®️सायली जोशी
टीम -कोल्हापूर
कथामालिका विषय - कौटुंबिक कथा
शीर्षक - आधार भाग -4
खरं तर आता सदाशिवना गोदाची आठवण येत होती. तिचं आसपास नसणं त्यांना खटकत होतं. इतक्या दिवसात त्यांना तिची सवय झाली होती. 'आपण पुन्हा लग्न केलं ते केवळ आईच्या इच्छेखातर आणि कृष्णाला आईची माया हवी म्हणून. गोदावरी त्याची आई झाली खरी, पण मी मात्र तिला पत्नीची जागा अजून देऊ शकलो नाही.
आपल्या जीवनात काही आठवणी अशा असतात की त्यांना पुन्हा पुन्हा आठवण्यात जास्त आनंद होतो! जशा माझ्या आणि आशाच्या आठवणी. मी तिला विसरू शकत नाही, तसेच गोदावरीही सागरला विसरू शकत नसेल. या आठवणी विसरण्यापेक्षा त्या जपून पुढे जाण्यात जीवनाचा अर्थ असेल काय? मला जसा आधार हवा तसा गोदावरीलाही हवाच. मग मी फक्त माझा विचार का केला?
चूक झाली माझी. मी आईचे ऐकून असे रागारागाने गोदावरीला घराबाहेर जायला सांगायला नको होते. तिचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं होतं.' आज पहिल्यांदाच सदाशिवना गोदाची तीव्रतेने आठवण झाली.
"कामावरून येताना मी आज गोदावरीला घरी घेऊन येईन. पण मला घरात पुन्हा वाद नकोत. आई, आशा सोबत जशी छान वागत होतीस तशीच गोदावरी सोबत वाग. बाकी काही नको मला. नको..त्यापेक्षा मी संध्याकाळी येईन लवकर. आपण तिघेही जाऊ, गोदावरीला आणायला." सदाशिव आपल्या आईला सांगत होते. तशी आईने फक्त मान डोलावली.
आत्याबाईंनी आता गोदाच्या मागे भुणभुण लावली होती, "सासरी जा म्हणून. नवरा रागारागाने बोलला म्हणून इतकं मनावर नाही घ्यायचं. जा बोलला म्हणून घराबाहेर नाही पडायचं. तुम्हाला एकमेकांना समजून घ्यायला वेळ तरी द्या."
पण आक्का मात्र आपल्या वागण्यावर ठाम होत्या. नवऱ्याने रागाच्या भरात बायकोला घराबाहेर काढणे चुकीचे आहे, हे आत्याबाईंना पटवून देत होत्या.
आज सदाशिवचे कामात लक्ष लागेना. कधी संध्याकाळ होते आणि गोदावरीला आणायला जातो, असे झाले होते त्यांना. संध्याकाळी जरा लवकरच सदाशिव कचेरीतून बाहेर पडले. घरी जाऊन आई आणि कृष्णाला सोबत घेऊन ते श्रीपादरावांच्या घरी आले.
गोदावरीला पाहताच कृष्णा तिला बिलगला आणि "मला सोडून कुठे गेली होतीस?" म्हणून रडू लागला.
गोदावरीच्या सासूबाईंना पाहून आक्कांनी नाक मुरडले. पण आत्याबाईंनी मात्र त्यांचे मनापासून स्वागत केले. आक्कांच्या वतीने माफीही मागितली त्यांची.
सदाशिवनी श्रीपादरावांची माफी मागितली आणि गोदावरीला पुन्हा घेऊन जायची परवानगीही मागितली. तसे श्रीपादराव म्हणाले, घर म्हंटल की भांड्याला भांडं लागणारच. पण कोणा एकाच्या सांगण्यावरून दुसऱ्याला दोष देऊ नये. दोन्ही बाजू आधी ऐकून घ्याव्यात. मगच निवाडा करावा. नाहीतर गैरसमज होतो. गोदावरी आम्हाला मुलीसारखी आहे. विश्वासाने आम्ही तुमच्यासोबत तिचे दुसरे लग्न लावून दिले. एकमेकांना आधार द्या, समजून घ्या आणि सुखी संसार करा. काही अडलं नडलं आम्ही आहोतच. सगळ्याच गोष्टी मनावर घेऊन मोठ्या करू नयेत. काही सोडूनही द्याव्यात.
खरंतर आमच्या कुटुंबाचं थोड चुकलचं. पण त्यांचा स्वभाव पहिल्यापासूनच तसा. आम्ही सारं शांततेत घेत आलो म्हणून निभावलं. असो, तुम्ही आमच्या मुलासारखेच. अडलं नडलं हक्काने इथे येत जा."
श्रीपादरावांनी गोदावरीला हाक मारून जायची तयारी करायला सांगितली. तशी गोदावरीने तयारी सुरू केली. आत्याबाईंनी बरेचसे पदार्थ तिला बांधून दिले. आत्याबाई गोदाच्या सासुबाईंना म्हणाल्या, "आमची पोर चुकली असेल तर सांभाळून घ्या. लहान आहे अजून ती. स्वभावाने शांत आहे. खरं तरं सदाशिवराव आणि गोदा दोघेही समदुःखी. आपणच त्यांची संसाराची घडी पुन्हा बसविण्यास, दोघांनी एकत्र येण्यास मदत करायला हवी. त्यांच्या मनात एक अवघडलेपण आहे. ते दूर झालं की सारं ठीक होईल. आपण
मनात राग ठेऊ नये. "
गोदाच्या सासुबाईंना आत्याबाईंचं म्हणणं पटलेलं दिसलं.
काही वेळातच सदाशिव साऱ्यांचा निरोप घेऊन गोदा, कृष्णा आणि आईसह तेथून बाहेर पडले.
सदाशिवना गोदावरी सोबत खूप बोलायचं होतं. मन मोकळं करायचं होतं. तिच्याशी लग्नगाठ बांधली गेली असली तरी नातं समजून उमजून पुढे न्यायचं होतं. गोदाच्या सासुबाईही आता तिच्याशी छान वागत होत्या. तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत होत्या.
आक्का आणि आत्याबाईंनी आता गोदाच्या संसारात लक्ष घालणे कमी केले होते.
सदाशिव आणि गोदावरीचे नाते हळूहळू खुलत होते. एकमेकांना एकमेकांचा सहवास जसा मिळत गेला तशी नात्यात सहजता येत होती. कृष्णा हा त्यांच्या नात्यातला दुवा होता. गोदाला लवकरच कृष्णाचा लळा लागला..मग सदाशिव तर त्याचे वडील होते.
एक दिवस गोदाच्या सासुबाईंनी आपल्या माहेरी असलेल्या एका कार्यक्रमासाठी गोदा आणि सदाशिवना पाठवले. प्रवास लांबचा असल्याने कृष्णा आजीसोबत घरीच राहिला.
गोदा आणि सदाशिव दोघे लग्नानंतर पहिल्यांदाच सोबत बाहेर पडले होते. थोडे अवघडलेपण असल्याने बराचवेळ दोघे शांतच होते.
"गोदावरी मी तुला घराबाहेर जायला सांगितलं त्याबद्दल माफ करशील मला?" सदाशिव न राहवून म्हणाले.
"झालं गेलं विसरूनही गेले मी. नको आता त्या आठवणी. " पुढे विषय बदलत गोदा म्हणाली, "आपला कृष्णा किती दंगेखोर झाला आहे हल्ली. दिवसभर मस्ती करत राहतो , खोड्या काढतो. दमावतो नुसता! आता त्याच्यासाठी छोट्या शाळेत प्रवेश घ्यायला हवा."
'आपला कृष्णा ' हे ऐकून सदाशिवना खूप बरं वाटलं. गोदाने कृष्णाला कमी वेळात आपलसं केलं म्हणून त्यांना आनंद झाला. मग बराच वेळ दोघे गप्पा मारत राहिले.
नकळत सदाशिवनी आपल्या पहिल्या पत्नीच्या काही आठवणी गोदाला सांगितल्या आणि
गोदानेही आपलं मन मोकळं केलं. दोघांच्या मनावरचे दडपण थोडे कमी झाले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा