऊ शकतं ? याबद्दल लिहा.
५) जर तुम्ही बदल घडवण्यासाठी ताबडतोब कृती केली तर तुम्हाला त्याचा जो आनंद आणि फायदे मिळणार आहे त्याबद्दल लिहा.

या नंतर तुम्हाला तुमच्या मध्ये नक्कीच बदल होत जात आहे हे जाणवेल. फक्त मनापासून तुमची बदलायची इच्छा असायला हवी. आणि अर्थात कृती शिवाय या सगळ्याला काही अर्थ नाही.

मी अशी आशा करते कि या प्रश्नांच्या उत्तरातून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि तुम्हाला ठरवता येईल कि आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठल्या गोष्टींवर फोकस करायचा आहे.

तुमच्या यशासाठी, आरोग्यासाठी, तुमच्या सकारात्मक नातेसंबंधांसाठी, तुमच्या आर्थिक समृद्धीसाठी माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

धन्यवाद

NLP Practitioner & Counselor Smita Ajay Chavan