Login

आधार... भाग - २

कडकपणाच्या आड लपलेलं तिचं प्रेम घराला सावरत राहिलं आणि शेवटी त्याच त्यागातून तिला स्वतःचं हरवलेलं स्वप्नं परत मिळालं.
आधार... भाग - २


गाव सकाळी नेहमीसारखंच जागं झालं होतं, पण अदितीच्या मनात मात्र वेगळाच गोंधळ होता. पहाटेची चूल पेटवताना तिच्या डोळ्यांसमोर आकड्यांची रांग उभी होती, घरखर्च, कॉलेज फी, सावित्रीची शाळा, वडिलांची औषधं.

ती सगळं मोजत होती. पैशांत नाही… तर जबाबदाऱ्यांत.
आज कॉलेजमध्ये फी भरण्याची शेवटची तारीख होती. अदितीच्या हातात असलेले पैसे अपुरे होते. तरीही तिने कुणालाही सांगितलं नाही. आईने विचारलं, “आज फी भरायची आहे ना? उशीर होईल का?”

अदिती शांतपणे म्हणाली, “होईल जमेल.” “जमेल” हा शब्द तिच्या आयुष्यात फार मोठा होता. कारण तिला कधीच “नाही” म्हणण्याची सवय नव्हती. कॉलेजमध्ये गेल्यावर तिने ऑफिसमध्ये जाऊन विनंती केली.
“मॅडम, थोडे दिवस वेळ द्या.” मॅडमने तिला वरखाली पाहिलं.

“तू हुशार आहेस, अदिती. पण नियम नियम असतात.”
अदिती बाहेर आली. डोळ्यांत पाणी नव्हतं, पण छातीत जडपणा होता. त्या क्षणी तिच्या डोक्यात एकच विचार आला, सावित्रीचं भविष्य थांबू नये.

ती थेट गावातल्या कापडाच्या दुकानात गेली. “मला संध्याकाळची नोकरी हवी आहे,” तिने ठामपणे सांगितलं.
दुकानदार आश्चर्याने म्हणाला, “तू कॉलेज करतेस ना? इतकं काम कसं जमेल?” “जमवेन,” अदितीचं उत्तर नेहमीसारखंच.

त्या दिवसापासून तिचं आयुष्य अजून कडक झालं.
सकाळ, घर, ट्युशन, कॉलेज. संध्याकाळ, दुकान.
रात्र, घरकाम, अभ्यास, पुढील दिवसाचं नियोजन.
सावित्री तिला क्वचितच हसताना पाहायची.

एक दिवस सावित्रीने हळूच विचारलं, “ताई, तू कधी थकतेस का?” अदिती क्षणभर थांबली. मग म्हणाली,
“थकलं तर चालत नाही, सावी.” त्या वाक्याने सावित्रीला काहीतरी चुकल्यासारखं वाटलं. तिच्या ताईचं आयुष्य इतकं कठीण का आहे, हे तिला उमजत नव्हतं.

दरम्यान, वडिलांची तब्येत खालावत चालली होती. डॉक्टरांनी जास्त काम करू नका असं सांगितलं होतं. पण रमेश ऐकत नव्हते. “घर चालवायचंय,” ते म्हणायचे.
अदितीला राग यायचा. “तुम्ही आज शेतावर जाणार नाही,” ती ठामपणे सांगायची. “तू मला शिकवतेस?”

वडील कधी कधी दुखावून म्हणायचे. तेव्हा अदितीचा आवाज थरथरायचा, “मला परवडत नाही तुम्ही आजारी पडणं.” त्या रात्री आईने अदितीला जवळ घेतलं. “तू इतकी कडक का झालीस गं?” अदिती पहिल्यांदाच बोलली. “कारण मला कमजोर होण्याची भीती वाटते, आई. मी कमजोर झाले, तर सगळे पडतील.”

आई गप्प झाली. तिला कळून चुकलं, ही मुलगी स्वतःला विसरून सगळ्यांना सावरतेय. काही दिवसांनी सावित्रीच्या शाळेतून पत्र आलं. शहरातल्या नामांकित शाळेत शिष्यवृत्तीची प्राथमिक निवड.

सावित्री आनंदाने उड्या मारत होती. आई-वडील गोंधळलेले. अदिती मात्र शांत. ती जाणून होती, ही संधी मोठी आहे… आणि महागही.

त्या रात्री सगळे झोपल्यावर अदितीने तिची जुनी वही उघडली. स्वप्नांची वही. ती पानं उलटत राहिली आणि शेवटी वही बंद केली. दुसऱ्या दिवशी तिने कॉलेजमध्ये अर्ज मागे घेतला. कोणालाही न सांगता.

दुकानाचं काम वाढवलं. ट्युशनचे तास वाढवले. तिच्या आयुष्यात आता “मी” नावाचा शब्द उरला नव्हता. आईला जेव्हा हे कळलं, तेव्हा तिने अदितीला घट्ट मिठी मारली. “तू का सांगितलं नाहीस?” अदिती हळूच म्हणाली, “कारण हे माझं कर्तव्य आहे.” त्या क्षणी आईला जाणवलं, ही मुलगी कडक नाही… ती स्वतःला विसरून उभी असलेली भिंत आहे.


क्रमशः
0

🎭 Series Post

View all