आभाळाएवढी तिची माया. भाग - २
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
"निशा, काय बोलतेय तू हे? एवढ्याशा कारणावरून लगेच वेगळं राहायचं म्हणतेय, दादा वहिनीने आपल्यासाठी किती आणि काय काय केलंय हे विसरलीस का तू? त्यांचं सोड, जरा आई बाबांचा तरी विचार कर. त्यांचं वय झालंय आता, आपण वेगळं राहिलो तर त्यांना किती दुःख होईल!" प्रशांत म्हणाला.
"तुम्हाला माझी सोडून सगळ्यांची काळजी आहे, एकदा तरी मला काय हवं याचा विचार करा तुम्ही. या घरात जरा म्हणून प्रायव्हसी भेटत नाही, सारखं कोणी ना कोणी आसपास असतंच. कुठे फिरायला जायचं असलं की सगळ्यांची परवानगी घ्यावी लागते. स्वतःच्या मनाने आयुष्य जगताच येत नाही." निशा चिडून म्हणाली.
"अस्सं, अगं महिन्यातून एकदा तरी तुला तुझ्या माहेरी जायचं असतं. गेली की तीन-चार दिवस तिकडेच राहते, तेव्हा वहिनीच करते ना मुलांचं सगळं. त्यांची शाळा, क्लास, अभ्यास यापैकी कसलंही टेन्शन नाही तुला." प्रशांत खुप समजून सांगत होता पण निशा आता हट्टालाच पेटली होती ती काही केल्या ऐकेना. त्या दोघांचं बोलणं खोलीच्या बाहेर पण जाऊ लागलं. पण नवरा बायकोंमध्ये पडायला नको म्हणून कोणीच आलं नाही. निशा ऐकेना म्हणून प्रशांत शेवटी ऑफिसला निघून गेला. तो गेल्यावर निशा तिथेच शांत बसून राहिली. आज काही ती ऑफिसला गेली नाही.
दुपारच्या वेळी निशाच्या आईचा फोन आला. निशाने वैतागून तो फोन घेतला.
"हा बोल आई." फोन उचलताच निशा म्हणाली. तिच्या आवाजातलं वेगळेपण तिच्या आईला जाणवलं.
"काय गं, काही झालंय का? तुझा आवाज जरा उतरलेला वाटतोय!" आईने विचारलं.
"आई, मला आता या घरात नाही राहायचं. माझा श्वास गुदमरतोय इथे, माझ्या ऑफिसच्या सगळ्या मैत्रिणी एकट्या राहतात. तुला माहितीये का फक्त त्या त्यांचा नवरा आणि मुलं बसं एवढंच कुटूंब. त्यांना किती स्वातंत्र्य आहे, पाहिजे तसं राहायचं, पाहिजे तेव्हा घरी यायचं, मस्त हाॅटेलमध्ये जेवायला जायचं. मला तसं काहीच करता येत नाही." निशा म्हणाली.
"करत असतील तुझ्या मैत्रीणी मजा मस्ती, पण एक लक्षात ठेव निशा, तू जेव्हा ऑफिवरून घरी येते ना तेव्हा तुझ्या हातात गरमागरम चहा असतो ना तो त्यांना कधीच मिळत नसेल आणि रात्रीचं जेवणाचं ताट सुद्धा आयतं तुझ्या पुढे येतं. इतकं सगळं चांगलं असताना तू तुझी तुलना इतरांशी का करतेय?" आईनेही निशाला समजून सांगितलं पण निशाला स्वतःच्या आईचं सुद्धा पटलं नाही. तिला फक्त तिच्या मैत्रिणींसारखं स्वतंत्र आयुष्य जगायचं होतं.
पुढचे काही दिवस निशाचं वागणं अतीच होत गेलं. दोन वेळा तिच्या आईने घरी घेऊन तिला एवढं समजून सांगितले पण तिला कोणाचंच पटत नव्हतं. शेवटी शिलानेच प्रशांत सोबत बोलायचं ठरवलं. संध्याकाळी तो घरी आला तेव्हा शिला लगेच त्याच्याशी बोलायला गेली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा