Login

आभाळाएवढी तिची माया. भाग - ५ (अंतिम भाग)

शेवटी तिची मायाच जिंकली
आभाळाएवढी तिची माया. भाग - ५

ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५

"तुला विचारायला किंवा सांगायला तू कोणाचं काही ऐकून घेत असते का? काल चिंटूने तुला किती वेळा फोन केला पण तू एकदाही उचचला नाही, रात्री घरी आली तेव्हा मी सांगत होतो तर माझंही ऐकलं नाही. घरात आणि मुलांकडे एवढं दुर्लक्ष करून चालत नाही निशा. मान्य आहे की तू नोकरी करतेय पण घरातही थोडं फार लक्ष हवं, काल बबली तापाने फणफणत होती आणि आता ती हाॅस्पीटलमध्ये ॲडमिट आहे. ही गोष्ट तुला माहिती नाही, म्हणजे तू विचार कर. किती चुकीचे वागतेय तू. एवढं सगळं होऊन सुद्धा तू बबली कुठे आहे असं नाही विचारलं तर डायरेक्ट ओरडायला सुरुवात केली." प्रशांतचा आज आवाज वाढला. बबलीला ताप आहे हे ऐकून निशाला मेल्याहून मेल्यासारखे झाले.

"मग आता बबली जवळ कोणी आहे का?" निशाने खाली मान घालून विचारलं.

"हो वहिनी आहे तिच्याजवळ, ती होती म्हणून तर मला चिंटू सोबत राहता आलं." प्रशांत म्हणाला. निशा पुढे काहीच बोलली नाही, तिने पटापट अंघोळ वगैरे आटोपून मग प्रशांत सोबत ती बबलीला बघायला हाॅस्पीटलमध्ये गेली. तिथे गेल्यावर पाहिलं तर निशा, आकाश आणि तिचे सासू सासरे पण तिथेच होते. त्यांना सगळ्यांना बघून तिला खूप अपराधी वाटलं.

"वहिनी, बबली कशी आहे आता?" निशाने विचारलं.

"तिला टायफॉइड झालाय, डाॅक्टरांनी पुढचे चार दिवस  हाॅस्पीटलमध्येच ठेवायला सांगितले आहे." शिला म्हणाली. निशा बबली जवळ येऊन बसली. पण बबलीने शिलाचा हात सोडला नाही. आता निशाला आपण कुठे चुकलो ते समजलं.

पुढचे चार दिवस शिला बबलीजवळच होती आणि ती तिची छान काळजी घेत होती. चार दिवसांनी बबलीला डिस्चार्ज मिळाला. तिला घरी घेऊन जायच्या वेळी निशा आली आणि शिलाची माफी मागू लागली.

"वहिनी, माझं चुकलं मला मला माफ करा. मला आता आपल्या घरी परत राहायला यायचं आहे." निशा म्हणाली.

"नाही निशा, आता तुम्ही जिथे राहताय तिथेच रहा. आपण एकत्र राहिलो की परत वाद होतील, तुला आमच्या काही गोष्टी पटणार नाही तसंच आम्हालाही तुझ्या काही गोष्टी पटणार नाही. एकत्र राहून एकमेकांची मने दुखावण्यापेक्षा आपण वेगळं राहून एकमेकांची मने जपू आणि एकमेकांना मदत करू आणि लक्षात ठेव तुम्ही कुठेही असला तरी माझी माया कधीच कमी होणार नाही ती कायम आभाळाएवढी असणार आहे." शिलाचं बोलणं ऐकून निशाचे डोळे भरून आले तिने तिला मिठी मारली. आज खऱ्या अर्थाने तिला शिलाची माया कळली.

निशा आणि शिला वेगळं राहत होत्या पण सणासुदीच्या दिवशी सगळेच एकत्र येत होते आणि मोठ्या उत्साहात सण साजरे करत होते. आज वेगळं राहूनही त्यांचं कुटुंब एकत्र आहे.

समाप्त.

©® सौ. रोहिणी किसन बांगर.

टिम - सुप्रिया
0

🎭 Series Post

View all