Login

एक क्षण सुखाचा

ज्या क्षणासाठी प्रत्येक स्त्री आसुसलेली असते..

हल्ली ना सारखं उदास वाटतं. का कुणास ठाऊक पण सांजवेळी तर जरा जास्तच गलबलून येतं.आचानक कंठ दाटून येतो. खुप रडावसं वाटतं,आक्रंदन करावंसं वाटतं.मनातल्या तप्त ज्वालामुखीला अश्रूरूपी वाट देऊन मोकळ करावसं वाटतं. मग अशा वेळी वाटतं की कोणी तरी आपल्याला आईसारखं कवेत घ्यावं अन एक सुखाचा क्षण आपल्याही वाट्याला यावा.

या संसाराच्या रहाटगाडग्यात,दिवसभर कामांचा आ वासून उभा असलेला डोंगर सर करता करता मानपाठ एक होऊन जाते.त्यात मी बापडी ,हे राहिलं ते राहिलं असं करता करता एक क्षण देखील विसावा नाकारते. आपली माणसं ,आपले घर अशी रोजच री ओढताना शरीर आणि मनाची फारच दमछाक होऊन जाते रे!खूप थकल्यासारखं वाटतं..अशावेळी तुझ्या मिठीचा एक प्रेमाचा क्षण ,तुझी मायेची उब मिळाली की पुढचा दिवस पुन्हा नव्याने जन्मलेल्या बाळासारखा ताजातवाना हवाहवासा वाटेल रे! म्हणून देशील का रे जरा वेळ मला?खरं सांगू ?आपली प्रणयक्रीडा केवळ एक शारीरिक संवाद वाटतो मला.. मनाचा सुसंवाद नाहीच मुळी!

तू ऑफिसमधून आल्यावर माझं मन हेच तूला सांगण्याचा प्रयत्न करत राहतं पण मग मुलांसाठी चेहऱ्यावर हसू फुलवताना, त्यांच्या अडचणी सोडवताना मनातील हे वादळ मी कसेबसे शांत करते किंवा नाईलाजाने त्याचे विस्मरण करते. तुला खरं सांगू? मी सुद्धा माणूसच आहे रे! भावभावनांचा हलकल्लोळ माझ्याही मनात फेर घालतो, म्हणून माझं हे आर्जव ऐकशील? देशील मला वितभर माया अन् आईपण काही क्षणांसाठी?

हा प्रश्न मला त्या दिवशी देखील सतावत होता.तेवढ्यात तू माझ्या मागून आलास अन मला थेट कवेत घेतलेस अगदी प्रेमानं. जणू काही या क्षणासाठी तू सुद्धा असुसलेला होतास अगदी माझ्यासारखा! तेवढ्यात आपलं पिलू येऊन बिलगलं अन हा एक सुखाचा क्षण कधीच सरू नये असं वाटलं.त्या दिवसापासून तुलाही या क्षणाचे महत्व कळाले असावे म्हणून रोजच असे घडते आहे,ही सुखाची पेटी आता रोजच उघडली जाऊन नवी कोरी होत आहे.

©® सौं प्रियांका शिंदे बोरुडे