Login

एक उनाड वाट #मराठी_कादंबरी भाग-31 अंतिम

Thank you

भाग 29 एडिट केल्यामुळे त्याची नवीन लिंक दिली आहे. खालील लिंकवर भाग 29 वाचता येईल. 

http://www.irablogging.com/blog/a-wandering-path-part-29

एक उनाड वाट भाग 31

अनुभव आणि सुबोध जुहू बीचवर आले. त्यांना ट्राफिकमुळे दोन अडीच तास लागले अंधेरी वरून जुहूला यायला. आठ वाजायला आलेले. जागोजागी फूड स्टॉल्सवर गर्दी होती. रात्रीची वेळ. टिम टिम लाईट. इतका मोठा बिच त्यावर इंदिराला कुठे शोधायचं? हा यक्ष प्रश्न. त्यातही कोणी अनुभवला ओळखलं तर.

"अनुभव तु त्या साईडला बघ, मी या साईडला जातो आणि तोंडावर रुमाल ठेव." समोरचा एक ज्युसवाला अनुभवला निरखून पाहतोय हे लक्षात येताच सुबोधने त्याला सांगितलं.  दोघेही दोन बाजूला इंदिराला शोधू लागले.

"इंदिरा अनुभव येतच असेल. तु पाण्यात जाऊन भिज तरी थोडी. मी तुला पाण्यातून बाहेर आणल्याच नाटक करते." मिनू इंदिराचा हात पकडून तिला उठवायचा प्रयत्न करत म्हणाली.

"नाटकं बस झाली मिनू. It's show time. बस तू खाली." इंदिरा शांततेत बोलली.

"अगं पण तु नाटक केलं हे समजताच तो भस्मासुर बनून आपल्या दोघींना त्याच्या रागात भस्म करेल त्याचं काय?" मिनू घाबरून बोलली.

"तो तुला काहीच म्हणणार नाही. याची गॅरंटी देते मी." इंदिरा सॅन्डविच वाल्याकडे वळली, "दादा एक छान चॉकलेट सॅन्डविच द्या बरं या मॅडमला."

"इथे माझा जीव जातोय आणि तुला चॉकलेट सॅन्डविच खायचं आहे." मिनू डोक्याला हात लावून बसली. झालं असं कि मिनू हैद्राबादवरून आल्यावर इंदिराने तिला चांगलं इमोशनल ब्लॅकमेल केलं अन मिनूने, 'अनुभव नाटक करत असल्याची कबुली दिली. त्याच्या पासुन दूर राहण्यातच कशाप्रकारे इंदिराची भलाई आहे ते समजावलं.  म्हणून मिनूही त्याच्या विरुद्ध इंदिराला भडकावू लागली होती. पण आता आपण त्याची पोल खोलली हे त्याला समजताच तो आपल्याला चित्रपट व्यवसायातुन बाहेर फेकून देईल अशी भीती तिला वाटू लागली. 

"मी नाही, तु खा चॉकलेट सॅन्डविच. चॉकलेट खाल्ल्यानं मनावर आलेला ताण दूर होतो."

"हे परमेश्वर ही कसं सांभाळणार BDO पद?"

"आता BDO पदाचा संबंध कुठून आला इथे?"

ती काही उत्तरनार तोच अनुभव तिथे आला.

"इंदिरा !" त्यानी तिला आपल्या दोन्ही हातानी आलिंगन देऊन मिठीत घेतलं, "तु ठीक आहेस ना." तिच्या डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवत त्यानं तिला विचारलं. अजून त्याची नजर मिनूवर पडली नव्हती. इंदिरा तो काय काय बोलतो शांततेने ऐकत होती.
"मूर्ख आहेस का तु? नवीन छान जॉब मिळतोय तुला. आणि तु कधीपासुन प्यायला लागलीस असं कुठेही बसून? आई बाबाला माहित झालं, आजीला कळलं तर. काही वाटतं की नाही? आता बोलणार काही?"

"मॅडम हे चॉकलेट सॅन्डविच." सॅन्डविच वाल्याने शेजारीच उभ्या असलेल्या मिनूला सॅन्डविच घ्यायला आवाज दिला. अन अनुभवची नजर तिच्यावर पडली. तेव्हा कुठे अनुभव भानावर आला. त्यानं इंदिराला निरखून बघितलं. ती कोणत्याच अँगलने पिलेली दिसत नव्हती. ओठांवर स्मित हास्य घेऊन त्याच्याकडे बघत होती. तो समजून चुकला की त्याची चोरी पकडल्या गेली.

"इंदिरा म्हणजे तु काही पिली वगैरे नव्हती ना आत्महत्येचा विचार करत होती."

"हूँSSSS!''

"आर यु क्रेझी? तुला माहितेय आम्ही किती दुरून मुंबईचे संध्याकाळचे ट्राफिक चिरत आलो. सुबोधनी तुला काही होऊ नये म्हणून फुल्ल स्पीडमधे कार चालवली. आपला किंवा समोरच्याचा अपघात होईल याची पर्वा केली नाही. मन सारखं स्वतःला शिव्या देत होतं. छातीवर दगडाचा मार बसतोय इतक्या जोरात धडधड होत होती आणि इथे येऊन बघतोय काय तर मॅडम मैत्रिणीसोबत चॉकलेट सॅन्डविचचा आस्वाद घेत आहेत."

"मग काय खरंच पिऊन पाण्यात जायला हवं होतं?" मिनुच्या हातात असलेल्या चॉकलेट सॅन्डविचचा एक घास घेऊन ती बोलु लागली, "तुम्ही म्हणाल तर आता जाते. काहीच हरकत नाही मला. पण त्या आधी मला सांगा, तुम्ही माझ्याशी खोटं का बोलले. कशाला इतकी नाटकं केली? खरं बोलायचं ना जे आहे ते. माझं मी ठरवलं असतं काय करायचं ते."

"इंदिरा मला तुला दुःखी बघायचं नव्हतं. बस !"

"मागच्या दोन तीन महिन्यापासून किती दुःख दिलं माहितेय तुम्ही. आणि म्हणता दुःखी बघायचं नव्हतं."

"इंदिरा लाईफटाइम दुखःपेक्षा हे काही महिन्यांचं दुःख परवडलं."

"वा मी कशानं दुःखी होणार, नाही होणार हे तुमचं तुम्हीच ठरवलं. मला विचारलंही नाही." इंदिरा अनुभवचा चेहरा हातात घेऊन बोलली.

"इंदिरा मला माझ्यावर भरोसा नाही." तिचे हात दूर करत तो म्हणाला, " काही महिन्यांपूर्वी माझ्या सावत्र आईचा फोन आला होता. रडत होती ती. माझा बाप तिला डिवोर्स देऊन तिसरं लग्न करतोय म्हणाली."

"आजी बोललीच होती तसं. त्यात तुमचा दोष का शोधता?"

"मला वाटलं मी तुला आनंदी नाही ठेऊ शकणार शेवटी त्या माणसाचे जिन्स आहेत माझ्या रक्तात. त्यात माझं प्रोफेशन असं कि रोज नवीन मुलीशी कामानिमित्त संबंध येईल. मला भीती वाटते कि तु माझ्या बाबामुळे माझ्यावर शक करायला लागलीस तर?"

"तुमचे बाबा एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. आणि बाप तसा मुलगा असं धोरण धरून चाललं तर मग प्रत्येक दारुड्याचा मुलगा दारुडा व्हायला हवा आणि चोराच्या मुलानं चोरीच करायला हवी. पण तसं होत नाही ना सर्वांच्या बाबतीत. म्हणून तर एका राक्षसी वृत्ती राजाच्या घरात भक्त प्रल्हाद जन्माला आले होते."

"इंदिरा तु का जिद्द करतेस?"

"मी मी करतेय जिद्द? जिद्द तुम्ही करत आहे. प्रेमी सोबत राहता यावं म्हणून माय बाप, अख्या दुनियेशी शत्रूत्व पत्करतात. अन एक तुम्ही आपल्याच लव्ह स्टोरीचे व्हिलन बनून बसले आहे."

यांचं दोघांचं इतकं जीव ओतून संभाषण सुरु कि जुहू चौपाटीवर अनुभव सिन्हा त्याच्या पूर्व प्रेयसी आणि हिरोईन सोबत दिसून आला ही बातमी पत्रकारांना आणि पत्रकारांनी त्याचं टीव्हीवर लाईव्ह टेलिकास्ट सुरु केलं. अनुभव- इंदिरा भोवती त्यांना बघायला, त्यांचे फोटो काढायला, शूटिंग घ्यायला लोकं गर्दी करू लागले. सुबोधनी त्या दोघांजवळ जायचा प्रयत्न केला. पण कोणी त्याला जायला जागाच देईना. त्यानं दोघांना आवाज दिला पण आपल्याच धुंदीत असलेल्या दोघांना काही ऐकू गेलं नाही. आणि मिनू, ती आरामात चॉकलेट सॅन्डविच खात त्यांचं संभाषण ऐकू लागली.

सुबोधला समजलं पोलीस आल्याशिवाय गर्दी पांगणार नाही. तसे दोन हवालदार होते बिचवर. पण त्यांचं कोणी ऐकेना. सुबोधनं त्याच्या पोलीस मित्राला फोन करून जुहू पोलीस स्टेशन मधून इन्स्पेक्टरला दहा बारा कॉन्स्टेबल घेऊन पाठवायची विनंती केली.

"इंदिरा आपण लग्न करून खरंच आनंदी राहू शकू?" अनुभव  तिला जवळ घेऊन म्हणाला.

"हो." इंदिराने डोळे बंद करून होकारार्थी मान हलवली. 

ते दोघं किस करणार तोच हवालदाराने जोरात शिट्टी वाजवली. ते दोघं त्यांच्या धुंदीतून बाहेर आले. आजूबाजूला बघतात तर कमीत कमी शंभर दीडशे लोकं. ते नशीब सुट्टीचा दिवस नव्हता म्हणून बिचवर जास्त गर्दी नव्हती.

पोलिसांना बघून गर्दी पांगली. पण ऑटोग्राफ, सेल्फी असं सुरु झालं. सुबोध दोन तीन हवालदारांना घेऊन अनुभव जवळ आला.

"चला इथून लवकर." सुबोध म्हणाला.

"बापरे इतकी गर्दी कधी झाली?" अनुभवनं आश्चर्यानं विचारलं.

"आम्हाला कळलंच नाही." इंदिरा बोलली.

"इंदिरा तुझ्यासाठी एक चॉकलेट सॅन्डविच घेऊ का पॅक करून?" मिनूनं विचारलं आणि सगळे हसायला लागले.

सर्व घरी जायला गाडीत बसले. पण हवालदाराने त्यांना सांगितलं कि त्यांच्या साहेबांनी त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन यायला सांगितलं.

"कशाला?"

"ते नाही सांगितलं."

"आम्ही नाही येत."

"असं नका करू. माझी नौकरी जाईल. आमचा साहेब लय भारी हाय."

"हम्म जावंच लागेल. आपल्या पायी कशाला बिचाऱ्याच्या नौकरीला धोक्यात टाकायचं?" इंदिरा म्हणाली.

अनुभव इंदिरा पोलीस स्टेशनमधे गेले. ठाणेदारनी त्यांच्यासाठी चहा पाणी मागवलं.

"तुम्ही आम्हाला चहा पाण्यासाठी बोलावलं इथे?" अनुभवनी विचारलं.

"नाही, मला तुम्हाला जवळून बघायचं होतं."

"झालं बघून जातो आम्ही."

"थांबा साहेब. मी काय म्हणतो ते तरी ऐका. तुम्ही दोघं इतके समजदार दिसता. तरीही असं का करता?"

"काय केलं आम्ही?" इंदिरानं विचारलं.

"अहो मॅडम तुम्हाला माहित आहे पोलिसांना किती टेंशन असतं. अन हे सुपरस्टार साहेब मस्त पब्लिकमधे एकटेच सिक्युरिटीशिवाय फिरतात. आज जर साहेबांना काही झालं असतं तर लोकांनी आमच्या डोकयावर मिरे वाटले असते ना."

"परत नाही होणार असं." अनुभवनी इंदिराला अँग्री लूक दिला.

"काय परत नाही होणार साहेब. एक दिड वर्षा पूर्वी धारावीत असेच फिरले ना तुम्ही मॅडम रागात बाहेर पडल्या अन गायब झाल्यावर."

दोघांनी एकमेकांना रागात बघितलं. "तुम्हाला कसं माहित?" त्यांनी एका सुरात ठाणेदाराला विचारलं.

"अहो हिरो हे, तेही टॉपचे. त्यांनी शिंकलं तरी सगळ्यांना माहित होतं."

"हम्म !" दोघांनी होकारार्थी मान हलवली.

"मी काय म्हणतो भांडण झालं ना तर आपापल्या खोलीत जाऊन पडावं. आदळ आपट करावी ना राग जाईस्तोवर. पण सामान्य माणसा सारखं रस्त्यावर नका येत जाऊ. आम्हाला लय टेंशनदायक होतं पब्लिकला सांभळतांना."

दोघंही खाली मान घालून शांतच. सुबोध आणि मिनू एकमेकांकडे पाहून तोंडावर हात ठेऊन हसू लागले.

"चला. धन्यवाद ! जा आता."

"हो हो , धन्यवाद यांना समजावून सांगितल्या बद्दल. आमचं तर काही ऐकतच नाहीत." सुबोध संधी साधून हसत म्हणाला.

"तु घरी चल मग सांगतो तुला." अनुभव त्याच्या कानात पुटपुटला.

सर्व गाडीत बसले. इंदिरा अनुभवनी एकमेकांकडे बघितलं आणि ठाणेदारचं बोललेलं आठवून पोट धरून हसू लागले.

"खरंच आपण लहान मुलासारखंच वागतो कधी कधी." इंदिरा म्हणाली.

"आपण?" अनुभव चिडून तिला बोलला, "तु वागतेस लहान मुलासारखी."

"मी?"

"मग काय? धारावीतही तूच रात्रीची गेली."

"तुम्ही म्हटलं होतं जा म्हणून."

"मी म्हटलं त्या बिल्डिंगच्या टेरेस वरून उडी मार तर मारशील का उडी?" बाजूच्या एका दहा मजली बिल्डिंगकडे बोट दाखवून अनुभवने तिला विचारलं. 

"मला मारायचं नाही इतक्यात. अजून खूप डोकं खायचं बाकी आहे तुमचं."

"काय?"

........

"हे परत सुरु झाले." मागे बघून मिनू सुबोधला म्हणाली.

"हे आता आजीची बोलणी खाल्ल्यावरच शांत बसणार." तो हसून उत्तरला.

सुबोध, मिनू आणि इंदिरा अनुभवच्या घरी पोहोचले. इंदिराचा फोन वाजला.

"हा प्रिया बोल."

"तु ठीक आहेस ना बाई?"

"हो मला काय झालं?"

"किती वेळचा फोन लावतेय मी."

"हो का. सॉरी मोबाईल बॅगमधे होता."

"अगं टीव्हीवर तुझी आणि अनुभवची लाईव्ह न्यूज बघितली आताच मी. सगळं ठीक आहे ना?"

इंदिराला आठवलं पोलीस आले तेव्हा लोकं मोबाईलवर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ घेत होते.

"हो प्रिया सगळं ठीक आहे. भेटली कि बोलते तुझ्याशी त्याबाबत. आणि हो मी मुलाखत पास झाली."

अनुभवनी तिच्याकडे आश्चर्यानं बघितलं. हिने आपल्याला सांगितलं नाही. 

"खरंच !"

"हो, आई बाबाला सांग मी झोपायच्या आधी करते कॉल."

"हो हो आम्ही वाट बघतो." प्रियाने फोन ठेवला.

"वा मॅडम BDO झाल्या अन तेव्हाचं आपण सोबत असूनही सांगितलं नाही."

"तुम्ही रिझल्टचा विषयच काढला नाही."

"हा म्हणजे मी विचारणार तेव्हाच तु सांगणार. नाहीतर नाही."

सुबोध यांची तु तु मै मै पाहून कंटाळून भिंतीवर डोकं आपटायाची ऍक्टिंग करू लागला.

"हे असंच भांडणार का लग्न झाल्यावर तुम्ही दोघं?" मिनू आजीला घेऊन आली, "तसं असेल तर मी फार्म हाऊसवरच बरी."

"सॉरी आजी." दोघंही कान धरून आजीसमोर बसले.

"उठा, या माझ्या जवळ." आजीनं प्रेमाने दोघांना जवळ घेतलं.

दिव्यानी मोबाईलवर अनुभव आणि इंदिराचा वायरल व्हिडीओ बघितला. तिला समजलं यांचं पॅच अप झालं म्हणून ती बॅग आणि मुलाला घेऊन अनुभवच्या घरून जाऊ लागली.

"दिव्या." इंदिराने दिव्याला थांबवलं, "कुठे जात आहेस?"

"तुमचं लग्न होतंय, नाटकावरून परदा उठला. मग मी इथे राहून काय करू?"

"चिल मार." इंदिरा तिच्या मुलाला काखेत घेऊन म्हणाली, "मला तुझं पोरगं खुप आवडलं. माझं लग्न होईपर्यंत थांब. तेव्हापर्यंत आपण  तुझ्यासाठी चांगला फ्लॅट शोधून घेऊ."

"मी फक्त दिसायला छान आहे गं." तिने इंदिराचा हात हातात घेतला, "पण तु तर तन आणि मन दोन्ही बाजूंनी छान आहेस. मनापासून थँक्यू !''

"वेलकम डियर."

"हूँ हूँ... उंहू !" आजीने आवाज काढून सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे खेचलं, "घरात मोठं माणूस असतांना आपणच निर्णय घेत नसतात."

"सॉरी आजी. पण बिचारी इतक्या रात्रीची कुठे जाईल लहान मुलाला घेऊन?" इंदिराने सफाई दिली. 

"बरं बरं !" आजी गंम्मतच रागाचा आव आणून बोलु लागली, "थांबून जा गं दिव्या. थांब बाई. तूझ्या मुलात जीव गुंतला इंदिराचा. तिची पुढल्या वर्षीची प्रॅक्टिस होईल त्याला वाजवण्याच्या निमित्ताने." आजी डोळे मिचकावत म्हणाली तसे इंदिरा आणि अनुभव लाजले.
...................
तर बंधू भगिनींनो लवकरच अनुभव आणि इंदिराचं पन्नास साठ लोकांच्या उपस्थितीत लग्न उरकण्यात आलं. कारण इंदिराला तिची नौकरीही जॉईन करायची होती. दोघं आनंदात  नांदू लागले.

अशाप्रकारे आपली कादंबरी इथे सुफळ संपूर्ण होते.

तळटीप : या कादंबरीचा सिझन टू वाचायची इच्छा असल्यास प्लीज कमेंट करा. कमेंट बघून लिहायला घेईल. आता छोटीशी विश्रांती. पाच - सहा दिवसांनी परत येतेय एक नवीन कादंबरी / कथा घेऊन आपल्या भेटीला. तेव्हापर्यंत 'एक उनाड वाट ' सलग वाचून घ्या. घरी राहा स्वस्थ राहा.

चूक भूल झाली असेल तर पदरात घ्या. 

धन्यवाद!

©®अर्चना सोनाग्रे वसतकार 

0

🎭 Series Post

View all