वरती गेल्यावर त्यांना जे दिसलं त्यावर विश्वास करणं जरा कठीणच होतं.
वरच्या मजल्यावर एक मोठी ओसरी होती आणि त्याच्या एका बाजूला लाकडी कठडा होता, जिथुन खाली पाहता येत होतं. आणि दुसर्या बाजुला मोठाल्या खोल्या होत्या.अगदी शेवटची खोली सोडली तर सगळ्या खोल्यांच्या दारांना मोठे कुलूप लावून ठेवलेले होते.आणि त्या मोठ्या ओसरीच्या मधोमध एक मोठा लाकडी झूला होता शिवाय भिंती ला लागुन एक दिवान आणि एक दोन खुर्च्या पण ठेवल्या होत्या. हे सगळं फर्निचर फारच सुंदर, नक्षीदार आणि उंची होतं. सगळ्यात आश्र्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे जागोजागी मोठे गुलदान होते आणि त्यामध्ये नुकतेच फ्रेश फूलं लावलेले होते, कोणितरी आत्ताच लावून ठेवलेल्या सारखे.
तिथे सगळं एकदम चकचकीत होतं, आणि धूळीचा तर नामोनिशाण पण न्हवतं. जणू कोणी तरी राहतच होते तिथे. त्यांना तर वाटलं होतं की इतक्या महिन्यांनी बंद असल्यामुळे तिथे, किडे किटकुळ आणि मोठाले जाळे लटकत असणार, आणि सगळं कसं धूळीनं माखलेलं असणार , पण इथे तर इतकी स्वच्छता होती की बस.जेंव्हा कि बरोबर सहा महिन्यांत कोणिच इथे आलेलं नव्हतं.
तेवढ्यात तिथे फुलांचा एक सुंदर सुगंध दरवळला आणि झूला जोरजोरात हलायला लागला, जणू एखादी व्यक्ती त्याच्या वर बसून झूलत आहे आणि आपली उपस्थिती दर्शवत होतं.
तिथे कोणीतरी आहे असा भास झाला आणि ते सगळेच खूप घाबरले. ते परत खाली जायला जिन्या कडे पळाले पण खालचं ते मोठं दार जोर्यात बंद झाल्याचा आवाज आला, म्हणजे जीना उतरुन खाली जायचा काहीच उपयोग न्हवता, कारण दार बंद झालं होतं. त्यांनी कठड्या वरुन वाकून खाली पाहिलं तर तिथे सुद्धा भयाण शांतता पसरली होती.
आता त्यांना तिथेच राहणं भागच होतं. आणि नुसतं उभं राहून सुद्धा काही उपयोग न्हवता, तर ते लोक खोल्या पाहत पुढे चालायला लागले. झुला आता थांबला होता आणि तो सुगंध पण त्यांच्या सोबत चालायला लागला.
सगळ्या खोल्या अगदी बंद होत्या. चालत चालत ते लोक अगदी शेवटच्या खोली जवळ आले. त्या खोलीचं दार मात्र उघडं होतं. खुप मोठी खोली होती ती. त्या लोकांनी आत डोकावून पाहिलं तर तिथे सगळ्या वस्तू अगदी जमवून ठेवल्या होत्या. खुप जुन्या पद्धतीची सजावट होती तिथे. भारतीय बैठक, त्यावर दोन मोठे लोढ आणि सुंदर शी चादर. मागच्या बाजूला एक खिडकी होती आणि त्याच्या जवळच एक मोठा लाकडी पलंग होता. पलंगावर एक मच्छरदाणी लावलेली होती आणि दोन उश्या आणि पांघरुण ठेवलं होतं. सगळं अगदी चांगल्या अवस्थेत होतं.
भिंती वर काही तैलचित्र आणि काही फ्रेम्स लावलेल्या होत्या. सगळं मिळवून असं वाटतं होतं की कोणाचातरी सतत वावर आहे तिथे.
सगळेच अगदी एखाद्या यंत्रा प्रमाणे वागत होते. काय होत आहे हे कळेल, इतकं त्यांचं डोकंच चालत न्हवतं. आपण कोणत्या तरी वेगळ्याच जगात जाऊन पोहोचले आहोत असं वाटतं होतं त्यांना.
ते सगळे बाहेर उभे राहूनच आतलं सगळं दृश्य पाहत होते.मग रचना सगळ्यात आधी आत गेली आणि अचानक धक्का लागल्या सारखी हल्ली.जणु तिच्या आत कोणी तरी एकदम घुसलं होतं. तिला पाहून सगळे आत जायला लागले. इथेही राहुल सगळयात मागे होता, त्यानं आत यायला जसच पाऊल उचललं, रचना त्यांच्यावर जोर्यात किंचाळली... आणि नाटका प्रमाणे एक दृश्यच उभं राहिलं.पडदा उठला व पहिला भाग सुरु झाला.
" तू बाहेरच थांब ****". तू एक पाऊल पण टाकलं न आत तर आज तुला सोडनार नाही मी, ***** , तू तर माणसाच्या नावावर एक ठप्पा आहे. जानवर आहे तू, निर्लज्ज, आणि तू राधाबाई, तू तर बाईच्या नावावर एक कलंकच आहे , निघ माझ्या खोलीच्या बाहेर ****, तुझी हिम्मतच कशी झाली आत यायची"
रचना ने अतिशय घाणेरड्या शिव्या देत राहुलला दारातच अडवलं आणि आधीच आत आलेल्या रुपालीचा हात धरून तिलाही शिव्या घालत फरफटतच दारा बाहेर काढलं.
रचनाचा आवाज आता बदललेला होता आणि चेहर्यावरील भाव पण खुप भयानक झाले होते. रागाने तिचा चेहरा लालबुंद झाला होता.
राहुल सकट सगळेच तिचं हे रुप पाहून थर थर कापायला लागले. तरी आश्चर्य म्हणजे रुपाली अजिबात घाबरली न्हवती अपितु तिच्या चेहऱ्यावर मघा सारखेच कुत्सित भाव होते. तिने पण रचनाचा हात जोर्यात झटकला.
" ए चल, मला हाकलतेय तू खोलीच्या बाहेर, विसरलीस का गं सगळं,. आणि काय गं एकेरी हाक मारतेय मला. तू पुन्हा माझा अपमान करायची चूक करत आहे पार्वती, हे लक्षात ठेव. एकदा तू माझा अपमान केला होता आणि त्याची तुला काय शिक्षा मिळाली होती, आठवून पहा जरा. आली मोठी मला बाहेर काढायला. "
रुपाली पण अचानक बदलली होती आता, तिचा आवाज सुद्धा बदलला होता. अपमान झाल्यामुळे ती पण अगदी लालबुंद झाली होती. आणि डोळ्यात जणू रक्त उमटलं होतं.
रुपाली न रचनाचा हात झटकला खरा, पण रचनाने ही दुप्पट वेगाने रुपालीला मागे ढकललं. आणि रुपाली खाली जमिनीवरच पडलीं.
" तू काय समजतेस गं मला,तू तर मला चांगलच ओळखत होतीस नं.... म्हणूनच, म्हणुनच धोक्यानी आणि चालाखी दाखवून तू माझी फसवणूक केली होती, नाही तर तू माझं काहिच वाकडं करु न्हवती शकत हे तुला बरोबर माहित होतं. आणि तू तेवढच करु शकत होतीस. पण खरंतर चूक माझीच होती.
तुझ्यात सुंदरता तर न्हवतीच, पण बुद्धीनं सुद्धा तू माझ्या पेक्षा दुय्यमच आहे हा माझा अंदाज चुकीचा ठरला आणि मी तिथेच माती खाल्ली. तू किती चालाख आहे, हे मला कळलंच नाही. पण ह्या सगळ्याची शिक्षा मात्र माझ्या निष्पाप मुलीला मिळाली, त्या कोवळ्या जीवाने तर अजून नीट डोळे सुद्धा न्हवते उघडले होते, आणि तू असा खेळ रचला राधा की....आणि ती ढसा ढसा रडायला लागली.
तिला असं रडताना पाहूनही राहुल वर काहीच फरक नाही पडला. उलट आता त्याच्या नजरेतही, तिच्या बद्दल तिरस्कार दिसत होता.
जय आणि सीमा तीला सावरायला म्हणून पुढे आले तर तीने त्यांना आपल्या जवळ येऊच दिलं नाही.
" तुम्ही तर,क्षमा वहिनी आणि भाऊजी लांबच राहा माझ्या पासून, माझ्या मुलीच्या हत्ये मधे तुम्ही दोघं पण शामिल आहात.सगळे जेव्हा तिच्या जीवावर उठलेले होते तेव्हा तुम्ही नुसतं पहात बसले होते. काहीच केलं नाही तिला वाचवण्यासाठी. तुम्ही पण गुन्हेगारच आहात."
रचना चं रडणं थांबतच नव्हतं,अपितु वाढतच जात होतं.आता विनायक जो आता पर्यंत चुपचाप बघत होता, पुढे आला आणि रचनाला चुप करायचा प्रयत्न करु लागला.तो प्रेमाने तिच्या खांद्यावर हात फिरवत जात होता पण तोंडातून एक शब्दही बोलत न्हवता. त्याची ती प्रेमळ जवळीक मिळाली आणि रचना चुप व्हाय पेक्षा आणखी ढसा ढसा रडायला लागली.तिच्या त्या रडण्या मध्ये अनेक भावना लपलेल्या होत्या.
" कुठे होता रे तू, कुठे होता त्या दिवशी, मला किती जास्त गरज होती तुझी, माझ्या मुलीला किती गरज होती तुझी, मेली रे ती माझी कोवळी पोर, तिचा काय दोष होता सांग."
रचना अगदी कळवळून रडत म्हणाली, आणि विनायक ला बिलगली. पण दुसर्याच क्षणात मागे वळून, बाकी सगळ्यांकडे विषारी नजरेने पाहत म्हणाली.
" ह्या सगळ्यांनी मिळून माझ्या मुलीचा जीव घेतला होता नं, आता मी ह्यांना सोडणार नाही आहे. माझा श्रापच ह्यांना इथं पर्यंत घेऊन आला आहे. ह्यांना नियतीने आणि माझ्या तपस्ये नं इथे खेचत आणलं आहे. आता मात्र इथून माझ्या मर्जी शिवाय बाहेर पडणं अशक्य आहे. तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भोगावीच लागणार आहे. मागच्या जन्मी तर तुम्ही वाचलात सगळे, पण आता मात्र तुम्हाला कोणीच वाचवू शकत नाही."
क्रमशः