Login

आभास हा....!!! - भाग 2

Suspense Story
आभास हा....!!!  - भाग 2

आभास हा - भाग 2 


"Wow........!!! " सगळ्यांच्या तोंडून एकदमच शब्द बाहेर पडले. 

दादासाहेब आणि त्यांचा मुलगा संग्राम यांनी मळाच इतका सुंदर ठेवला होता की बघणाऱ्याचं भानच हरपायचं. जवळजवळ त्यांची दहा ते बारा एकरची शेती होती. अर्ध्या अधिक भागात ऊस लावला होता. तर थोड्या भागात केळी लावली होती. उंचच उंच नारळी पोफळी... त्यांच्या बाजूने छान फुलांचे ताटवे.... मुळा , चाकवत , माठ अशी वेगवेगळ्या रंगांची भाजी.... एका बाजूला आंब्याची मोठी डेरेदार झाडे..... आणि त्यांच्या मध्ये त्या छान सावलीखाली छोटंसं टेबल मांडुन बैठकीची व्यवस्था केली होती.  सिध्दार्थच्या सगळ्याच मित्रांना ते फार आवडलं. बाजूच्या हिरव्यागार परिसरामुळे इतकं छान आणि प्रसन्न वाटतं होतं की असा थंडावा आणि शांतता एखाद्या हिलस्टेशनला देखील मिळाली नसती. त्या आंब्याच्या झाडांच्या खालीच इशूने बस्तान मांडलं. ती शांत बसून एक एक गोष्ट न्याहाळत होती. 


" ई..... ए इशू तिकडे मातीत काय बसतेस..? उठ कपडे खराब होतील.." पूजा तोंड वाकड करत म्हणाली. 


" काही होत नाही. उलट इकडे गावात आल्यावर हे जे सुख  मिळतं ना.. ते मला जाम आवडतं. ये तू पण बस...." असं म्हणून तिने पूजाला हात धरून खाली खेचलं त्यानं पुजाचा तोल गेला आणि तिच्या हाताला माती लागली. 


" ई वववव....... हे काय माती लागली सगळी...." तिने तोंड वाकडं केलं तसं इशू हसली. 


" सिद..... सिद... ही बघ ना मुद्दाम मला मातीत बसवतेय. मला नाही आवडत. मला हात वॉश करायचे आहेत. चल मला दाखव कुठे ते ...." पुजाने सिदच्या हातात हात अडकवला आणि ती त्याला घेऊन दुसरीकडे गेली. 


इकडे ऋषी आणि बाकीचे फ्रेंड्स हसत होते. सिद आणि पुजाचं एकमेकांवर प्रेम होतं. हे ग्रुप मध्ये सगळ्यांनाच माहीत होतं. दोघही एकमेकांच्या अगदी विरुद्ध होते तरीही पुजाचा अल्लडपणा सिध्दार्थला भावला होता. पण तिच्या काही काही गोष्टी त्याला पटत नव्हत्या पण तरीही त्याला ती आवडत होती त्यामुळे तो तिच्या वागण्या , बोलण्याकडे दुर्लक्ष करायचा. 


" यार हा सिद कसे काय हिचे एवढे नखरे झेलतो काय माहीत...?? इतकं नाजुक राहून कसं व्हायचं हीच..." ऋषी म्हणाला. 


" तेच तर.. गावात आलोय आपण. माती लागणारच ना... " मिनूने पण ऋषीच्या बोलण्याला दुजोरा दिला. 


थोड्या वेळात सिद आणि पूजा परतले. मग शिवा आणि संग्रामने मिळून सिदच्या सगळ्या मित्रांना मळ्यातच जेवायला वाढलं. झाडाच्या अशा मस्त गारव्यात आणि डेरेदार सावलीखाली जेवताना त्यांना खूप भारी वाटतं होतं. जेवणाचा बेत देखील उत्तम केला होता. चटणी भाकरी , झुणका, कांदा बघूनच तोंडाला पाणी सुटलं होतं. सगळ्यांनी जेवणावर भरगोस ताव मारला. जेऊन , मजा मस्ती करून सगळे संध्याकाळी घरी परतले. 

...............................

वाड्यातल्या एका भागात सिदच्या सगळ्या मित्रांची राहण्याची व्यवस्था केली होती. रात्रीची जेवणं झाल्यावर ईश्वरी बाहेरच्या झोपाळ्यावर येऊन बसली. हवेत चांगलाच गारठा होता. तिच्या डोक्यातून काही केल्या त्या भूत बंगल्याचा विषय काही जात नव्हता. 'खरंच भुतं असतात का...?? छे आपला नाही विश्वास त्यावर...' ती आपल्याच विचारात मग्न होती. तेवढयात मागून येऊन तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला आणि ती दचकली. 


" काय गं....?? केवढ्याने दचकलीस....?? " सिद पुढे येत म्हणाला. 


" अं... काही नाही... ए सिद .. तो भूत बंगला आय मीन त्याला भूत बंगला का म्हणतात....?? " शेवटी तिच्या मनात घोळत असणारा प्रश्न तिच्या ओठांवर आलाच. 


" अजुन आहेच का तुझ्या डोक्यात ते....?? मला नाही माहीत. आम्ही लहानपणापासून बघतोय तर त्याला भूत              बंगलाच म्हणतात. फारफार तर तुला संग्राम दादा सांगू शकेल त्या बाबतीत. पण इशू तू उगीचच त्यात जास्त इनवोल्व्ह होऊ नको...." तो म्हणाला. 


" हो तरी पण. मला त्याची स्टोरी ऐकायची आहे. तू सांगशील का संग्राम दादांना सांगायला प्लिज प्लिज..." तिने क्युटसा फेस केला. मग सिद काय बोलणार. 

त्यांचं बोलणं चालू असतानाच तिथे पूजा आली. 

" हे गाईज.... काय चाललंय..? झोपायचं नाही का...? " तिने विचारलं. 


" हो येतच होतो. इशूला जरा सांगत होतो गावातल्या गोष्टी...." तो म्हणाला. 


" मग मला पण सांग ना.. मला पण आवडेल ऐकायला. " तिने त्याच्या गळ्याभोवती आपले हात गुंफले. 


" पूजा प्लिज. इथे असं काही करू नको. हे गाव आहे. इथे असं जास्त जवळ आलेलं चालत नाही...." तो तिचे हात सोडवत म्हणाला. 


" पुजू बरोबर आहे त्याचं. अगं कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल..." इशू म्हणाली. 


" सिद यार....!!! जाऊदे चल मी जाते झोपायला....तू येतोयस की थांबतोयस इथेच....." तिने जरा रागानेच विचारलं. 


" हो आलो... चल. इशू चल तू पण उगीच जागत राहू नको.." सिद म्हणाला तशी इशू उठली. पण डोक्यात बंगल्याचेच विचार घोळत होते. 

..........................................

दुसऱ्या दिवशी सकाळी एकेक करून सगळे उठले. गावात असल्यामुळे जरा लवकरच उठावं लागलं होतं. त्यामुळे प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. आळोखे पिळोखे देत सगळ्याची सकाळ झाली. कोण दात घासत होतं तर कोणी अजूनही पेंगुळेलं होतं.. ऋषी आणि आरुष तर डोळे मिटुनच चालत होते. संग्राम आणि शिवाची तर त्यांना असं बघून हसून पुरेवाट होतं होती. सगळ्यांच्या अंघोळी झाल्या आणि सगळे नाश्त्याला आले. पण त्यात ईश्वरी नव्हती. सिदने शिवाला तिला बोलवायला पाठवलं. पण ती कुठेच दिसेना. शिवा सगळ्या खोल्यांमधून बघून आला पण इशुचा कुठेच पत्ता नव्हता. 


" सिद बाबा... तुमची ती पावनी कुटं बी दिसना... समदी कड शोधलंया... " शिवा घाबरत घाबरत म्हणाला. 


आता मात्र सगळ्यांचीच झोप उडाली. ऋषी , सिद ,पूजा सगळेच तिला शोधू लागले. सिदला आठवलं काल रात्रीही ती त्या बंगल्याविषयी विचारत होती. नक्कीच इशू तिकडे गेली असेल. त्याने मग बाकी सगळ्यांना इकडे शोधायला सांगून तो शिवाला घेऊन भूत बंगल्याच्या दिशेने गेला. वाटेतही ती कुठे दिसते का ते सिद बघत होता. पण ईश्वरी दिसली नाही. दोघेही भूत बंगल्याजवळ आले. इतक्या वर्षात पहिल्यांदाच सिद्धार्थ तो बंगला इतक्या जवळून पाहत होता. तिथपर्यंत जायला असणाऱ्या वेड्या वाकड्या पायऱ्या .... मोडलेलं गेट.... ते ढकलून दोघेही आत गेले. समोर गेल्यावर बंगल्याची भयानकता जास्तच जाणवत होती. संपूर्ण बंगला कोळीष्टक आणि धुळीमुळे काळवंडलेला.... तुटलेल्या खिडक्या.... बाजूने प्रचंड झाडी.... एक झाड पडल्यामुळे बंगल्याचा जवळपास अर्धा भाग कोसळला होता.. उंच इमारती मुळे त्याची वास्तविकता अधिकच जाणवत होती. मधूनच होणारी पानांची सळसळ... सगळीकडे पसरलेला पालापाचोळा... मोठं प्रवेशद्वार....  नुसतं त्याकडे पाहिलं तरी गरगरल्या सारखं व्हायचं. हे सगळं बघून सिदने  घशाशी आलेला भीतीचा आवंढा कसातरी गिळला. शिवाचा हात धरून ते दोघे पुढे गेले. तर बंगल्याच्या पायऱ्यांवरच त्यांना ईश्वरी बेशुद्ध पडलेली दिसली..


क्रमशः...... 

🎭 Series Post

View all