Login

मायबाई (भाग 3)

एका मनोरुग्ण मुलीचा मायबाई होण्यापर्यंतचा प्रवास

मायबाई (भाग 3)

उषाचं काम आता आणखीनच वाढलं. शोभाच्या तारखांकडे लक्ष देणं.. तिची स्वच्छता राखणं आणि तिला जमेल तशा चार समजुतीच्या गोष्टी सांगणं! उषाचा दिवस वाऱ्याच्या वेगाने पळू लागला. 

एक दिवस भर दुपारी नमी शाळेत गेली अन् उषा नवऱ्यासह शेतात! तिची सासू देखील मंदिरात कीर्तनाला जाऊन बसली. विटाळशी शोभा घरी एकटीच होती. बऱ्याच वेळाने उषाची सासू घरी आली तर घरात हाss पसारा पडलेला! 

शोभाची चटई पाण्याने ओली झाली होती. पाण्याचा तांब्या आणि भांडं घरंगळत जमिनीवर लोळत होतं. आजूबाजूच्या वस्तू वेड्या वाकड्या पडल्या होत्या. शोभाने रडून रडून आकांत मांडला होता. तिचे रडून सुजलेले डोळे, विस्कटलेले केस अन् अस्ताव्यस्त कपडे बघूनच आत्याबाईंचा संताप अनावर झाला.

"शोभे, काय केलं हे? शिवलीस का तू कुठे?" आत्याबाईनी करड्या आवाजात विचारलं. शोभा रडत रडत पाण्याच्या तांब्याभांड्याकडे बोट दाखवून तहान लागल्याचं सांगण्याचा प्रयत्न करू लागली.

"आत्याबाई, आक्कीला तहान लागली असेल.. पाणी सांडलं म्हणून तिनं आपल्या हातानं पाणी घ्यायचा प्रयत्न केला असेल!" मागून आलेली नमी उषाच्या सासूला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागली. पण सासूनं कपडे वाळत घालण्याची काठी उचलून शोभाला बेदम मारहाण करायला सुरूवात केली.

शोभा घाबरून घराबाहेर पळाली.. ती परत घरात यायला तयार होईना.

"ही अवदसा माझ्या घरात नको! दोगी भैनीना त्याईच्या बा च्या घरी पाठवून द्या!" ह्यावर उषाची‌ सासू ठाम होती.

"आई, शोभाला समजत न्हाई.. पर तू तर शायनी हाईस.." शोभाचा नवरा आज पहिल्यांदाच आईसमोर बायको अन् मेव्हणीची बाजू घेऊन बोलला. आगं शोभाची सेवा म्हंजे देवाची सेवा!" त्यानं आपल्या परीनं आईला समजावून बघितलं.

"माझी बहीण इथे राहणार नसेल तर मी देखील इथं राहणार नाही!" उषानं शेवटचा घाव घातला. आई अन् बायको ह्यांच्यात पिचलेल्या उषाच्या नवऱ्यानं शेवटी बायको अन् मेव्हण्यांसह शेतावरच्या घरात मुक्काम करायचं ठरवलं.

ही बातमी कळताच उषाचा भाऊ रमेश धावत पळत उषाच्या गावी आला. "ताई, मी दोघीस्नी गावी घेऊन जातो!" रमेशनं निर्वाणीचं सांगितलं.. "बाबा माझं लगीन लावून देतो म्हणतात.. मग ह्या दोघींकडे बघायला त्यांची वैनी असंल."

उषा हसली.. "असं कुणी कुणाचं करत नसतं बाबा! जिथं माझ्या सासूला स्वतःला‌. पोरगी असून ह्या अजाण लेकराची कीव आली नाही तिथं तुझी बायको आपल्या ह्या अर्धवट नणंदेला सांभाळील का? त्यापेक्षा तू लग्न कर.. सुखाचा संसार कर.. मी शोभाची दुसरी सोय बघते." उषानं भावाला रिकाम्या हाती रवाना केलं.

शोभा जरी अर्धवट असली तरी हल्ली तिचा जरासा बदललेला नूर उषाला जाणवू लागला होता. हल्ली तिचे कपडे ती नीटनेटके ठेवी. स्वतःच्या हाताने पावडर कुंकू करून नीट तयार होऊन बसे. उषा अन् तिचा नवरा शेतात राबत असले की ही देखील तिथेच झाडाखाली बसून राही.

अन् एक दिवस अघटीत घडलं. 

शोभा झाडाच्या सावलीत बसली असताना कुठूनसे दोन काळे कुळकुळीत नाग येऊन शोभाच्या आजूबाजूला येऊन बसले. त्यांना बघून शोभा टाळ्या पिटू लागली. त्यांच्याशी अगम्य भाषेत काही तरी बोलू लागली. 

शेतावरच्या गड्यांनी हे बघितलं अन् ते लागलीच झाडाजवळ आले. त्यांनी शोभाला ओढून दूर नेलं अन् ते त्या नागांना हुसकावून लावलं. हे बघून शोभाने आकांत केला. 

"कुठून कसा नागाचा जोडा आला अन् शोभाच्या जवळ बसला!"

"शोभा घाबरली नाही.. उलट त्यांच्याशी गप्पा करत होती!"

"त्या नागांनी म्हणे शोभा समोर आपला फणा टेकवून नमस्कार केला."

"कितीही हुसकलं तरी ते नाग काही जायला तयार नव्हते.. शेवटी शोभानं त्यांना जाण्याची आज्ञा केली अन् मग ते तिथून निघून गेले!"

एका साध्या गोष्टीला मीठमसाला लावून ती गोष्ट अधिकाधिक रंगतदार करत अन् आपापल्या पदरचा अधिकचा मसाला घालत ही गोष्ट पंचक्रोशीत पसरली.

लोक आता मुद्दामच शोभाला‌ बघायला शेतावर येऊ लागले. 

"अहो, शेताची नुकतीच नांगरणी झाली होती.. त्यात रात्री पाऊस आला.. सापांच्या बिळात पाणी शिरलं तर ते बाहेर येणारच ना!" उषानं लोकांना समजावून पाहिलं.. पण ते काही लोकांच्या पचनी पडलं नाही.

क्रमशः

© कल्याणी पाठक

0

🎭 Series Post

View all