Login

लघुकथा सेकंड इनिंग

Story About Old Couple
कथा सेकंड इनिंग


अगं सविता! 'काय होतंय तुला'? 'बरं वाटत नाही का?' 'चल, थोडं बाहेर समोरच्या मंदिरात जाऊन बसुया. बरं वाटेल तुला'. सुधाकर रावांनी तिला हात धरून बिछान्यावरून उठवून बसविले. दोघेही आता वाढत्या वयानुसार थकलेले होते. वयानुसार शारीरिक क्षमता कमी होत गेलेल्या होत्या. चालताना, उठताना, गुडघे दुखायला सुरुवात झाली होती. तरीही सुधाकरराव व सविताताई एकमेकांच्या साथीने, जमेल तसे दररोज मंदिरातल्या विठ्ठलाचे दर्शन घ्यायला जायचे.

आज त्यांना थोडं अस्वस्थ वाटत होतं. कारणही तसंच होतं. त्या नुकत्याच मोठ्या मुलाकडून बंगळूर वरून आल्या होत्या.
सविता ताई व सुधाकर रावांना दोन मुले. एक मोठा देवधर व दुसरा मुरलीधर. धाकट्या मुरलीधरने सुधाकर रावांचं किराणा मालाचे दुकान व्यवस्थित सांभाळायला सुरुवात केली होती. सुधाकर रावांच्या हाताखाली तो चांगला तरबेज झालेला होता. आता तर धाकटी सून सासू-सासऱ्याचे सगळे वेळच्यावेळी करायची. ती सविता ताईंना कोणतेही काम करू देत नव्हती. त्यामुळे ते दोघेही खुशीत होते .


यावर्षी दिवाळी सणासाठी देवधर चे कुटुंब गावी आले. ते दोघेही बंगळूरला कंपनीत नोकरी करायचे . त्यांनी आपली छोटी मुलगी स्नेहाला, पाळणा घरात ठेवून स्वतःचं घर स्थिरस्थावर केलेलं होतं.
मनिषा ची धाकटी जाऊ नवीन असल्यामुळे तिने स्वतःचे दागिने गळ्यात घातलेले होते. सासूच्या ही गळ्यात तिने ठसठशीत सोन्याची माळ बघितलेली होती.
संध्याकाळच्या वेळी दोघे सविता ताई आणि सुधाकरराव मंदिरात दर्शनाला गेले, हे पाहून मनिषा देवधरला म्हणाली, 'का हो! यांचं छान चाललंय की.'! काहीतरी युक्ती करून यांच्याकडून पैसे उकळायला हवेत.
सासु बाईंच्या गळ्यात सुद्धा छान भरीव सोन्याची माळ आहे .

दिवाळीचे चार दिवस आनंदात गेले. सर्व कुटुंबाने एकत्रित दिवाळी साजरी केली. धाकट्या सुनेने घरातील संपूर्ण कामे जबाबदारीने पार पाडली.
तात्या !'आता आम्ही परवा जाणार... सुट्ट्या संपत आल्यात.' ' तुम्ही आईला दहा पंधरा दिवसांसाठी आमच्या सोबत पाठवा'. 'आता तुमची ही धाकटी सून चांगली काळजी घेते तुमची.' 'आमच्याकडे आईला, हवा पालट म्हणून नेतो... हे ऐकल्यावर सुधाकर राव काहीच न बोलता गप्प राहिले. थोड्यावेळाने म्हटले, 'बघू, ठरवू पाठवायचे की नाही ते'. हे ऐकून सविता ताई मुलासमोर काही बोलल्या नाहीत. परंतु तो तिथून गेल्यावर त्या म्हणाल्या, का हो!' मुलगा एवढा म्हणतोय, तर जाऊन येते मी काही दिवस'. सुधाकर रावांनी दीर्घ सुस्कारा टाकला. आणि समजाविण्याच्या सुरात बायकोला म्हणाले, 'सविता, तू एक लक्षात घेतलं का, ज्या मुलाने एवढ्या दिवाळ सणाला, कुणासाठी काहीही आणलं नाही, एवढ्या दिवसांनी आल्यावर त्याचं ते कर्तव्य होतं. घरात नवीन सून आहे, धाकटा भाऊ आहे .माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी तरी एक पातळ आणले का? जो मुलगा कुटुंबासाठी एवढेही करू शकत नाही, त्याच्याकडून काय अपेक्षा करायची'?

तरीही तुला वाटत असेल, तर जा. माझे काही म्हणणे नाही. सविता ताईंनी तरीही मुलाच्या प्रेमाखातर त्याच्यासोबत जाण्याची तयारी केली.
आई! 'थोडे पैसे घेशील सोबत ,मुरलीला मागून'. 'त्याचा व्यवसाय छान चालतोय'. 'दे म्हणावे थोडे... तेवढेच तुझ्या कामी येतील. आम्हाला नकोय. पण असू देत सोबत तुझ्या.

सविताने धाकट्या कडून मागवून, सोबत थोडी जास्त रक्कम घेतली. धाकट्या ला वाटले, बरेच झाले. आई थोडे दिवस मोठ्या कडे राहायला जाते. तेवढीच आपल्याला मोकळीक. तात्या काय बाहेरच असतात. आईची नुसती लुडबुड चालली असते घरात. हे कर, ते कर .सारखी माझ्या बायकोच्या मागे असते. त्यानेही तिला काहीही न म्हणता रक्कम दिली.

सविता ताईने देवधर चा मोठा फ्लॅट पाहिला. आलिशान हॉल, सुंदर किचन ...तिला त्याचा संसार पाहून खूप समाधान वाटले. आपण हाडाची काडे करून, उन्हातान्हात कष्ट करून, याला शिकविले. फार बरे झाले. आपल्या कष्टाचे चीज झाले. त्या दिवशी ती तेथे निवांत झोपी गेली.
आई!'चहा घ्या'. सुनेने उठल्या उठल्या चहा हातात दिला. सोबत बिस्किटे पण ठेवलीत. आई, 'नाश्ता तयार आहे. तो खाऊन झाल्यावर निवांतपणे आंघोळ वगैरे उरकून जेवण करून घ्याल. ओट्यावर जेवण ठेवलेले आहे' .दोघेही छोट्या मुलीला पाळणा घरात घेऊन जायला निघाली. 'अगं कशाला नेतेस तिला? मी सांभाळते तिला दिवसभर'. 'तिचं दूध पाणी ठेवून जा. झोपविते मी तिला घरीच.'
नको!' तिला पाळणा घराची सवय आहे. कशाला उगीच, तिला तुमची सवय लागेल. आणि नंतर आम्हाला जड जाईल'.
सविता च मन खट्टू झालं .नातवंड खेळवणं हे आजीला खूप आवडत असतं. परंतु ते सुख मनीषाने हिरावून घेतलं. ती एकटीच दिवसभर त्या मोठ्या घरात पडून राहिली. मनीषाच्या व देवधरच्या मनात ,सविता कडे जो ऐवज होता, तो लुबाडणे, एवढ्याच हेतूने तिला त्यांनी आणले होते.

आठ दिवसांनी देवधरने आईला विचारले, आई !'मुरलीने किती रक्कम दिली गं तुला'? 'अगं, आम्ही घरात नसताना कुणी आवाज दिला आणि तू दार उघडलं तर... तुझ्या गळ्यात सोन्याची माळ आहे. ती पण तो हिसकावून पळ काढेल. अशा घटना हल्ली बऱ्याच होतात इथे' .'ती तू काढून मनीषा जवळ दे. ती रक्कम माझ्याकडे दे. मी ती सुरक्षित ठेवतो. जाताना तुला परत देईन.'

सविताने जवळची रक्कम व सोन्याची माळ काढून दिली. तिला आपल्या मुलावर विश्वास होता. खरेच! गावाकडची लोक भाबड्या मनाची असतात. त्यांच्यात शहरी लोकांचा बेरकीपणा आलेला नसतो.

रविवारचा सुट्टीचा दिवस... सविता स्नेहाला खेळवत होती. ती नातीला खेळविण्यात रमून गेलेली असताना, देवधर व मनीषाची कुजबुज सुरू होती. ,बरे झाले, तुम्ही आईकडून रक्कम घेतली'.' बरीच रक्कम दिली की हो भाऊजी ने'! ' आणि ही माळ सुद्धा शुद्ध सोन्याची आहे. बरेच झाले. यातून आपण आपल्या चार चाकी चे हप्ते फेडू शकतो'. हो! देवधर ने दुजोरा दिला. 'आईला सांगू नंतर काहीतरी बनाव करून'. पुढच्या रविवारी आईची पाठविण्याची तयारी देवधर ने केली.
आई!' तात्याचा फोन आला होता, की तुझ्या आईला लवकर पाठव म्हणून'... 'तू तयारी करून ठेव. मी तुला सोडून देतो गावी'.

सविताला सुद्धा तेथे करमेनासे झाले होतेच. सुधाकर रावांची व गावाकडची आठवण तिला येत होती. तिला वाटले, आता यांना आपली माळ आणि रक्कम कशी मागायची? मुलाने स्वतःहून ती देण्याची तिने वाट पाहिली. परंतु देवधर ची त्या विषयावर कोणतीच प्रतिक्रिया तिला जाणवली नाही. ती अस्वस्थ झाली. आता घरी नवऱ्याला काय सांगायचे? देवधरने तिची बॅग गाडीत टाकली. पैशाची व माळेची कोणतीच गोष्ट काढली नाही. ती सुद्धा गप्पच राहिली. मुलाला दिलेली रक्कम परत मागणे तिला बरे वाटले नाही. आणि माळ तर सुनेने बळकाविली होतीच. ती खिन्न मनाने घरी परतली.
सुधाकर रावांना तिची अस्वस्थता जाणवली. धाकट्याने सुद्धा आईला विचारणा केलीच. 'हे काय आई! इतक्यात परत आली सुद्धा'. 'मोठ्या सुनेला जड झाली होतीस का'? 'बरे झाले. आम्ही आहोतच तुमचं करायला.' धाकट्याचा टोमणा दोघांच्याही लक्षात आला.

तरुणपणी मुलांसाठी एवढे कष्ट घेतले. आणि आता आपण मुलांनाच जड झालो.

एवढं सोपं असतं का ,मुलांना मोठं करणं! लहान मुलं आजारी पडली की आई वडील रात्र रात्र जागून काढतात. स्वतःच्या शरीराकडे सुद्धा दुर्लक्ष करतात. मुलांची काळजी घेतात .आणि तेच मुलं....
असो!


दोघांनीही मंदिरात तेवत असलेल्या दिव्याच्या मंद प्रकाशात अश्रूंना वाट मोकळी करून दिली.


छाया राऊत बर्वे
अमरावती
८३९००८६९१७