Login

आभाळाएवढी तिची माया. भाग - ४

मायेने एकत्र सगळ्यांना गुंफून ठेवते तिच खरी समंजस.
आभाळाएवढी तिची माया. भाग - ४

ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५

"हॅलो प्रशांत भाऊ, काय म्हणता बोला ना!" फोन उचलताच शिला म्हणाली.

"वहिनी, अगं बबलीला खुप ताप आलाय. त्यात निशाही घरी नाहिये. मला तर काय करावं काहीच सुचत नाहीये." प्रशांत म्हणाला.

"तुम्ही काळजी करू नका, मी यांना घेऊन लगेच तिकडे येते. मग आपण बबलीला घेऊन डाॅक्टरकडे जाऊ." शिला म्हणाली आणि तिने फोन ठेवला आणि आकाशला ही तिने ही गोष्ट सांगितली. मग आकाश आणि ती लगेच प्रशांतच्या घरी गेले. त्यांनी बबलीला दवाखान्यात नेले.

डॉक्टरांनी बबलीला चेक केलं आणि तिच्या काही टेस्ट करायला सांगितल्या. तिला ताप जास्त असल्यामुळे त्यांनी तिला ॲडमिट करून घेतलं. आकाश थोडा वेळ थांबून घरी गेला. शिलाने प्रशांतलाही घरी जायला सांगितलं आणि ती एकटीच बबली जवळ थांबली.

प्रशांत घरी आल्यावर बऱ्याच वेळाने निशा घरी घरी आली आणि आल्या आल्या सोफ्यावर अंग टाकून दिले. तिला बघून प्रशांत लगेच तिथे आला. तो काही बोलणार तोच तिने बोलायला सुरुवात केली.

"प्रशांत, आज खूप दमलेय मी उशीरापर्यंत ऑफिसची मिटींग चालू होती, आता माझ्यात काही जेवण वगैरे बनवायची ताकद नाही. तुम्ही बाहेरूनच काही तरी मागवा." निशा म्हणाली आणि लगेच उठून जाऊ लागली.

"निशा अगं बबलीला...." प्रशांत बोलतच होता तोच निशाने हात दाखवला.

"प्रशांत, प्लीज मला आता काहीच ऐकायचं नाहीये. बबलीला काय हवंय ते तुम्हीच बघा." निशा म्हणाली आणि त्याचं बोलणं न ऐकताच झोपायला गेली. प्रशांतला तिचा खुप राग आला होता पण तो काहीच करू शकला नाही. त्याने चिंटू साठी आणि त्याच्यासाठी खिचडी भात केला आणि दोघांनी तोच खाल्ला.

प्रशांत बेडरूममध्ये आला तेव्हा निशाला झोप लागली होती. त्यामुळे तो ही चिंटूला घेऊन झोपला.

सकाळी उठल्यावर निशाच्या लक्षात आले की बबली घरी नाहीये, तिने लगेच प्रशांतला बडबड चालू केली.

"प्रशांत, तुम्ही बबलीला त्या घरी पाठवले ना. तिला तिकडे पाठवायच्या आधी तुम्हाला मला एकदाही विचारावसं नाही वाटलं का? पण मी म्हणतेय एकदा आपण तिथून आलोय ना मग तुम्हाला परत तिकडे तिला पाठवायची गरजच काय होती?" निशा आवाज चढवत म्हणाली. तिचं असं काही माहिती करून न घेता बोलणं प्रशांतला आजिबात आवडलं नाही. तो उठला आणि तिच्याकडे रागाने बघू लागला. त्याच्या डोळ्यातला राग पाहून निशा जरा घाबरलीच.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all