आधीचा भाग खालील लिंकवर वाचा
http://www.irablogging.com/blog/a-wandering-path-part-26_6371
एक उनाड वाट भाग 27
अनुभव आणि सुबोध इंदिरा सोबत दार्जिलिंगच्या माउंट हेरमो विद्यालयात गेले. तिथे जाण्यासाठी त्यांना पाच किलोमीटरची व्हॅली रोपवेत बसून पार करावी लागली. रोपवेत बसून दिसणाऱ्या सुंदर बर्फाच्छदित पहाडी आणि ग्रीनरीने त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले. माउंट हेरमो विद्यालयाची बिल्डिंग ब्रिटिश कालीन धाटणीची, केजी वन ते बारावी पर्यंत शिक्षणाची सोय आणि राहण्याखाण्याचीही. म्हणजे ती एक निवासी शाळा आहे. पन्नास टक्के मुलं लोकल रोज येणं जाणं करणारी तर पन्नास टक्के तिथेच हॉस्टेलवर राहणारी. इंदिराची राहायची सोय शाळेच्या गेस्ट हाऊसमधे करण्यात आली. सुबोधचे सोशल नेटवर्क कॉन्टॅक्टस खूपच जबरदस्त. अशाच एका कॉन्टॅक्टच्या मार्फत गोड गोड बोलून आणि काही अमाऊंट भरून तीन महिन्यासाठी इंदिराची सोय तिथे करून ते परत मुंबईला गेले.
इंदिराला तर तिथे जाऊन अगदी स्वर्ग प्राप्तीचा आनंद झाला. शाळेचा पूर्ण टिचिंग आणि नॉन टिचिंग स्टाफही तिथेच राहायचा. गर्ल्स हॉस्टेलच्या वार्डन मिस श्रेया सोबत इंदिरानं पहिल्याच दिवशी गट्टी करून घेतली.
तिकडे 'प्यार एक एहसास' रिलीज झाला पण एकाही प्रमोशनल कार्यक्रमात इंदिराला हजर न पाहून बॉलिवूडमधे मीडियानं खळबळ माजवली.
"इंदिरा आणि अनुभवचे ब्रेकअप झाले कि हा पण 'प्यार एक एहसास' च्या प्रमोशनचा एक भाग आहे?"
"इंदिरानं अनुभवला कंटाळून चित्रपट इंडस्ट्रीला ठोकला राम राम."
"अनुभवनी कुठे लपवलं इंदिराला?"
असं काहीबाही वाटेल ते ते वृत्तपत्रात छापून येऊ लागलं आणि चॅनेलवर दाखवलं गेलं. इंदिराची मैत्रीण रितिका तिच्या घरी गेली.
"काका काकू मला वाटतं इंदिराला आपली गरज आहे. काका कॉल करा ना तिला. मी टीव्हीवर बॉलिवूड न्यूजमधे बघितलं.... " तिनं टीव्हीवर येणाऱ्या बातमी विषयी त्यांना सांगितलं.
"त्या लोकांना कशाचंच काही वाटत नाही. सगळा नुसता धंदा मांडून ठेवला आहे." आई रागातच बोलली.
"पण आई इंदिरा खरंच संकटात असेल तर. ती खूपच भोळसट आहे. कोणावरही लवकर विश्वास ठेवते." प्रिया आईला बोलली.
"अगं प्रिया हे तु बोलतेस. सर्वात जास्त त्रास तिच्या करणीचा तुलाच झाला. तुझी सासूबाई आताही टोमणे देते तुला, लग्न मंडपातुन पळून गेलेल्या हिरोईनची बहीण.... म्हणून तु दर सात आठ दिवसांनी इथे असतेस."
"त्यांना टोमणे द्यायचा बहाणा हवा फक्त. इंदिरा लग्न तोडून गेली नसती, हिरोईन झाली नसती तर आणखी कशाला धरून त्यांनी मला टोमणे मारले असते. आणि खरं सांगू का आजूबाजूच्या लोकांचे ऐकून, स्वतःचे सासरपण जगून तर असं वाटतं बरं झालं लग्न नाही केलं तिनं त्या घरात. कमीत कमी ती स्वतःला शोधतेय, काहीतरी करून दाखवतेय. नाहीतर माझा नवरा शंभर टक्के माझ्या बाजूने खंबीर असूनही मला सासूबाई किती बोलतात. विचार कर त्या आईच्या बबड्यानं, नंदी बैलानं आणि त्याच्या मटक्या आईनं काय अवस्था केली असती इंदिराची." प्रियाचे डोळे भरून आले.
"ते नंतरच नंतर बघितलं असतं ! पण म्हणतात ना रक्त रक्तालाच जाऊन मिळतं शेवटी." आई कंटाळवाणा भाव दाखवत किचनमधे गेली. इंदिराच्या आठवणीने भरून आलेले डोळे लपून पुसू लागली. इंदिराच्या बाबांनी बघितलं. ते आईला काहीच बोलले नाही. नात्यात प्रत्येकवेळी मुद्दा सिद्ध करणं गरजेचं नाही. हे त्यांना माहित होतं.
त्यांनी इंदिराबद्दल विचारपूस करायला मिनुला फोन केला. पण ती गोव्याला तिच्या नवीन चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याने तिला समजलंच नाही.
इंदिराच्या बाबांचं मन लागत नव्हतं. काहीही झालं तरी त्यांच्या काळजाचा तुकडा होती इंदिरा. त्यांना वाटलं होतं काही दिवस मुंबई पुणे भटकून थकून भागून परत येईल ती नागपूरला घरी नाहीतर ते घेऊन येतील. तेव्हापर्यंत इंदिराच्या आईचा रागही कमी होईल आणि लोकंही लग्न मंडपात झालेलं विसरून जातील. कोणाला माहित होतं ती चित्रपटात काम करेल तेही मेन हिरोईनचं आणि इतक्या भयानक चर्चेचा विषय बनणार. आता बस झाला राग वगैरे. आपल्या पोरीची खबर घ्यायलाच हवी आपण, पोरीला आपण घरी आणलंच पाहिजे.
"मी इंदिराला भेटायला संध्याकाळच्या रेल्वेने मुंबईला जातोय." इनामदारांनी बायकोला सांगितलं.
"आधी का नाही सांगितलं मला? तिच्या आवडीचा नागपुरी चिवडा, रबडी आणि सांभार वडी बनवून दिली असती." इंदिराच्या आईच्या तोंडून निघून गेलं.
"पोरीची आवड लक्षात आहे अजून?" इनामदारनी हसून विचारलं.
"का नाही राहणार? महाराणी सारखी बसून हुकूम द्यायची. आई आज न मला रबडीच खायची इच्छा होतेय, आज तर चिवडा खाल्ल्यावरच गणित जमणार असं वाटतेय, माझी परीक्षा असली की डबाभर चिवडा आणि चहा सोबत खायला शंकरपाळी बनवून ठेवत जा, तूझ्या हातची गरम गरम सांभार वडी आणि कढी म्हणजे स्वर्ग सुख, पंच भोज." आईने डोळ्याला पदर लावला, " कशी लक्षात नाही राहणार, किती करून करून खाऊ घातलं. इतकं तर प्रियाला दिवस असूनही करून खाऊ घालने होत नाहीये."
"तुमचं पहिलं अपत्य ते आई. त्यात पूर्ण कुटुंबातलंही पहिलंच त्यामुळे जास्त लाडाचं." एक हात सहा महिन्याच्या पोटावर आणि दुसरा मागे कंबरीला आधार म्हणून लावून प्रिया बोलली, "आम्ही काय दोन नंबर."
"असं होय." आईनी तिला जवळ घेतलं.
"बाबा मी येऊ का सोबत? तुम्हाला एकट्याला सुचणार नाही." प्रियानं बाबाला विचारलं.
"नको गं या परिस्थितीत. तु फक्त अनुभव सिन्हाचा ऍड्रेस दे मला इंटरनेट वरून काढून."
"येऊ द्या ना. तसही माझं इथे मन नाही लागणार."
"प्रिया तिकीट एकच काढलं आहे. समजून घे बरं."
"पण... "
प्रिया काही बोलणार तोच इनामदारांचा फोन वाजला.
"मिनूचा फोन आहे बघ." त्यांनी कॉल उचलला, "हा मिनू कुठे आहेस? मी किती फोन केले तुला."
"काका सॉरी. मी गोव्याला आली आहे शूटिंगसाठी. कामात असल्यामुळे मोबाईलकडे लक्ष नाही गेलं."
"मी इंदिराला भेटायला मुंबईला येतोय. मला ऍड्रेस दे तिचा आणि फोन नंबरही. मला बोलायचं आहे तिच्याशी."
"काका फोन नंबर नाही तिचा माझ्याकडे आणि ती मुंबईत नाही." मिनूनं दाताखाली जीभ चावली, "हे काय बोलली मी. काका चिडतील. मुंबईला आल्यावरही सांगता आलं असतं." ती तिच्याच विचारात गायब झाली.
"मिनू हे काय बोलतेय तू?" चिडून, "तुझ्याकडे तिचा फोन नंबर नाही, ती मुंबईत नाही. मग कुठे गेली? मीडिया दाखवतेय कि ती गायब झाली. अनुभवने तिला नवीन चित्रपट साइन नाही करू दिला म्हणून त्यांचं ब्रेकअप झालं. हे सुरु काय आहे? मिनू कुठे आहे माझी मुलगी? तू म्हटलं होतं कि तू तिचं लक्ष ठेवणार अगदी बहिणीसारखं. मग हे सर्व कसं झालं?"
इनामदारांना असं चिडलेलं बघून प्रियाचा आणि आईचा चेहरा घाबरा घुबरा झाला.
"काय हो, काय झालं? इंदिरा ठीक आहे ना?" आईनं विचारलं.
"मिनू बोलतेस का काही?" आईला शांत राहण्याचा इशारा करून त्यांनी मिनुला विचारलं, "तू इतकी निष्काळजी कशी?''
"काका शांत व्हा." ती स्वतःला सांभाळत बोलली. तिनं कधी विचारच नव्हता केला कि इंदिराचे बाबा असं फोन करून इंदिराबद्दल विचारतील. म्हणून त्यांना काय बोलायचं तेही काही ठरवलेलं नव्हतं.
"काय शांत होऊ? माझी मुलगी इंदिरा गायब आहे आणि तू मला शांत व्हायला सांगतेय. मला तर पोलिसात जाऊन तक्रार नोंदणी करायची इच्छा होत आहे त्या अनुभव विरुद्ध. पण मी म्हटलं आधी तूझ्या सोबत बोलतो. इंदिराला भेटतो मग पुढचं पाऊल उचलतो तर तू मोठया शांततेने म्हणतेस कि..... ."
"ती सुखरूप आहे काका. तुम्ही जा मुंबईला. मी अनुभव सिन्हाचा, त्याच्या सेक्रेटरीचा आणि घरचा, तिन्ही नंबर पाठवते तुम्हाला."
"ऍड्रेसही दे."
"हो हो देते. टेंशन घेऊ नका. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर."
"तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तुझ्याशी बोलतोय पण हे मीडियावाले काय काय बोलतात. डोकं काम नाही करत."
"त्याकडे दुर्लक्ष करा काका."
"माझ्या पोरीचा संबंध नसता तर नक्कीच दुर्लक्ष केलं असतं. इतकंच काय ते ऐकलंही नसतं."
"हो काका. जा तुम्ही मुंबईला. अनुभव सिन्हाला फोन करा. ते येतील घ्यायला तुम्हाला."
"तो अनुभव सिन्हा खरंच इंदिरावर प्रेम करतो का?"
"तुम्ही भेटा त्यांना. तुम्हाला सगळंच कळून जाईल. बाकी इतकं नक्की कि माणूस खूप चांगला आहे."
"बरं बरं तयारी करतो मी."
"हो. ठेवते मी."
इनामदार मुंबईला सकाळी साडे नऊला पोहोचले. सुबोध त्यांना रेल्वे स्टेशन वरून घेऊन आला.
"नमस्कार! मी अनुभवची आजी."
"नमस्कार !" इनामदारांनी आजीचे दर्शन घेतले, "माझी आई तुमच्याच वयाची आहे."
"हो इंदिराने सांगितलं होतं."
"नमस्कार सर !" अनुभव हॉलमधे आला.
"नमस्कार नमस्कार!" अनुभवला नीट बघत इनामदारांनी
त्याला सरळ विचारलं, "इंदिरा कुठे आहे? ती ठीक आहे ना?"
"हो ती एकदम सुखरूप आहे."
"ते मी ऐकलं खूप वेळा ती ठीक आहे म्हणून. पण मला तिला बघायचं आहे. तिच्याशी बोलायचं आहे. ती नाराज आहे का माझ्यावर?"
"नाही. तसलं काहीच नाही. तिचा ऑनलाईन क्लास सुरु आहे. तो झाला कि मी व्हिडीओ कॉल लावून देतो तिच्याशी बोलायला."
"ऑनलाईन क्लास.. कशाचा??" सुबोधनी त्यांना झालेलं सगळं सांगितलं.
"माझी इंदिरा परत अभ्यास करतेय. यापेक्षा आनंदाची गोड बातमी नाही माझ्यासाठी. थँक्यू ." अनुभवचा हात हातात धरून इनामदार त्याला म्हणाले, "मग तुम्ही या पत्रकारांना सांगा ना तसं. ते काय काय चर्चा करतात पोरीबद्दल.. बरं नाही वाटत आपल्या पोरीबद्दल असं काही ऐकतांना, वाचतांना !"
"हो मलाही वाटतंय अनुभव आपण इंदिराची छोटीशी क्लिप, ती सुखरूप आहे, तिला हिरोईन बनून राहायची इच्छा नाही आणि म्हणून एका निवांत जागी जाऊन ती तिच्या करियरला स्टार्टअप करण्यासाठी अभ्यास करतेय.' असं सांगणारा व्हिडीओ मीडियाला देऊन व्हायरल करायला हवा." सुबोधनी आयडिया दिली.
"आयडिया चांगली आहे. आजच सांगू तिला असा व्हिडीओ बनवायला." अनुभवनी घड्याळात बघितलं. बारा वाजायला आले. तो इंदिराच्या बाबाकडे वळला, "तुम्ही खूप दुरून आलात. फ्रेश व्हा. जेवण करा. तेव्हापर्यंत इंदिराही क्लास संपून फ्री होईल."
"पण घास गळ्याखाली उतरणार नाही इंदिराला बघितल्याशिवाय."
"चौदा पंधरा तासांचा प्रवास करून आला. सकाळपासून काही खाल्लं नाही. तुझी तब्येत बिघडली तर तिला किती वाईट वाटणार. जी मुलगी बापासाठी सिनेसृष्टी सोडू शकते ती दार्जिलिंग सोडून यायला किती वेळ लागेल. तशीही उपद्व्यापी आहे एकदम. तुझ्यावर गेलेली दिसत नाही. नक्की आईवरच गेली असेल." आजी एका दमात बोलली. सुबोध आणि अनुभव एकमेकांना बघून हसले. आजी ती आजी.
"मी फ्रेश व्हायला जातो. बाथरूम कुठे आहे? आंघोळही करून घेतो." इनामदारांना समजलं आता फ्रेश होऊन जेवण करणंच योग्य. नाहीतर आजी चांगलीच क्लास घ्यायची आपला. ते बाथरूमकडे पटपट गेले.
जेवणं झाल्यावर रोजच्या सारखाच इंदिरानी अनुभवला व्हिडीओ कॉल लावला.
"हाई जेंटलमॅन how are you?"
"मी छान आहे आणि माझ्याकडे तूझ्यासाठी एक सरप्राईज आहे."
"आपल्या लग्नाची डेट फिक्स झाली?" इंदिरानं उत्साहात विचारलं.
"डेट फिक्स नाही झाली. पण फिक्स करणारे आले आहे." इनामदार बोलले.
"बाबा !" इंदिराला आनंदाने हसू कि रडू असं झालं, "बाबा तुम्ही तिथे कसे?"
"लेकीची आठवण आली म्हणून आलो तिला भेटायला.''
"तुम्ही मला माफ केलं?"
"बाळ तु काहीच चुकीचं वागली नाहीस. मग माफी कशाची. फक्त आमच्यावर जे संस्कार झाले त्या प्रमाणे आम्ही वागलो. तुला जे योग्य वाटलं ते तू केलं."
"सॉरी !''
"जाऊदे ते. कशी आहेस तू?"
"मी खूप छान आहे आणि स्वर्गात आहे. एकदा परीक्षा होऊ द्या मग आई, प्रिया आणि तुम्हाला घेऊन येईल इकडे फॅमिली ट्रिपला."
"बापरे, बाबा भेटले तर आम्ही फॅमिली लिस्ट मधून बाहेर." आजीनं अनुभवला डोळा मारला.
"सॉरी सॉरी आजी. आपण सर्व येऊ ट्रिपला इथे."
"गंम्मत करतेय गं मी. उषा मला घेऊन चल खोलीत. औषधं घेऊन झोपते मी. तुम्ही बोला आरामात."
"हो आजी."
इंदिरानं आई, प्रिया आणि रितिका विषयी विचारलं.
"काय मी मावशी बनणार आहे. आता तर मी अजून अभ्यास करणार मला माझ्या भाचा भाचीला काही काही घेऊन द्यावं लागेल."
"झालं. चला मॅडम अभ्यास करा. बाय बाय !" अनुभव इंदिराला म्हणाला.
"हो इंदिरा. मन लावून अभ्यास कर. ठेव फोन. भेटू लवकरच. नागपूरला गेलो की करतो तुला फोन."
"हो पप्पा. मला आईचे बोलणे खायचे आहेत आणि प्रियाला बघायचं आहे." प्रियाच्या वाढलेल्या पोटाबद्दल विचार करून ती म्हणाली.
लवकरच इंदिराचा दोन तीन मिनिटांचा एक व्हिडीओ मीडियात व्हायरल झाला. ज्यात ती बोलली,
"बॉलिवूडमधे काम करून खूप छान वाटलं. पण माझं धैय, माझं लक्ष ते नव्हतं. म्हणून मी प्यार एक एहसास नंतर कोणतीच ऑफर स्वीकारली नाही. मी जिथे आहे तिथे सुखरूप आहे आणि ऍकेडेमिक करियर करण्यासाठी अभ्यास करत आहे. कृपया मीडियाने माझ्याबाबतीत असले तसले अनुमान लावणं बंद करावे ही प्रार्थना. धन्यवाद !"
क्रमश :
©®अर्चना सोनाग्रे वसतकार
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा