शीर्षक-लक्ष्य भाग ३ अंतिम

A Story About Courageous Boy
-उडण्याचे बळ

शीर्षक-लक्ष्य भाग ३ अंतिम

दिवाकर! आलास.... बैस! कसा आहेस! बरा आहे मावशी.... झाली का परीक्षा? अभ्यास केलास तू मन लावून! हो मावशी!
या परीक्षेच्या काळात मला तुम्ही खूप मदत केली. मी कोण कुठला... तुम्ही मदत केल्यामुळे मी परीक्षा देऊ शकलो. नाही तर एक वेळच्या जेवणासाठी मला रोजंदारीवर जावं लागलं असतं. मी वर्तमानपत्राच्या कार्यालयातील खोलीतच माझे बस्तान मांडले आहे. माझ्या खोलीत शांतता असल्यामुळे माझा अभ्यास चांगला झाला.
बरं बरं... आता पुढच्या शिक्षणाची चांगली तयारी कर. आम्ही आहोतच. हो मावशी! मी माझ्या आईची इच्छा पूर्ण करणारच.

अरे हो.... आधी ही दहावी तर पूर्ण कर. बघ! एखादं स्वप्न पाहणं, एखादं ध्येय ठरवणे, एवढ्यानेच कार्य सिद्धी जात नाही. आपल्या स्वप्नांच्या पूर्णत्वासाठी कायम दक्ष राहायला हवं. त्यासाठी ते ध्येय मनात धरून ठेवायला हवं. त्याचं कदापी विस्मरण होता कामा नये. कारण आज उद्दिष्ट ठरवलं, आणि उद्या ते सिद्धीस नेलं, असं कधीही होत नाही. प्रत्येक गोष्टीच्या पूर्णत्वासाठी ठराविक कालावधी लागतो. हा कालावधी तुमच्या पूर्णत्वासाठी सारी जुळवाजुळव करीत असतो. या साऱ्यांचा मेळ जुळला, की एक अशी वेळ येते जेव्हा तुमचं कार्य सिद्धी जातं.

असं बघ! फळ पक्व होण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो ना.. तसंच, तू जे ध्येय ठरविलं, त्यासाठी तुला खूप प्रामाणिकपणे कष्ट घ्यावे लागतील. त्यासाठी मी तुला काही पुस्तकं देते. तू तुझे रोजंदारीचे काम पूर्ण झाल्यावर ही पुस्तके वाचायला सुरुवात कर. स्पर्धा परीक्षेची तयारी आतापासूनच करायला हवी. हो मावशी! मी तुम्ही दिलेल्या सर्व पुस्तकांचे वाचन करीन. शाब्बास! तू तुझ्या राहण्याची व्यवस्था केली आहेसच .अधून मधून तुला मी जमेल तशी मदत करेलच.

आजी कशी आहे तुझी? गावी जाऊन आलास की नाही? आजीला एकटं वाटत असेल. मावशी.... बहीण गेल्यापासून मला तिथे करमतच नाही. ताई म्हणाल्या, असं नाही रे! पिकलं पान तेही आता गळणारच... आजीच्या शेवटच्या काळात तू तिला साथ द्यायला हवीस. आजीच्या मनावर किती आघात झाले असतील! तू अधून मधून गावी जात जा. माझ्याकडून गावी जायला पैसे घेऊन जा. तू माझा मुलगाच आहेस रे बाळा....
आज माझा मुलगा असता, तर तुझ्या एवढाच दिसला असता...
माझा मुलगा लहान चार वर्षाचा असतानाच साध्या तापाने आजारी पडला.
माझ्या नोकरीमुळे माझं त्याच्याकडे दुर्लक्ष झाले. ताप अचानक मेंदूत गेला.... आणि तो आमच्यापासून कायमचा दूर गेला.
तुला पाहताना मला सतत त्याची आठवण येते.

तुझी शिकण्याची जिद्द पाहून मला खूप आनंद होतो. फक्त माझ्या विश्वासाला तू तडे जाऊ देऊ नकोस. एवढी एकच इच्छा आहे. तसे वचन मला दे.....
अहो मावशी! माझ्या साठी इतकं सारं काही तुम्ही करीत आहात, कोण करत असं परक्या माणसासाठी...
अरे बाळा, तुझे माझे काही ऋणानुबंध असतील, म्हणूनच तुझी माझी ओळख झाली. तू तुझं दुःख माझ्याजवळ मोकळं केलंस, हे फार बरं झालं.

दहावीचा निकाल लागला. दिवाकर प्रथम श्रेणी पास झाला. विज्ञानात तर त्याने प्राविण्य मिळविले. त्यासाठी अनुराधाताईंनी त्याला विज्ञानाच्या खूप काही टिप्स सांगितल्या होत्या. चालता बोलता त्यांनी त्याच्या मनात विज्ञानाविषयी आवड निर्माण केली होती. तसेच त्याने इंग्रजी विषयात सुद्धा प्राविण्य मिळविले. इंग्रजी आणि विज्ञान ताईंचे आवडते विषय होते.
पुढे पुढे दिवाकर ने ताईंच्या मार्गदर्शनात खूपच चांगली प्रगती केली. ताईंनी त्याला आपल्या पंखाखाली घेतले नसते, तर आज तो मोठा ऑफिसर बनूच शकला नसता. दिवा कर ने स्वतः शिस्तीने अभ्यास केल्यामुळे, त्याने आपला दिवा तेजोमय केला. स्वतःचे नाव सार्थकी लावले. अनुराधाताईंमुळे तो गरुड भरारी घेऊ शकला. त्याचं भविष्य उज्वल होण्यासाठी त्याने स्वतः तर कष्ट घेतलेच, पण त्याला त्याच्या आईच्या रूपात अनुराधाताई भेटल्या .आज तो कर्तबगार ऑफिसर म्हणून नावारूपास आला आहे.


छाया राऊत बर्वे अमरावती
८३९००८६९१७

समाप्त