नेहमीप्रमाणे ती पहाटेच उठली होती. घरात शांतता होती, पण तिच्या मनात मात्र #कामांची यादी गोंधळ घालत होती. आंघोळ करून तिने पदर खोचला आणि #स्वयंपाकघरात प्रवेश केला. आज रविवार. बाकी सगळ्यांना विश्रांतीचा दिवस... पण तिच्यासाठी नेहमीपेक्षा जास्त धावपळ.
काही नातेवाईक येणार होते. म्हणून झोप तिला लाभलीच नाही. घरातल्यांचा चहा, नाश्ता, प्रत्येकाच्या खास आवडीनिवडी... तिच्या वेळेच्या काट्याला अकरा वाजले होते, पण तिच्या स्वतःसाठी एक घोट चहाही झाला नव्हता.
दुपारी पाहुणे आले. बाहेर हशा-पट्ट्या, गप्पांचा गोंगाट, फोटो काढणं, आठवणींमध्ये हरवलेली मंडळी. आणि ती मात्र अजूनही भांड्यांमधून वाफ निघतेय, की ओट्यावर मसाल्यांचा गंध दरवळतोय, तिथेच अडकलेली.
शेवटी जेवण झालं, सर्वजण तृप्त होऊन टेबलवर बसले. पण ती? तिचं लक्ष अजूनही "साखर कमी पडली का?", "पाणी द्यायचं राहिलं का?" यावरच. वेळ निसटून जात होता… आणि तिचा रविवार, तो कुठेच नव्हता.
संध्याकाळी पाचच्या सुमारास घर पुन्हा निवांत झालं. पाहुणे निघाले. घरात शांतता पसरली. आणि तिच्या अंगातल्या थकव्याने पूर्ण शरीर व्यापलं. डोळे मिटत होते, पाय थबकले होते.
इतक्यात तिची लेक धावत आली — “मम्मा! चहा दे ना… पियचंय मला!”
तिने डोळे मिटून थोडा सुस्कारा टाकला. आता पुन्हा उठावं लागणार, असं वाटत असतानाच...
तो समोर आला — हातात चहाचा ट्रे.
ती #थबकली. गोंधळली. “अरे, येतच होते मी...”
पण तो हसून म्हणाला, “नो वे! सकाळपासून सगळं तूच करते आहेस. आम्ही फक्त खाल्लं, हसलो, गप्पा मारल्या... तू मात्र थांबलीच नाहीस. अख्खा रविवार गेला आणि तुला सुट्टीची मजा मिळालीच नाही. म्हणून म्हटलं, काही नाही, पण एक कप चहा तरी तुला मी देऊ शकतो ना?”
त्याने चहाचा कप तिच्यासमोर धरला.
तिने हळूच एक घोट घेतला... आणि त्या वाफाळत्या कपातून जणू तिच्या शरीरात एक नवीच ऊर्जा उतरली. चेहऱ्यावर समाधान पसरलं.
“उम... एक नंबर झाला आहे चहा,” ती म्हणाली. डोळा मिचकावत पुढे हसून बोलली, “असा आयता चहा पियायची मजा वेगळीच असते. आज पहिल्यांदाच कळलं.”
तो खळखळून हसला.
त्या क्षणी दोघांमध्ये शब्द नव्हते, पण एक न बोललेली समजूत होती कधीकधी प्रेम एक कप चहातही सांडून जातं… आणि त्या एका कपातूनही संपूर्ण दिवसाचा थकवा विरून जातो..