संध्याकाळ सरली. सारंग अभ्यास करत होता, आणि शुभदा बाई त्याच्याजवळच शांत पडून होत्या. घरात हलकी गोड शांतता होती. पण मनात मात्र, शुभदा बाई काही तरी वेगळं अनुभवत होत्या.
रात्री जेवण झाल्यावर सारंग आपल्या आईला म्हणाला, “आई, उद्या आमच्या शाळेत ‘आजी-आजोबा भेटी’चा दिवस आहे. माझी आजी येणार ना?”
आई थोडं गडबडली.
तसा सारंग आजीजवळ जात म्हणाला "आजी, तुला जमतं का गं यायला? फार वेळ लागणार नाही…"
शुभदा बाई थोड्यावेळ गप्प राहिल्या. मग म्हणाल्या, “मी येईन... माझ्या सारंगसाठी हे खूप महत्त्वाचं आहे.”
दुसऱ्या दिवशी शुभदा बाई साडी नेसून तयार झाल्या. केसात गजरा, बटव्यात जुना रमेशचा फोटो, आणि मनात थोडा गोंधळ. बऱ्याच वर्षांनी त्या शाळेच्या कार्यक्रमाला जात होत्या.
शाळेत पोचल्यावर सारंगने त्यांना हात धरून वर्गात नेलं. वर्गात बाकी आजी-आजोबांचे गटगट करून गप्पा चालल्या होत्या. पण शुभदा बाई काहीशा गप्प. एक कोपरा निवडून बसल्या.
तेवढ्यात, एका कोपऱ्यातून एक ओळखीचा चेहरा डोळ्यासमोर आला. पांढरे कुरळे केस, फ्रेम असलेले चष्मे, आणि शांत हसरा चेहरा.
“शुभदा? तू?” तो जवळ आला.
“शुभदा? तू?” तो जवळ आला.
शुभदा बाई चकित झाल्या. “शशिकांत?” तिचा आवाज थरथरला.
शशिकांत आणि शुभदा कॉलेजचे वर्गमित्र. दोघं कधीकाळी एकमेकांच्या खूप जवळ होते. पण मग घरच्यांच्या विरोधामुळे, जीवनाच्या वाटा वेगळ्या झाल्या.
शुभदाच्या डोळ्यांत जुनं काळं-पांढरं चित्र उभं राहिलं. शशिकांत म्हणाला, “माझा पण नातू याच वर्गात आहे. आणि तुला आज इतक्या वर्षांनी पुन्हा समोर पाहून खूपच आनंद झाला, वीस-पंचवीस वर्षं मागं गेलं मन, जुन्या आठवणीतं..”
शुभदा बाई हलकं हसल्या. “काही आठवणी अजून मनाच्या सांजवेळेत साठून आहेत.”
दोघं थोडा वेळ बोलत राहिले. त्यांच्या बोलण्यात कोणताही खंत किंवा पश्चात्ताप नव्हता.. फक्त समजूत होती. दोघांनीही आपापली आयुष्यं जगली होती, पण मनातल्या एका कोपऱ्यात अजून त्या आठवणींचं मंद उजेड होता.
कार्यक्रम संपल्यावर घरी परतताना सारंग त्याच्या आजीला म्हणाला, “आज्जी, तुला मस्त वाटलं ना? तुझा मित्र पण भेटला, बघ!”
शुभदा बाई हसल्या. “हो, फार मस्त वाटलं. कधी कधी जुनी सांज नवी उजळते.”
त्यांच्या हातात नातवाचा हात होता, मनात जुन्या मित्राची आठवण होती, आणि डोक्यावर मावळतीचं सोनेरी आभाळ.
क्रमशः ...
Anu..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा