मायबाई (भाग 1)
(सदर कथा ही काल्पनिक असून त्याचा सत्यघटनेशी काहीही संबंध नाही. तसेच ह्या कथेद्वारे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा लेखिकेचा हेतू नाही.)
रखमाबाईचं कलेवर बैठकीच्या खोलीत खाली ठेवलं होतं. रखमाबाईचा नवरा पांडू येणाऱ्या जाणाऱ्याशी खालमानेनं बोलत होता. तिची सर्वात मोठी लग्न झालेली लेक उषा आईच्या उशाशी टाहो फोडून रडत होती. सोळा वर्षांचा मुलगा रमेश आलेल्या लोकांबरोबर अंत्ययात्रेची तयारी करत होता. धाकटी सहा वर्षांची लेक नमिता अंगणातल्या कोपऱ्यात एकटीच माती खेळत होती.
आलेल्या प्रत्येकाचं लक्ष मात्र दहा वर्षांच्या शोभाकडं होतं. शोभा ही पांडू अन् रखमाबाईची तिसऱ्या नंबरची मुलगी! तिचं शारीरिक वय जरी बारा वर्षांचं असलं तरी मानसिक वय फक्त चार वर्ष होतं.
"आई व्हती तवर समदं ठीक व्हतं. आता ह्या शोभीकडं कोण पायणार?" मयतीला आलेल्या बायाबापड्या कुजबुजत होत्या. "थोरली उषा लग्न होऊन गेली. आता घरात बाप्यांचं राज्य! धाकली नमी फार लहान हाय! बाप अन् भाऊ मिळून कसं सांभाळतील शोभीला?" एकीनं चिंता व्यक्त केली.
"व्हय तर! आत्ता चार दोन वर्षात शोभी शहाणी हुतीय.. पण हे शहाणपण सोसंल व्हय तिला?" बायका एकमेकीत खुसफूस करत असल्या तरी पांडूच्या कानावर बऱ्याच गोष्टी पडत होत्या.
शोभाला मात्र घरात नेमकं काय चाललंय ह्याची अजिबात कल्पना नव्हती. तिला फार भूक लागली होती. आई आता झोपली आहे, उठल्यावर आपल्याला खाऊ घालेल ह्या आशेवर ती नुसतीच दोन्ही हाताने डोकं कराकरा खाजवत बसली होती.
"राम नाम सत्य है" चा गजर करत चौघांनी तिरडी उचलली अन् शोभाचा संयम संपला. डोक्यातले दोन्ही हात काढून तिनं तिरडीकडे झेप घेतली.
"आय वं! कुठी चालली वं? मले भूक लागली.. मला खायले दे पयले!" म्हणत ती तिरडीमागं धावू लागली. तिचा हंबरडा ऐकून बायाबापड्यांनी पुन्हा एकदा डोळ्यांना पदर लावला.
आता तिची उषाताई पुढं झाली. तिनं शोभीला जवळ घेतलं. आपल्या साडीच्या पदरानं तिचं रडता रडता वाहणारं नाक स्वच्छ केलं अन् ती तिला अंघोळ घालायला घेऊन गेली.
उषाला माहेरी येऊन आता महिना उलटून गेला. "बाबा, आता मला माझ्या घरी जायला हवं." एक दिवस तिनं वडीलांजवळ विषय काढला.
"व्हय पोरी! तुला बी तुजा संसार हाय! आमचं सैपाकपानी करायला किती दिवस थांबशीन? तू उद्याच तुझ्या मालकाला बलावून घे." वडिलांनी संमती देताच तिनं फोन लावून नवऱ्याला बोलावून घेतलं अन् ती दोघं तिच्या सासरी रवाना झाली.
आता पांडूची खरी पंचाईत होऊ लागली. घरात बाईचा वावर असणं म्हणजे काय हे त्याला पुन्हा एकदा नव्यानं उलगडलं.
अवघा सोळा वर्षांचा रमेश आता शोभा अन् नमीची आई झाला. दोघींचे केस विंचरून उवा काढून वेण्या घालण्यापासून ते रोज भाकरी थापण्यापर्यंत सगळं काही करू लागला. पांडू रोज मजुरीला जाई.
एक दिवस पांडू नेहमी प्रमाणे मजुरीला गेला अन् रमेश मित्राच्या लग्नासाठी शेजारच्या गावी निघाला. "पोरींनो, कुठंबी बाहेर जाऊ नका. मी येतोच संध्याकाळी!" त्यानं शोभा अन् नमीला बजावून सांगितलं.
रमेशला बाहेर जाताना बघून त्याचा जिवलग मित्र सुरेश लागलीच घराकडे आला.
"रम्या हाय काय घरात?" त्यानं बाहेरूनच आरोळी ठोकली.
"न्हाई, दादा बाहेरगावी गेलाय.. संध्याकाळपतूर येईल म्हणलाय!" नमीनं बाहेरूनच उत्तर दिलं.
"मंग काय घरात तुमी दोगीच का?" सुरेशने घरात डोकावत विचारलं.
"व्हय.. दादानं सांगितलंय कुटंबी बाहेर जाऊ नगा म्हणून!" नमीनंच उत्तर दिलं. ती जरी शोभाची धाकटी बहीण असली तरी त्या चिमुरडीला आता ताईची भूमिका निभवावी लागत होती.
"मी येऊ का आत?" सुरेशनं विचारलं अन् उत्तराची वाट न बघता तो सरळ घरात शिरला.
"काय करतीय शोभी? चॉकलेट खाणार का बिस्कीट?" सुरेशनं विचारायचा अवकाश की शोभानं "मले चॉकलेट पायजे!" म्हणून ओरडा सुरू केला.
लागलीच सुरेशनं खिशातून पन्नास रुपयांची नोट काढून नमीला दिली. "जाय.. तू मस्त आईस्क्रीम खाय अन् तुज्या आक्कीले चॉकलेट घिऊन ये जा!" म्हणत नमीला बाहेर पिटाळण्याचा प्रयत्न केला.
"दादानं कुटं जाऊ नगा म्हणून सांगितलंय.." नमीनं विरोध करण्याचा प्रयत्न केला.
"आण इकडं ती नोट! नगं आणूस चॉकलेट म्हणत सुरेशनं तिच्या हातून नोट ओरबाडून घेतली.. तेवढ्यात शोभानं "चॉकलेssट " म्हणून भोकाड पसरलं.
"आक्की, मी आत्ता येतीय.. " म्हणत नमी पळत घराबाहेर पडली. थोडं दूर जाताच तिला हातात सायकल धरून तिचा दादा येताना दिसला.
"नमे, बाहेर जाऊ नगा म्हणून सांगितलं तरी कुटं चालली तू? आणि शोभा कुठाय? तिले एकटीले काहून ठेवलं?" रमेशनं काळजीनं विचारलं.
"न्हाई दादा, एकली न्हाई ती.. सुऱ्यादादा हाय तिच्यासंगं!" नमीनं भाबडेपणानं सांगितलं.
रमेशनं तशीच सायकलवर टांग मारली अन् भराभर पैडल मारत तो घराकडे निघाला.. नमी "दादा.. दादा" करत सायकल मागे धावतेय ह्याचंही भान त्याला उरलं नाही.
घरी सुरेशनं दाराला आतून कडी घातली होती. रमेशनं दारावर धडका मारून दार उघडलं.. अन् सुरेश शर्टाची बटणं लावत घाईघाईनं बाहेर पडला.
क्रमशः
© कल्याणी पाठक
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा