Login

आभाळाएवढी तिची माया. भाग - १

मायेने सगळ्यांना गुंफून ठेवते तिच खरी.
आभाळाएवढी तिची माया. भाग - १

ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५

"चिंटू, बबली, लवकर या. तुमचा नाष्टा तयार आहे. अगदी तुम्हाला आवडतो तसाच कुरकुरीत डोसा बनवलाय मी." शिलाने आवाज दिला तसं ते दोघंही धावतच तिच्याकडे आले.

"मोठी आई, मी डोसा खाणार पण तू मला तुझ्या हाताने भरवायचा आहे." बबली म्हणाली तसं शिलाने लाडाने तिचा गाल धरला आणि त्या दोघांनाही स्वतःच्या हाताने भरवू लागली.

चिंटू आणि बबली हे दोघंही शिलाच्या लहान्या दिराची मुलं होती. तिलाही एक मुलगा होता पण तो मोठा होता, त्यामुळे तो स्वतःचं स्वतः सगळं करायचा. पण चिंटू आणि बबली दहा वर्षाचे होते, दोघेही जुळे होते. शिलाची लहान जाऊ निशा ही नोकरी करत होती त्यामुळे चिंटू आणि बबलीला लहानपणापासून शिलानेच सांभाळलं होतं आणि आताही तिच त्या दोघांचं सगळं काही बघत होती. त्यांचं एकत्र कुटुंब होतं. सुरूवातीला सगळं काही छान होतं. पण हल्ली निशाचं वागणं बदलत चाललं होतं. शिलाने मुलांचे जास्त लाड केलेले तिला आवडायचं नाही. आताही शिला मुलांना भरवत असताना निशाने ते पाहिलं आणि तिला शिलाचा राग आला.

"वहिनी, मुलं आता एवढीही लहान नाही राहिली. मोठी झाली आहे दोघंही, ते त्यांच्या हाताने खाऊ शकतात. पण तुम्ही विनाकारण त्यांना काहीही सवय लावताय. ते मला आजिबात आवडत नाही!" निशा रागाने म्हणाली. तसं शिलाने हलकसं हसत तिच्याकडे पाहिलं.

"असूदे गं, अजून लहानच आहे. एकदा मोठी झाली की मग आपल्याला इच्छा असली तरी ते आपल्या हातून खाणार नाही." शिला म्हणाली. निशाला काही ते पटलं नाही ती सरळ तिथून निघून गेली आणि तिच्या नवऱ्याचं म्हणजेच प्रशांतचं डोकं खाऊ लागली.

"प्रशांत, मला वहिनींचं वागणं आजिबात आवडत नाही. नको त्या घाण सवयी लावून ठेवल्यात त्यांनी मुलांना. त्यांना साधं स्वतःच्या हाताने खाऊ सुद्धा देत नाही, आता तुम्हीच सांगा... आपली मुलं एवढीही लहान नाही की स्वतःचं स्वतः खाऊ शकत नाही." निशा चिडून म्हणाली.

"शांत हो निशा, वहिनीचा स्वभाव प्रेमळ आहे. ती आपल्या मुलांचं जे काही करतेय ते प्रेमाने करतेय, मुलं जन्माला आल्यापासून ते आतापर्यंत तिने कित्ती काय काय केलं आहे त्यांचं. मुलांना बरं नसलं की रात्र रात्र जागून ती त्यांच्याजवळ बसून राहायची आणि तू झोपून घ्यायची. मग आता तिने थोडे फार लाड केले तर काय बिघडलं!" प्रशांत.

"म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला मीच चुकीची वाटते ना, ते काही नाही मला आता या घरात राहायचंच नाही. मी जर या घरात त्यांच्या सोबत राहिली तर मुलांचं भविष्य घडणारच नाही, आपण वेगळेच राहू या!" निशाच्या बोलण्याचा प्रशांतला एकदमच धक्का बसला. एवढ्याशा कारणावरून सरळ वेगळं राहायचं म्हणतेय हे काही त्याला पटेना. हिचे नक्कीच कोणीतरी कान भरले असतील असे त्याला वाटले.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all