Login

मायबाई (भाग 5 व अंतिम)

एका मनोरुग्ण मुलीचा मायबाई होण्यापर्यंतचा प्रवास

मायबाई (भाग 5 व अंतिम)

दुसऱ्याच दिवशी पासून शोभानं काय काय चमत्कार केले ह्याची रसाळ वर्णनं पंचक्रोशीत पद्धतशीरपणे पसरू लागली.

शोभाकडे दर्शनासाठी लोकांची रीघ लागे. लोक धक्काबुक्की करत. गर्दी बघून शोभा चिडून जाई. हातात येईल ती वस्तू त्यांना फेकून मारे.

एकदा दर्शनाला आलेल्या गीताला तिनं जवळचं भांडं फेकून मारलं.. त्याच दिवशी तिचं लग्न ठरलं. एक दिवस तिनं तिच्या पायावर डोकं ठेवलेल्या गण्याला रागारागानं केसाला धरून तिनं उठवलं अन् एक सणसणीत थोबाडीत ठेवून दिली. दुसऱ्याच दिवशी त्याला लॉटरी लागली. एक दिवस शोभा कुणाच्या अंगावर थुंकली तर त्याचा कित्येक दिवसांचा आजार गेला अशा प्रकारच्या बातम्या कर्णोपकर्णी जाऊ लागल्या.

इकडे उषा आणि नमी मात्र हतबल होत्या. सुरूवातीला कडवा विरोध करूनही लोकक्षोभापुढं त्यांचं काहीच चाललं नाही.

हळूहळू उषाच्या शेतातील घराचं एका छोटेखानी आश्रमात रूपांतर झालं.. अन् अर्धवट म्हणून हिणवलं गेलेल्या शोभाची आता मायबाई झाली. मायबाईचा आश्रम म्हणून त्या घराला तीर्थक्षेत्राचं रूप आलं.

ज्या मासिक पाळीच्या काळात पाण्याला शिवली म्हणून शोभानं बहिणीच्या सासूचा बेदम मार खाल्ला.. त्याच मासिक पाळीच्या काळात तिच्या अंगात देवी येते म्हणून तिची पूजा होऊ लागली. मायबाईच्या मासिक पाळीचा देखील उत्सव साजरा होऊ लागला. त्या चार दिवसात तिथे जत्रा भरू लागली.

शोभाला पुरणपोळी आवडते म्हणून तिच्यासाठी रोज पुरणपोळीचा नैवेद्य येऊ लागला. रोज रोज गोड खाऊन कंटाळा आला की शोभा रागारागाने नैवेद्याचे ताट फेकून देई. मग कुणीतरी पिठलं भाकरी अन् मिरचीचा ठेचा घेऊन आलं. 

आता कधी पुरणपोळी तर कधी झुणका भाकरी असा रोज आयता बेत होऊ लागला. मायबाईसमोर धान्य, फळं, पैसे ह्यांची रास उभी राहू लागली. मायबाई जवळ बोललेला नवस पूर्ण झाला की तिच्या अंगावर सोन्याचांदीचे दागिने चढू लागले.

उषाचा नवऱ्यानं दुसऱ्याला शेती कसायला देऊन दिली अन् तो स्वतः मायबाईचा मुख्य सेवक बनला. रमेशचं लग्न झालं अन् त्याची बायको अन् तो मायबाईच्या आश्रमात येऊन राहिले.

मायबाई काही असंबद्ध बोलली की ते उलगडून सांगण्याचं काम पांडूने हाती घेतलं. तिच्या अस्पष्ट उच्चारांतून जीवनाचं महान तत्वज्ञान आकाराला येऊ लागलं.

मायबाईला रोज उटणं लावून सुगंधी शिकेकाईने न्हाऊ माखू घालण्यासाठी बायकांमध्ये चुरस निर्माण झाली. मायबाईचा रोजचा शृंगार करण्याचं काम आपल्याकडून होत नसतानाही उषाच्या सासूनं शेजारणींच्या मदतीनं हाती घेतलं.

लहानग्या दहा वर्षांच्या शोभाला चॉकलेटच्या बहाण्याने दार लावून अश्लील चाळे करणारा तिच्या गावचा सुरेश मायबाईच्या दैवी रूपाला घाबरून तिच्या पायांशी लीन झाला. 

भीमा गड्यानं तर कधीचीच शरणागती पत्करून मायबाईची सेवा पत्करली होती.

उषाचा नवरा, रमेश अन् पांडू तिघांच्या अंगावर तलम धोतरं अन् अंगरखे आले. रमेशची बायको देखील दागिन्यांनी लगडली. चौघांच्या बोटात ठळक अंगठ्या अन् गळ्यात जाडजूड सोन्याचे गोफ सजले. 

रोज रोज दूध तूप खाऊन साऱ्यांच्या तब्येती सुधारल्या. 

सगळीकडे आनंदी आनंद पसरला होता. आनंदी नव्हत्या त्या फक्त उषा आणि नमी.

"दादा, दाजी.. तुम्ही आक्कीचं हे काय करून ठेवलं? तिच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टींना तुम्ही मुद्दाम वेगळं वळण देऊन तिला पैसे कमावण्याचं  साधन बनवलंत!" एक दिवस नमिनं लहान तोंडी मोठा घास घेतलाच.

"तुम्ही एका वेडसर मुलीचा अंधश्रद्धेसाठी वापर करून तिच्या आयुष्याशी खेळलात!" उषा संतापानं लालीलाल झाली होती.. "मी एकही क्षण इथं राहणार नाही.." उषा नेसत्या वस्त्रानिशी  घराबाहेर जायला निघाली.

"थांब, उषा! थोडं ऐकून घे!" वडिलांचा आवाज ऐकून उषानं पाय मागं घेतला.

"ताई, आपण शोभीला जन्माला पूरू शकत नव्हतो. बाहेर माणूस म्हणवणारी श्वापदं संधी साधून तिच्या अब्रूवर हात टाकायला तयारच होती. आपल्या माघारी तिला कोण हा प्रश्न होताच. आता बघ, आपली येडी शोभी साऱ्यांची माय झालीय.. मायबाई झालीय." रमेशनं त्याची बाजू मांडली.

"उषे, पुरुषाला बाई फक्त दोन रूपात दिसतेय बघ.. एकतर तिच्या शरीराच्या रूपात नायतर देवीच्या रूपात! मधलं माणूस रूप त्याला दिसतच नाही बघ. आता आपली शोभी देवीच्या रूपात पक्की बसलीय.. आता ती सुरक्षित हाय.. आता तिच्याकडं वाकड्या नजरेनं बघण्याची कुणाची बी हिंमत व्हणार नाय. तिच्या जेवायखायची सोय बी समदी करून दिलीय.. तिला जिती असेतोवर काय कमी पडणार न्हाई.. रोज गोडधोड जेवेल ती.. अन् मेली तरी त्याचा उत्सवच होईल बघ!" उषाच्या नवऱ्यानं देखील त्याचं मत मांडलं.

आपलं शिकलेलं मत खरं का ह्या अडाणी माणसांनी आपल्या परीनं शोभाच्या भावी आयुष्यासाठी घेतलेला निर्णय योग्य ह्या द्विधा मनस्थितीत आजही उषा उभी आहे.. 

शोभा मात्र मायबाई म्हणून परिसरात प्रसिद्ध झाली आहे. देवीचा अवतार म्हणून पूजली जाऊ लागलीय.. तिचं मंदीर बांधलं गेलंय.. तिच्यावर स्तुती, स्तोत्र, आरत्या, पोथ्या लिहिल्या गेल्यात अन् तिची जन्मभराची ददात मिटलीय.

समाप्त.

©कल्याणी पाठक 

0

🎭 Series Post

View all