चांगली देखरेख मिळाल्यावर राधाची तब्येत आता चांगलीच सुधारली होती.ती पण पार्वती बाई चं फार लक्षं ठेवायची.त्या दोघींचं आता चांगलच जमायला लागलं होतं.अधून मधून क्षमा वहिनी पण त्यांच्यात सामील व्हायला लागल्या.राधा दर संध्याकाळी,पार्वती बाईला आणि रक्षा वहिनीच्या मुलाला घेऊन बसायची आणि चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायची. गोविंद पण तिच्यातला बदल पाहून तिला मान सन्मान देऊ लागला.
दिनकर राधा बद्दल एकही शब्द बोलत न्हवता,पण त्याला तिचं इथे रहाणं आवडत न्हवतं. पार्वती बाईंची इच्छा बघुन त्याला जास्त बोलता न्हवतं येत,कारण त्याला अश्या अवस्थेत त्यांना दुखवायचं न्हवतं. राधा सुद्धा आपल्या खोलीतच रहायची, दिनकर किंवा वाड्यातल्या अन्य कारभाराशी ती अलिप्तच रहायची.कोणतीच विचारपूस वगैरे कधीच नाही करायची.
डोहाळजेवण जवळ आलं तसंच दिनकर चे आई बाबा पण तिर्थ यात्रा करून परत आले. मग पार्वती आणि क्षमा वहिनी नी त्यांना राधा बद्दल सांगितलं. आधी तर दोघांना फार राग आला तिला इथे घेऊन आलेल्या बद्दल,पण मग सगळी गोष्ट लक्षात आल्यावर,त्यांनी काही नाही म्हणतलं पण डोहाळजेवण झाल्या झाल्या तिला इथुन पाठवायला सांगितले.
डोहाळजेवणाचा कार्यक्रम फार थाटामाटात साजरा झाला.त्या दिवशी राधा सुद्धा, ह्या कार्यक्रमात सामील व्हायला बाहेर आली होती. दिनकरची तिच्या शी नजरानजर झाली, आणि तो पुन्हा तिच्यात हरवला. राधा मात्रं अलिप्तच होती, तीनं दुसर्यांदा दिनकर कडे पाहिलं सुद्धा नाही. आणि तिची हिच गोष्ट दिनकर ला अजून बैचेन करून गेली. त्या दिवसानंतर तो राधाला भेटण्या साठी सतत प्रयत्नरत असायचा. गोविंद ला आता हे लक्षात यायला लागलं होतं.पण त्याला हे सांगून पार्वती बाई ला दुःखी न्हवतं करायचं.
क्षमा वहिनी नी आपल्या सासूबाईंना, राधा ला, पार्वतीचं बाळंतपणं होईस्तोवर मदतीला थांबवून घ्यायची कल्पना सुचवली.
राधाचं सोज्वळ रूप पाहून, आई बाबा पण विरघळले होतेच, शिवाय राधानी सुद्धा आपल्या व्यवहारानं त्यांना आपलसं करुन घेतलं होतं., त्यांना ही वाटलं की राधा आता कुठे जाणार,तर त्यांनी तिला दूसरी व्यवस्था होईस्तोवर वाड्यातच रहायची परवानगी दिली.
दिनकरच्या चकरा राधा च्या खोली भवती वाढायला लागल्या होत्या. पण ते कोणाच्याही लक्षात न्हवतं आलं, शिवाय गोविंदच्या. पण राधाचं अलिप्त रुप पाहून तो थोडा निश्चिंत होता. तरी त्याची नजर दोघांवर बरोबर टिपलेली होती.आणि दिनकर ला ह्याचा अंदाज होताच.म्हणून तो गोविंद शी सावधच रहायचा.
आता पार्वतीचं बाळंतपणं अगदी तोंडावर आलं होतं.त्यांच्या माहेरहून, त्यांना बाळंतपणासाठी पाठवायचा निरोप पण आला होता. क्षमा वहिनी,ज्या परद्याच्या मागून सगळा खेळ खेळत होत्या, दिनकरचं काय चाललं आहे त्यांना बरोबर माहित होतं. त्यांनी सासूबाईंना पार्वतीला, बाळंतपणासाठी माहेरी पाठवायचा सल्ला दिला.
सासूबाईंना पण तेच बरोबर वाटलं होतं.आता पार्वती बाईंच्या भावांचा व्यवसाय खूप छान चालला होता.तर तिथली परिस्थितीही खूप बदलली होती.ते लोक आता पार्वती बाईंची काळजी घ्यायला चांगलेच सक्षम होते. पार्वतीबाईंनाही छान बदल आणि आराम मिळाला असता तिथे. तर त्यांनी पार्वती बाईंना माहेरी जायची परवानगी दिली.
गोविंदला, फार वाटत होतं की पार्वती बाईंनी माहेरी न जाता इथेच राहायला पाहिजे,त्याला पुढचं सगळं भविष्य दिसत होतं.पण शेवटी तो होता तर एक नौकर माणुसच आणि त्याला त्याच्या मर्यादा चांगल्याच माहित होत्या. पार्वती बाईंचे भाऊ आले होते त्यांना घ्यायला. जायच्या एक दिवस आधी त्या आणि राधा बोलत बसल्या होत्या.
" तुम्ही आपलं लक्षं ठेवा हं पार्वती बाई,तब्येतीची छान काळजी घ्या.आणि हो आता तुम्ही जाताय तर माझं इथे राहणं बरं नाही दिसणार, मी पण लवकरच जाईल कुठे तरी, निराधार महिलांसाठी खुप आश्रमं आहेत जगात, मलाही कुठे तरी आश्रय मिळूनच जाईल. पुढचं संपूर्ण आयुष्य आता तिथेच लोकांच्या सेवेत घालवणार आहे मी. माझ्या कर्मांचं प्रायश्चित्त म्हणून. तसं ही आता फार दिवस झाले आहे मला इथे.माझी प्रकृती पण आता फार बरी झाली आहे. तर हीच आपली शेवटची भेट समजावं, मी आता ह्या गावाच्या जवळपास सुद्धा नाही फटकणार, खुप लांब कुठेतरी जाणार आहे. तुम्ही खूप लक्ष ठेवलं माझं,मी तुमचं इतकं वाईट केलं होतं तरी.तुमच्या मुळेच मी आज जीवंत आहे. तुम्हा सगळ्यांचे मनापासुन आभार. " राधा नी रडवेल्या आवाजात म्हणतलं. पार्वती बाईंना फार वाइट वाटत होतं. त्यांना राधाला वाड्यातच ठेवायचं होतं पण त्या कसं सगळ्यांना सांगणार होत्या कि राधाला इथेच राहू द्या म्हणून. तेवढ्यात क्षमा वहिनी तिथे आल्या,त्यांनी दोघींचं सगळं बोलणं ऐकलं होतं. त्या राधा ला म्हणतात,
" तुम्हाला कुठेही जायची. गरज नाही आहे, राधाबाई.तुम्ही इथेच रहा आता, आहो इतका मोठा वाडा आहे, तर एका खोलीत तुम्ही राहिल्यातर कोणाला काय फरक पडणार आहे, शिवाय पार्वती बाई काही जन्म भरा साठी थोडीच माहेरी जाणार आहे, त्या आल्यावर त्यांना आणि बाळाला पण तुमची चांगली सोबत होऊन जाईल, आणि मी परवानगी घेतली आहे आई साहेबांची, त्यांचीही काही हरकत नाही आहे. रहा तुम्ही इथेच आता."
"हो ना, पहा देवानं तुमचं नशीब कसं पालटलं राधाबाई, कुठे तुमची अवस्था अगदी एका भिकार्या पेक्षाही गेलेली होती, आणि आता पहा तुम्ही कुठे येऊन पोहोचला आहात.तर रहा आता इथेच." पार्वती बाई नेहमी प्रमाणे बिना विचार करता बोलून गेल्या. पण आश्र्चर्य म्हणजे राधाबाईनी वाईट न्हवतं वाटुन घेतलं, शिवाय त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होतं.
मग सगळं ठरलं आणि पार्वती बाई, माहेरी जायला निघाल्या.
इथे पार्वती बाईंच्या गेल्याबरोबर दिनकर,एकदम बिनधास्त झाला होता. राधा च्या खोली भवती त्याच्या चकरा वाढत गेल्या होत्या.राधाचं तुटक वागणं त्याला फार खटकत होतं. आता त्याचा संयमच सुद्धा संपत चालला होता.
मग एकदा तर तो राधाच्या खोलीचं दार उघडं पाहून आत चाललाच गेला.त्याला वाटलं होतं की आता राधा ओरडणार किंवा रागावणार पण त्याच्या अपेक्षे विरुद्ध, त्याला खोलीत आलेलं बघून राधाने हसतच त्यांचं स्वागत केलं.
" आलात तुम्ही,मी तुमचीच वाट पाहत होती.मला माहित होतं की तुम्ही यालच. पण इतका उशीर कराल हे न्हवतं माहित बुवा..किती वाट पहायला लावली तुम्ही... राधा ने लाडिक स्वरात म्हंटलं.
दिनकर चकित होऊन तिच्या कडे पहातच राहिला, इतके दिवस त्याच्या कडे एक नजर सुद्धा पाहत नसलेली राधा बाई कडुन अशी अपेक्षा न्हवती त्याला.
राधा खरच दिसायला अगदी साधारण होती,पण तिच्या बोलण्यात आणि नजरेत कमालीची जादू होती. नुसती नजरेने सुद्धा कोणालाही आपल्या कडे आकर्षित करुन घ्यायची कला होती तिच्या कडे.
दिनकरची भीती आता गेली होती,तो बिनधास्त आत जाऊन बसला. दोघं खुप वेळ बोलत बसले होते.
आता तर दिनकर, कधीही राधा च्या खोलीत बिनधास्त रहायचा. आई बाबा आपल्या खोलीतच राहायचे, काही काम असलं तरच बाहेर यायचे. भाऊ आणि वहिनी सगळं पाहत होते पण दुर्लक्ष करत होते.
एक गोविंदच होता ज्याला हे सगळं पाहवत नव्हतं.पण काय करावं त्याला उमजतच न्हवतं. पार्वती बाईला त्यानी बहिण मानलं होतं, त्याही गोविंद वर जीवापाड प्रेम करायच्या. त्याला आठवतं,पार्वती बाई लग्नं करुन आल्या तेंव्हा त्या फार एटित रहायच्या. दिसायला फारच सुरेख होत्या, आणि ह्याचा त्यांना फार गर्वही होता आणि एवढ्या मोठ्या वाड्यात लग्नं झाल्यामुळे त्यांचा हा गर्व, घमंड आणि माज मध्ये बदलला होता.नौकर माणसांचा तर त्या उठता बसता अपमान करायच्या. फक्त एक गोविंदच होता जयाच्याशी त्या फार प्रेमाने वागायच्या. गोविंद ला पण त्यांच्या बद्दल फार प्रेम आणि काळजी होती.
गोविंद आता दिवस रात्र चिंता करत बसायचा. कारण राधाचं वागणं पण बदललं होतं,ती आता पूर्वी ची राधा झाली होती. सगळ्यांसमोर इतकं सोज्वळ वागायची की कोणाला तिचं खरं रुप दिसतच न्हवतं. पण गोविंद ला सगळं दिसत होतं. त्याला हे ही माहित होतं की भाऊसाहेब आणि वहिनी सगळं पाहून सुद्धा डोळे झाकताय, त्यांना सांगुन काही उपयोग नाही आहे.आई बाबा हृया आनंदात होते कि दिनकर सुधारला आहे,तर त्यांचंही मन दुखवायला त्याला नको होतं.
आता दिनकर आणि राधा अतिशय निर्लज्ज झाले होते.आणि प्रकरण हाताबाहेर जाऊ लागलं होतं.दिनकर पुन्हा राधाच्या जाळ्यात अडकत जात होता.
मग जेव्हा अतिच झाली आणि पाणी डोक्यावरून जाऊ लागलं,तर तर त्याने एक मोठा निर्णय घेतला आणि....
क्रमशः