Login

आभाळाएवढी तिची माया. भाग -३

मायेने सगळ्यांना एकत्र गुंफून ठेवलेली ती.
आभाळाएवढी तिची माया. भाग - ३

ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५

"प्रशांत भाऊ, निशाचा एवढाच हट्ट आहे तर तुम्ही रहा वेगळं, होऊ द्या तिच्या मनासारखं." शिला म्हणाली पण प्रशांतला काही ते पटलं नाही.

"नाही वहिनी, वेगळं राहायचं म्हटलं तर खुप जबाबदाऱ्या वाढतील, मला कामानिमित्त सतत बाहेर गावी जावं लागतं. तेव्हा निशा आणि मुलं तुमच्यासोबत असतात म्हणून तर मी निश्चिंत असतो. ही गोष्ट निशाला नाही समजत." प्रशांत.

"पण तुम्ही तिचं ऐकलं नाही तर ती नेहमी असेच वाद घालत राहील, एकतर सतत तुमची भांडणं ऐकून आई बाबांना आणि मुलांनाही त्रास होतोय." शिला म्हणाली. नंतर शिलाच्या नवऱ्याने आकाशने आणि त्याच्या आई बाबांनी पण प्रशांतला समजावलं. शेवटी निशाचा हट्ट आणि सगळ्यांच्या आग्रहामुळे प्रशांत वेगळं राहायला तयार झाला. आणि त्याने ही गोष्ट निशाला सांगितली.

"निशा, आपण पुढच्या महिन्यातच दुसरीकडे राहायला जातोय." प्रशांतने सांगितले तसं निशाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. ती खुप खुश झाली आणि ज्या मैत्रीणींचं ऐकून ती वेगळं राहायचा हट्ट करत होती त्या सगळ्या मैत्रिणींना तिने फोन करून सांगितले. मैत्रीणीही ते ऐकून खुश झाल्या.

पुढचा एक महिना तर निशा एवढी खुश होती की काय करू आणि काय नको असं झालं होतं तिला. ती खुश होती, पण घरातले सगळेच उदास होते. पण तरीही तिच्या आनंदात आनंद मानत होते.

अखेर महिना संपला आणि प्रशांत आणि निशा आपल्या मुलांना घेऊन नवीन घरी राहायला गेले. घरात पाऊल टाकताच निशाला एकदम मोकळं मोकळं वाटू लागलं.

"प्रशांत, बघितलं ना इथे किती मोकळं वाटतंय. आता कधीही काम करा, नका करू, इथे बोलायला कोणीच नाही." निशा म्हणाली पण प्रशांत काहीच न बोलता आत निघून गेला.

नवीन जागा म्हणून मुलांनाही सुरवातीला छान वाटले पण नंतर काही दिवसांनी मुलांना तिथे नकोसं वाटू लागलं. कारण निशा मुलांना आजिबात वेळ देत नव्हती, हळूहळू घरी आल्यावर तिला कामाचाही कंटाळा येऊ लागला, त्यामुळे घरी यायची इच्छा होत नव्हती मग ती घरी पण वेळेवर येत नव्हती. तिचं स्वातंत्र्य जगत असताना तिचं मुलांकडे आणि प्रशांत कडे दुर्लक्ष होऊ लागलं.

संध्याकाळी प्रशांत ऑफिस वरून घरी आला तेव्हा चिंटू धावतच त्याच्याकडे आला. त्याचा चेहरा काहीसा रडवेला दिसत होता.

"पप्पा, बबलीला ताप आलाय. मी कधीपासून मम्मीला फोन करतोय पण ती उचलतच नाहीये." चिंटू रडत रडतच बोलला. प्रशांतने ते ऐकताच बॅग खाली टाकली आणि धावतच बेडरूममध्ये गेला आणि पाहिलं तर बबली निपचित पडून होती. प्रशांत घाईघाईने तिच्याजवळ गेला आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला तर तिला खूपच ताप होता. मग त्याने निशाला फोन केला पण आताही तिने फोन उचलला नाही. त्याला आता काहीच सुचेना. मग त्याने शिलाला फोन केला. प्रशांतचा फोन बघून शिलालाही काळजी वाटली आणि तिने लगेच तो उचलला.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all