Login

8 ए एम मेट्रो आणि अलौकिक ललित

My Thoughts After Watching The Movie
8 ए.एम्. मेट्रो , चित्रपट आणि ललित
( 8 ए एम मेट्रो आणि अलौकिक)

लेखिका- स्वाती बाळूरकर देशपांडे, सखी


“8 ए.एम्. मेट्रो” सिनेमाचं ट्रेलर कुठेतरी पाहण्यात आलं आणि तो पाहण्याची मनात एक इच्छा जागृत झाली.
मला तसेही व्यावसायिक किंवा गल्लेभरू सिनेमा, मारधाड मसाले सिनेमे, हॉरर कधीच आवडत नाहीत.
सॉफ्ट- हळुवार , साधा , सरळ विचार करायला लावणारा , समांतर सिनेमाच्या श्रेणीतला चित्रपट नेहमीच आवडतो, म्हणजे एखादा सिनेमा पाहून मी कधी कधी दोन-तीन दिवस त्या विचारातून बाहेर येत नाही. त्यातच हरवलेली असते.

ते असंच काहीसं एटीएम मेट्रो पाहिल्यानंतर झालं . चित्रपट पाहताना जणू मी एका वेगळ्याच दुनियेत हरवून गेले
चित्रपटाच्या सुरवातीला एक संवाद ऐकायला मिळतो , तो चुकवायचा नाही.
एखाद्या रात्री कधीतरी शांत नदीत किंवा समुद्रात दोन नौका जेव्हा एकमेकांच्या बाजूने जातात, त्या पार होताना त्यांच्या जो संपर्क येतो तेवढाच काय तो त्यांचा सहवास पुन्हा त्या आयुष्यात कधीही भेटत नाहीत असंच माणसांचं देखील होत असावं, पण माणसं आयुष्यभर एकमेकाना विसरत नाहीत . अशीच आयुष्यात काही माणसे भेटतात जशा दोन नौका समुद्रात भेटतात. हा शॉट पाहून मला कळाले की हा सिनेमा काहीतरी वेगळे दाखवणार आहे.
जीवन प्रवासात देखिल असे भेटलेले सहप्रवासी पुन्हा भेटत नाहीत , पण ते एकमेकाना विसरु ही शकत नाहीत .
इरावती नावाच्या मध्यमवयीन गृहिणीची ही कथा, नांदेड सारख्या गावातून हैदराबादला आलेली, मनात एक दबलेली भीती आणि त्या मेट्रोच्या प्रवासात भेटलेला एक सहप्रवासी , त्याच्याशी झालेली मैत्री, दोघांच्या वेगवेगळ्या विषयांच्या चर्चा , या मैत्रीने तिचा वाढलेला आत्मविश्वास!

कथा कशी हळुवार चालते ना, संथ पाण्यात नाव तरंगवी तशी, शांत चालत जाते आणि मग एक-दोन झटके लागतात.
इरावतीचा तो प्रवास कुठेतरी थांबतो पण ती मैत्री तशीच राहते मनात, आयुष्यभरासाठी!
आयुष्य पुन्हा सुरळीत चालत राहतं तिच्यासाठी पण आता ती पूर्वीची भित्री इरावती नसते; ती खूप काही वेगळी झालेली असते.
एखाद्या माणसाला आपण भेटल्यानंतर आपल्या काहीतरी बदलतं हे नक्की, जे हे मी स्वतः देखील खूपदा अनुभवलेलं आहे म्हणजे एखादं पुस्तक वाचलं तरी तुम्ही अगोदरचे तुम्ही राहत नाहीत तुमच्या काहीतरी बदलत, कधी तुम्ही सुधरता कधी तुम्ही स्वतःच नवीन वर्जन आवृत्ती बनता. कधी आपण काही गोष्टी सोडून देतो ,कधी काही मान्यता तुटून जातात, कधी स्वतःला नव्याने उमगतं .
हा सिनेमा मी एकट्यात पाहिला पुन्हा असं वाटलं एखाद्या अशा व्यक्तीबरोबर पहावा ज्याची विचारसरणी माझ्यासारखीच आहे, त्या दरम्यान तिघा चौघांना हा चित्रपट मी सुचवला असेल.
आणि दुसऱ्यांदा एका जवळच्या मैत्रिणी सोबत नॉनस्टॉप हाच पिक्चर पाहिला तेव्हाचा आनंद वेगळाच. समविचारी लोकांचं असंच असतं. जिथे जिथे म्हणून मी सिनेमा पाहताना घुटमळले आणि अडखळले होते तिथे तीही तशीच ,तोच आणि तसाच विचार करत होती.
यावेळी तो सिनेमा पाहताना असं वाटलं “ऐसे लगा कोई कविता चल रही है बिना रुके, लगा जैसे कोई नज्म बन रही है धीरे धीरे!”
प्रत्येक वेळी स्त्री पुरुष भेटले की ते प्रेम किंवा अफेयर किंवा काहीतरी असं नसतं. कितीतरी वेळा ते माणुसकी, केवळ मनुष्यप्राणी किंवा कधी अलौकिक या स्तरावर काहीतरी असतं. असं माला तरी वाटतं.

त्यानंतर मनात किती दिवसांपासून असलेले एक कवितेचे बीज जे खोलवर रुजलं होतं ते शब्दांचे रूप घेऊन बाहेर आलं .
ते पूर्ण गद्य नाही किंवा पद्य पण नाही ते काहीतरी ललित लेखन आहे जे माझ्याकडून घडलं. मनातले शब्द बाहेर येण्यासाठी काहीतरी निमित्त लागतं.
तुम्ही असा अनुभव कधी घेतलाय का? तुम्हालाही असं वाटतंय का? की नाही. नक्की कळवा.

अगोदर ही कविता वाचा, मनात येणारा विचार नक्की शब्दात मांडा. म्हणजे मला कळेल की माझ्यासारखे समविचारी लोक या जगात किती आहेत !वाचून नक्की प्रतिक्रिया द्या.


आपल्या या लौकिक जगात
अलौकिक गोष्टी कदाचित
आठवत नसतात कारण
संकेत देवाचे ,माणसासाठी
अनाकलनीय असतात!
विचार आला की,

त्या परमात्म्याने
सृष्टी निर्मितीच्या वेळी
कसा पाठवला असेल त्याचा अंश
या पृथ्वी लोकांवर, मनुष्य म्हणून?

नक्कीच, एका आत्म्याचे केले असतील का
अनेक तुकडे किंवा सूक्ष्मखंड ?
आणि विधात्याने विखुरले असतील. . .
हो शिंपडले असतील जगात सगळीकडे!

आता इथे पृथ्वीतलावर काय होतं ?

जगता जगता कधीतरी अचानक
आपल्यातलाच त्यावेळी दुरावलेला एक तुकडा
भिडतो, भेटतो, गवसतो
या गर्दीत एक दिवस !

आत कुठेतरी खोलवर
ओळख जागृत होते, कधी पटकन तर
कधी कधी उशीरा . . .
वेळ लागतो. . .

त्या पारलौकिक तुकड्याला ओळखण्यासाठी . .
कारण इथले मानवी लौकिक आवरण असते ना!

पण तरीही -
आत्म्याची ओळख पटतेच
आणि ती पटली की जगणं सुसह्य होतं,
जीवन जणू सोहळा होऊन जातं !

पण हो -
या अशा लोकांना जिवंत राहणं,
या जगात सामान्य राहणं, अवघड होऊन जातं .
इथले पाश झाकोळतात ती जुनी ओळख!

त्या अंतरातल्या आत्म्याच्या खंडाला हवी असते मनशांती अलौकिक,
तो भटकत असतो आत्मिक शांतीच्या शोधात!

इथलं पृथ्वीवरचे शरीर ,आर्थिक विषमता,
काळा गोरा, नर मादी असणं किंवा जाती धर्म
जाणीव करून देत राहतात
त्या नात्याची, बंधनांची, प्रतिष्ठेची आणि समाज प्राप्त मान्यतांची!

तरीही करतोच एखादा जीव विद्रोह कधी तरी
आणि ओढला जातो ,जोडला जातो
त्याच्या त्या तुकड्याशी,
मिळवतो आत्मिक आनंद!

बाकी ओळख न पटलेले अनभिज्ञ जीव
तरंगत राहतात इथल्याच लौकिक,
बेगडी नात्यांमध्ये,
आणि या समाजमान्यतांमध्ये!

दैवाचे संकेत कळूनही
निर्णय घ्यायला लागते धाडस कधी
पण ते धाडस आणि ती प्रबळ इच्छाशक्ती
देणारा देखील तोच असतो, सृष्टीचा निर्माता!

त्या दोन आत्म्यांच्या खंडांच
ओळख पटून,
एकमेकांना भेटणं किंवा
साधं बोलणं देखील
त्या परमात्माशी
एकरूप होण्यापेक्षा कमी नसतं!

त्या अलौकिक आनंदासाठी
फक्त व्हायला हवी
ती अलौकिक जाणीव,
पटायला पाहिजे ती दैवी ओळख!


©® स्वाती बालूरकर,सखी
(लेखन दिनांक ०७.१२.२४)
प्रकाशन 03.02.25