शीर्षक - लक्ष्य

Story About A Courageous Boy
उडण्याचे बळ

शीर्षक-लक्ष्य भाग १

ए बाळा, जरा ते वर्तमानपत्र माझ्या हातात देशील ? अनुराधाताईंनी दररोज वर्तमानपत्र टाकणाऱ्या दहा-बारा वर्षाच्या मुलाला हाक मारली. का रे कोणत्या वर्गात आहेस तू? मावशी, मी आता नववीत गेलो आहे. हो का! काय नाव तुझं? माझं नाव दिवाकर. हो का! छान नाव आहे बरं.
अनुराधाताईंनी वर्तमानपत्र वाचायला घेतले. त्या, घराच्या पोर्च मध्ये रोज सकाळी बंगळी वर बसून वर्तमानपत्र वाचायच्या. मध्येच अंगणातल्या कुंड्यातील रोपांकडे लक्ष द्यायच्या. झाडांना फुले येतात की नाही हे बघायच्या. कारण त्यांचं धावपळीचं आयुष्य आता संपलेलं होतं. शिक्षण क्षेत्रात काम केलेले असल्यामुळे भटक्या, गरीब मुलांच्या शिक्षणाची परवड त्यांनी जवळून अनुभवलेली होती.
अनुराधाताई दररोज बंगळी वर बसून दिवाकरची वाट पाहायच्या. व तो ते वर्तमानपत्र त्यांच्या हातात द्यायचा.
एक दिवस त्यांनी त्याची सहजच उत्सुकतेने विचारपूस केली. दिवाकर ना नाव तुझं. हो मावशी! कारे, कोण कोण असतं तुझ्या कुटुंबामध्ये? मी आणि माझी लहान बहीण, माझी आई, असे तिघेच असतो. माझा बाबा केला दोन वर्षाच्या आधी कोरोनात.....
लहान बहीण आहे. तिला बी निमोनिया झाला होता. त्यासाठी दवाखान्यात लय पैसा लागला तिच्यासाठी. वाचली ते आता..... शाळेत नाव टाका लागते तीचं. सहा वर्षाची झाली ते बी. असं त्याने सांगितलं .आणि तो लगेच सायकल घेऊन समोर निघून गेला. वर्तमानपत्र लोकांच्या घरात पटापट टाकावे लागते. कारण वेळेनुसार काम होणे गरजेचे असते. कुठेही वेळ दवडून चालणं योग्य नसतं.
त्याची आई सुद्धा बांधकामावर कामाला जायची. दोघे मिळून आपल्या कुटुंबाचा गाडा ते ओढायचे. बहिणीला बांधकामा जवळच्या शाळेत टाकणे, क्रम प्राप्त होतं. कारण आईचं लक्ष, तिच्यावर असणं गरजेचं होतं. या जगात कधी काय घडेल सांगता येत नाही. मोबाईल, टीव्ही मुळे लोकांची वृत्ती भरकटत जात आहे. त्यासाठी आपल्या कुटुंबाचं रक्षण, ही जबाबदारी प्रत्येकावर येऊन पडलेली आहे. दिवाकर आपल्या आईचे कष्ट पहातच मोठा होत होता. त्यामुळे त्याला कष्टाची जाणीव होती .
त्याच्या आईला वाटे, आपला मुलगा शिकून मोठा साहेब झाला पाहिजे. त्यासाठी ती सुद्धा कष्ट घेत होती. अनुराधा ताईंना त्याच्या येण्याची व वर्तमानपत्र घेण्याची सवय झाली होती. पुढे आठ दिवस तो तिला दिसला नाही. दुसराच मुलगा त्याच्या ऐवजी येत होता. अनुराधाताईंनी त्या मुलाला विचारले, दिवाकर कुठे गेला? त्याची तब्येत बरी नाही का? अहो काकू! काल त्याच्या आईची प्रकृती जास्तच बिघडली. त्याच्या आईला टीबी झालेला होता ना! त्याने त्याच्या आईला, टीबी हॉस्पिटलमध्ये भरती केलेले आहे. अनुराधा ताईंना माहित होते, की त्याची आई बांधकामावर विटा उचलायला जाते. तिथली धूळ तिच्या फुफुसात अडकलेली असावी. त्याच्या आईची तब्येत जास्त झालेली आहे. त्याची बहीण कुठे आहे? त्याच्या बहिणीला त्याने, त्याच्या आईजवळच ठेवलेले आहे.
अनुराधाताई अस्वस्थ झाल्या. एवढ्याशा पोरीला जर जंतुसंसर्ग झाला तर.... त्यांनी त्या हॉस्पिटलचा पत्ता त्या मुलाकडून घेतला.
त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. तेथे दिवाकर होताच.
त्यांना पाहून त्याचे डोळे भरून आले. मावशी तुम्ही इथे? अरे मला तुझ्या आई विषयी वर्णमानपत्र टाकणाऱ्या त्या मुलांनी सांगितले. मला राहाविले नाही म्हणून आले तुझ्या आईला बघायला! मावशी, माझ्या आईची तब्येत आता जास्त झालेली आहे. तब्येतीकडे दुर्लक्षच झाले तिचे... आता काय करावे मला काही सुचतं नाही. घाबरू नको. धीर धर. अनुराधाताईंचा आश्वासक हात त्याच्या पाठीवरून फिरला. त्याला फार बरे वाटले. 'देव कुणाच्या रूपात कुणाला मदत करील सांगता येत नाही'. अनुराधाताईंनी त्याच्या आईच्या औषधासाठी काही पैसे त्याला दिले तसाही तो आर्थिक विवंचनेत होता.
त्याच्या छोट्या बहिणीकडे पाहून त्यांचे मन आणखीनच द्रवले. तुझ्या या बहिणीला तुझ्या जवळच्या नातेवाईकाकडे काही दिवस पाठवून दे. असे बोलून त्या घरी जायला निघाल्या .

दिवाकर ची आठवण आली की त्या खूप अस्वस्थ होत. पंधरा दिवस झाले. त्या मुलाला, दिवाकरला दाराशी पाहून त्यांनी उत्सुकतेने विचारले, झाली का तुझ्या आईची प्रकृती चांगली? कशी आहे तुझी आई? अनुराधाताईंनी एकाच वेळी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्याचा मरगळलेला चेहरा पाहून त्यांनी विचारलं, काय झालं? मावशी! माझी आई, गेली देवा घरी... काय बी परिणाम झाला नाही औषधांचा... बेडका घशात अडकला, तो कायमचाच.
त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. बापरे! आणि तुझी बहीण? तिचं काय? ती आहे गावाकडं. माझ्या आजीजवळ.... तिचं यंदाचे वर्ष गेलं शाळेचं .तसं नाही रे! तिचं शाळेत नाव घाल. सहा वर्षाची असल्यामुळे तिला नवीन प्रवेश मिळतो शाळेत. आणि तुझं काय?
महिना झाला...
माझं शाळेत जाणं झालं नाही .
आता पाहतो काय करायचं ते... मी ज्या वृत्तपत्राच्या कार्यालयात काम करतो, त्याच कार्यालयात एका छोट्या जागेत माझी राहण्याची व्यवस्था करून घेतो. मावशी! मला खूप शिकायचं आहे. माझ्या आईला वाटत होतं, मी खूप शिकून मोठा साहेब झालो पाहिजे. मरणानंतर तिच्या आत्म्याला शांती तर मिळालीच पाहिजे. व माझ्या बहिणीला सुद्धा आजीवर लादायचं नाही. काहीही होवो... मी शिकून मोठा होणारच. त्याची शिक्षणाविषयीची आस्था पाहून अनुराधाताईंना सुद्धा खूप हुरूप आला. त्यांनी त्याला सर्वतोपरी मदत करण्याचे ठरविले. दिवाकरची आता अनुराधा मावशीशी चांगली ओळख झाली होती. कधी मन अस्वस्थ झाले की तो, मावशीच्या चार संस्काराच्या गोष्टी ऐकायचा..

त्या त्याच्या खरोखरच प्रेरणास्त्रोत बनतात काय....
पाहूया पुढच्या भाग २ मध्ये


छाया राऊत बर्वे अमरावती
८३९००८६९१७