Login

एक उनाड वाट #मराठी_कादंबरी भाग-29

Thank you

आधीचा भाग खालील लिंकवर वाचा

http://www.irablogging.com/blog/a-wandering-path-part-28_6413

एक उनाड वाट भाग 29

इंदिरानी सुबोधच्या हातातला लिफाफा घेऊन त्यातील अनुभवचं पत्र वाचायला सुरवात केली.

"इंदिरा, मला माहित आहे तुला माझा खूपच राग आलेला असेल. लग्नाचं वचन देऊन फिरलो. मला माफ कर. तू मेन्सची तयारी करायला गेल्यावर असं काही झालं की त्याची मी कधीच कल्पना केली नव्हती. दिव्या एका चित्रपटाच्या निमित्ताने परत आयुष्यात आली. तेव्हा कळलं की तिची मॅरीड लाईफ ठीक नाही. तिचा नवरा तिला पैशांसाठी खूपच छळतो. मुलाकडे अजिबात लक्ष देत नाही. बिजनेस वाढावा म्हणून तिचा वापर करायचा प्रयत्नही त्यानं केला. ती खूप दुःखी होती. शूटिंगसाठी आम्ही भेटू लागलो आणि कधी परत एकदा मी तिच्यात गुंतलो कळलंच नाही. तिने डिवोर्स केस फाईल केली आहे. तिचा डिवोर्स होताच आम्ही लग्न करू. तुला तोंड द्यायची हिम्मत नव्हती. म्हणून तु येणार तेव्हाच सिंगापुरला शूटिंगसाठी आलो. दिव्याही सोबत आहे. झालंच तर माफ कर. आणि कधीही कशाची गरज लागली तर निसंकोच सुबोध किंवा ओशिनला कॉल कर. मी सदैव तूझ्यासोबत आहे.

अनुभव !"

"तु ठीक आहेस ना?" ओशिनने इंदिराला विचारलं.

"हो मी एकदम ओके आहे." ती अशी बोलली जसं काही तिला काही फरकच नाही पडला, "मला एक पेन आणि कोरा पेपर दे."

ओशिनने तिला पेपर दिला. तिने त्यावर लिहीलं.

"इट्स ओके, तुम्हाला तुमचं पहिलं प्रेम मिळालं. मी आनंदी आहे तुमच्यासाठी. तुम्ही मला इतकं काही दिलं आहे की त्याची परतफेड करणं या जन्मात अशक्य. जर तुम्हाला दिव्या सोबत राहून छान वाटतंय तर मलाही छानच वाटेल. पण मला जर कळलं की हे सगळं तुम्ही इतर काही कारणाने करत आहे तर तुमची खैर नाही. लक्षात ठेवा यातलं काही जरी खोटं निघालं तर तुमच्या डोक्यावर एकही केस ठेवणार नाही मी. बाकी मी किती उपद्व्यापी आहे हे तुम्हाला वेगळं  सांगायची अजिबात गरज नाही.

इंदिरा."

"हे घ्या." इंदिराने सुबोधला पेपर दिला, "फोटो काढून पाठवा तुमच्या मित्राला." इंदिरा ओशिनकडे बघून बोलली, " आणि हो तुम्ही दोघेही लक्षात ठेवा काही सांगावंस वाटत असेल तर आताच सांगा मला. नंतर मी  कोणाचीही सफाई ऐकून घेणार नाही."

"असं काहीच नाही." सुबोध ओशिनचा हात पकडून म्हणाला.

"ठीक आहे मग जाते मी. वाटलंच तर बोलवा लग्नाला. की आता हम आपके है कौन?"

"नाही तसं नाही होणार. तुम्हाला नक्कीच बोलवू." ओशिन खोटं खोटं हसू चेहऱ्यावर आणून बोलली.

इंदिराला मनापासून वाटत होतं,
"काहीतरी काळं बेरं नक्कीच आहे. सुबोध आणि ओशिन लपवत आहेत माझ्यापासून. ठीक आहे लपवा. मीही CID पाहून लहानाची मोठी झाली आहे. दया कुछ तो गडबड है, दया क्या झोल है जरूर जानना होगा, दया ठीक से छान बिन करो, कुछ तो सुराग जरूर मिलेगा|" ती स्वतःशीच बोलली,

"असो आपण पता लावूच. पहिले आपल्याला मुलाखतीवर फोकस करायला पाहिजे. एक महिन्यात मेन्सचा रिझल्ट, मग  विस पंचवीस दिवसात मुलाखत आणि मुलाखत द्यायला तर मुंबईलाच यायचं आहे. एकदा मुलाखत पास झाली की अनुभव साहेबांना बघायला आपण मोकळे होऊन जाऊ. अन तेव्हापर्यंत आपली काही ऍक्शन न पाहून ही मंडळीही निर्धास्त होऊन काही ना काही चूक नक्कीच करतील."

इंदिरा नागपूरला गेली. आई बाबा, प्रियाला आणि छोट्या प्रिन्सला भेटून तिचा सर्व क्षीण निघून गेला. कोणीही अनुभवची चौकशी केली की ती एकच सांगायची,

" आम्ही फक्त मित्र आहोत. चित्रपटाची प्रसिद्धी व्हावी म्हणून तसं बोलले होते पत्रकारांसमोर. बाकी ते तसं बोलले नसते तरीही पत्रकारांनी नवीन जोडलंच असतं आमचं."

"हो हो, सगळ्यांचे असंच जोडतात ते." समोरचा बोलून जायचा.

ऑकटोबरच्या शेवटी मेन्सचा रिझल्ट आला. इंदिरा मेन्स पास झाली. बापरे ही कशी पास झाली? नक्कीच पैसे भरले असतील किंवा ओळख दाखवली असेल मोठया मंत्र्याची. सिनेमात काम करून आली ना. असं खूप लोकांच्या मनात आलं.  

पण इंदिराच्या घरी आनंदी आनंदगडे वातावरण झालं. कोण काय म्हणतंय याकडे लक्ष द्यायचं नाही असं त्यांनी ठरवलं. आता वाट मुलाखतीची. इंदिराला आठवलं, अनुभव म्हणाला होता ती जर मेन्स पास झाली तर कँडल लाईट डिनर आणि लग्नाची डेट फिक्स करू. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ती एकीकडे जाऊन रडू लागली.

"इंदिरा तु ठीक आहेस ना?" प्रियाने तिला विचारलं, "मला तु नागपूरला आली तेव्हापासून काहीतरी गडबड वाटतेय. सांग बरं काय झालं ते?"

"काहीच नाही. आई बाबांना इतकं आनंदी पाहून डोळे भरून आले. म्हणून इकडे आली डोळे पुसायला."

"अच्छा. तु वयाने जरी मोठी असली माझ्यापेक्षा तरी डोक्याने मी आहे मोठी. आता सांग खरं खरं अनुभव फोन करत नाही म्हणून रडतेस ना तु?"

"प्रियु !" तिला रडू आवरलं नाही. तिने प्रियाला सगळं सांगून दिलं.
"तसं त्या बॉलिवूड न्यूजमधे बघितलं होतं मी अनुभव आणि दिव्याचं अफेअर जोरात सुरु आहे म्हणून. तेव्हाच शंकेची पाल चूक चुकली माझ्या डोक्यात."

"हूँ... पण मला नाही वाटत ते खरं आहे म्हणून."

"मग काय असेल ज्यामुळे तो असा खोटा बोलला तुला."

"तेच नाही कळत ग प्रिया."

"हे देवा !" प्रिया एकदम भावुक होऊन बोलु लागली, "अनुभवला त्या चित्रपटात किंवा सिरीयलमधे दाखवतात तशी काही खतरनाक बिमारी तर नाही ना. ज्यामुळे हिरोला वाटतं तो देवाघरी गेल्यावर हिरोईनला विधवेचं जीवन जगावं लागेल म्हणून तो असं काही करतो की हिरोईन त्याला व्हिलन समजेल आणि त्याच्यापासून दूर होईल."

"अगं बस ! मी आहे इथे. देवा ही म्हणते असं काही असल्याचं समोर नको आणू. त्याला काही झालं तर कशी जगेन मी. अर्रर्रर्रर्र हा काय विचार करते मी." ती प्रियाकडे वळून म्हणाली, "प्रिया तु प्लीज तूझ्या मोठ्ठयाशा मेंदूला त्रास नको देऊ. मी मुलाखतीला गेल्यावर भेटेल त्याला. ओके!''
"होहो आपण सकारात्मक विचारच करायला हवा. पण तु खुश राहा मग."

"हो, तुही खुश आहेस ना तुझी मोठी बहीण BDO बनणार म्हणून?"

"आहे ना. आता काय नाचून दाखवू?"

"हो, चल आपण डान्स करायला जाऊ हायवे हबमधे. सेलिब्रेशन तर बनते ना बॉस !"

"ओ बॉस तु जा त्या रितिकाला घेऊन. माझं सहा महिन्याचं बाळ आहे आणि आता थंडी पडत आहे रात्रीची. आई रागवणार."

"नाही रागवणार. जा तुम्ही." त्यांना शोधत गॅलरीत आलेली  आई त्यांना म्हणाली.

"अगं पण प्रिन्स?"

"मी आणि बाबा बघू त्याला." प्रियाच्या चेहऱ्यावर हात फिरवून आईने सांगितलं, "मी आई झाली ना तेव्हा खूप वाटायचं. कोणीतरी यावं अन म्हणावं,
' दे त्या बाळाला आम्ही बघतो, तु कर तुला करायचं ते. झोपून राहा, पडून राहा की बाहेर जा.'

पण असं कधी झालंच नाही कारण मुलं असतांना आईनं तिच्यासाठी वेगळ्या वेळेची मागणी करणं म्हणजे अपराध समजल्या जायचा. मग आम्हा आयांचं सगळं फ्रस्ट्रेशन बिचाऱ्या लेकरावर निघे."

"आई सॉरी !" इंदिरा कान पकडून म्हणाली.

"का गं?"

"मी तुला नेहमी हिटलर म्हणायची."

"तू मारही खाल्ला आहेस ना तसा." आईने इंदिराला जवळ घेतलं, "पण खरंच तु खूप कारभार करून ठेवायचीस गं मग तो आवरणार, सासूबाईला बघणार, सासऱ्यांच करणार की बाबाला हवं नको ते देणार. अशावेळी राग काढायला तूच हाती सापडत असे. सॉरी बाळा. खूप खूप सॉरी !" आई रडू लागली.

"अरे मी आहे इथे." प्रियाही रडत त्यांना बिलगली. 

डिसेंबर महिन्यात इंदिराला मुलाखतीसाठी मुंबईला बोलावण्यात आले.

डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. काही जुजबी अभ्यासावर आधारित प्रश्न उत्तरं झाल्यावर मुलाखत घेणाऱ्या सरांनी डायरेक्ट मुद्द्याचे प्रश्न विचारले,

"तुला BDO च का बनावं वाटलं?  तु आणखी कोणत्याही पदासाठी अर्ज करू शकली असती."

इंदिराने त्यांना थोडक्यात मंडपात घडलेलं सांगितलं.

"म्हणजे थोडक्यात त्यानं तुला इन्स्पायर केलं असंच म्हणावं लागेल."

"हो सर ! मी मिठाई घेऊन जाणार आहे त्यांच्याकडे धन्यवाद म्हणायला." इंदिरा आनंदून बोलली.

"छान !" दुसरे एक सर बोलले, "पण गाव खेड्यात तर हा हुंडा प्रश्न शहरी भागापेक्षा जास्त आहे आणि मुला मुलींना त्यांच्या पसंतीने लग्न करायची मुभाही नसते. अशा परिस्थितीत तु तिथल्या लोकांना हुंडा न देता लग्न पार पाडण्यासाठी कसं इन्स्पायर करणार?"

"तसं वाटतं तितकं सोपं नाही म्हणा. पण मी गावोगावी जाईल. तिथल्या सरपंचांना भेटेल. माध्यमिक शाळेच्या मुला मुलींचं पथनाट्य बसवेल. भाषणांमधून स्वतःचं जीवित उदाहरण त्यांच्यासमोर ठेवेल."

"ही हुंडा पद्धत कुठून आली असं तुला वाटतं आणि ही खरंच खूप वाईट आहे का?"

"मला वाटतं की नवीन जोडप्याला नवीन घर गृहस्ती स्थापित करतांना त्रास जाऊ नये म्हणून लग्नाला आलेली पाहुणे मंडळी, नातेवाईक भेटवस्तू द्यायचे, मुलीचे आईवडील मुलीला घरातल्या वस्तू भेट म्हणून द्यायचे तर मुलाचे आई वडील मुलीला दागिने करायचे. त्यामुळे ते इतकंही वाईट नाही. कारण कितीतरी मुलं हुंडा घेऊन त्यातून खरंच बिजनेस टाकतात, घर घेतात, शिक्षण पूर्ण करतात, त्यांचे अडले नडले व्यवहार पूर्ण करतात. माझ्या चुलत भावानं हुंड्यात मिळालेलेल्या पैशांनी त्यांची गहाण पडलेली जमीन सोडवून घेतली आणि शेती करतोय. पण मुलींच्या घरच्यांनी आणि स्वतः मुलीनं कुठपर्यंत मागणी पुरवावी हा विचार करायला हवा.

त्यातही मुलाने जरी मदत म्हणून हुंडा घेतला तरीही ते कर्ज आहे हे विसरू नये आणि मुलीच्या आई बाबांना होईल तसं परत नक्कीच करावे. शेवटी त्यांच्या अंग मेहनतीचे पैसे असतात ते. 

खरंतर सर वाईट काहीच नसतं, ते वाईट बनतं जेव्हा मनुष्य त्याचा अतिरेक करतो. मग तो मागणी करण्याचा असो की मागणी पुरवण्याचा असो.

जेव्हा तुम्हाला माहितेय समोरच्याला त्रास होतोय तुमची मागणी पूर्ण करायला तरीही तुम्ही अडून बसता हुंड्यासाठी तेव्हा हुंडा वाईट होतो.
हुंडा वाईट होतो जेव्हा बापानं पैसे पाठवायला वेळ केला म्हणून मुलगी जाळली जाते.

भर मंडपात लग्न मोडायची धमकी दिली जाते. "

इंदिराचे डोळे भरून आले. इंदिराला पाण्याचा ग्लास देऊन त्यांनी पुढचा प्रश्न विचारला.


"तुला असं वाटतं का तुझी निवड होईल आणि झाली तर का?"

"हो माझी निवड नक्कीच होईल. कारण मी कष्ट करून इथे आली आहे. दोन्हीही परीक्षा पास करण्यासाठी मी भरपूर अभ्यास केला आहे. तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं दिली आहेत आणि एका BDO ऑफिसरमधे जो गावांप्रती भाव असायला हवा तो माझ्यात आहे."

"तु नक्की दोन्ही परीक्षा कोणतीही हेराफेरी न करता पास झाली आहेस? तुझ्या बॉलिवूड मित्राने पैसे वगैरे देऊन किंवा ओळखीने तर पास नाही करवून घेतलं ना तुला?" इंटरव्यू पॅनलच्या एका मॅडमनी विचारलं.

"अजिबात नाही मॅम." इंदिरा शांतपणे स्मित करत उत्तरली.

"बघ बरं कोणी RTI टाकला तूझ्याविरुद्ध तर सगळं बाहेर येईल. मग हे मोठमोठ्या लोकांचे कॉन्टॅक्टस काहीच कामाचे नसतात."

"मला माहिती आहे मॅम. मी खरंच दिवस रात्र अभ्यास करून आई बाबांपासून एक वर्ष दूर राहून, माझ्या सगळ्या कमींवर मात करून पास झाली आहे."

"ओके ! बाहेर बस. आम्हाला वाटलं तर परत बोलावू." मॅडमनी तिला बाहेर बसायला सांगितलं.

"ओके मॅम ! थँक्यू सर." ती हॉलच्या बाहेर जाऊन बसली प्रार्थना करत ती पास व्हावी म्हणून. दुपारी तीन वाजतापासून संध्याकाळी सहा पर्यंत सर्व मुलांचे इंटरव्यू होईपर्यंत इंदिरा तिथेच बसून होती. तिला वाटलं आता बोलावतील. पण तसं झालं नाही. सात वाजायला आले. चपराशीनं तिला बसलेलं बघितलं आणि आत सांगितलं. तेव्हा मॅडमने घरी जायला बाहेर निघतांना  इंदिराला येऊन सांगितलं,

"तु घरी जा आता. लिस्ट ऑनलाईन पब्लिश होईल काही दिवसात."

"ओके!" तिने थबकून मॅडमला विचारलं, " मॅम मी पास झाली का इंटरव्यू?"

"तुला काय वाटतं तेच होईल. आम्हाला असं बोलायची परवानगी नाही. चल गॉड ब्लेस यु !" साठीत असलेल्या IAS ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या मॅडम गाडीत बसल्या.

इंदिरानं मिनूला फोन करून ती कुठे आहे विचारलं. ती टॉलीवूडच्या एका चित्रपटा संदर्भात हैद्राबादला गेली होती. तिने चाबी ललिताकडे असल्याचं सांगितलं. इंदिरा तिकडे गेली. ललिता तिच्यासाठी पाणी आणि डिनर घेऊन आली. थोड्याफार गप्पा झाल्यावर जेवण करून इंदिरा झोपली.

अनुभव असेल का घरी? ओशिनला फोन करून विचारायचं का? जायचं का तिथे उद्या सकाळी?  खरंच दिव्या आणि अनुभवमधे पॅचअप झालं असेल का? त्यांना मी सोबत बघू शकेल का? पण आजीची भेट घ्यायला हवी ना, त्या कशा असतील, त्रागा करत असतील का? इथेच आहेत की फार्म हाऊसवर गेल्या राहायला? परत तानाशाह बनल्या असतील का? या सर्व प्रश्नांनी तिला रात्रभर शांतपणे झोपु नाही दिलं.

क्रमश :

धन्यवाद !

©®अर्चना सोनाग्रे वसतकार

0

🎭 Series Post

View all