Login

आधार... भाग - ३

कडकपणाच्या आड लपलेलं तिचं प्रेम घराला सावरत राहिलं आणि शेवटी त्याच त्यागातून तिला स्वतःचं हरवलेलं स्वप्नं परत मिळालं.
आधार... भाग - ३


सावित्री शहरात गेली… आणि गावात अदिती आणखी शांत झाली. शहर म्हणजे सावित्रीसाठी नवं जग होतं, मोठ्या इमारती, स्वच्छ रस्ते, इंग्रजी बोलणारी मुलं, वेगळ्या पद्धतीचं आयुष्य.

पहिल्या काही दिवसांत ती घाबरलेली होती, पण हळूहळू तिला सवय लागली. तिच्या फोनवर अदितीचे रोजचे मेसेज यायचे. “वेळेवर उठ.” “अभ्यास नीट कर.”
“खर्च मोजून कर.” सावित्री कधी कधी वैतागायची.
“ताई अजूनही मला लहान समजते,” ती मैत्रिणींना म्हणायची.

ती हळूहळू बदलू लागली. कपडे, बोलणं, स्वप्नं, सगळंच वेगळं. घरी येणारे फोन कमी झाले. अदिती मात्र रोजच फोन करायची. “आज काय शिकलीस ?” “खाणं वेळेवर झालं ना ?” समोरून उत्तरं लहान होत गेली.

गावात अदितीचं आयुष्य मात्र जसंच्या तसं होतं, काम, जबाबदारी, थकवा. तिने कधी सावित्रीला स्वतःच्या कष्टांची जाणीव करून दिली नाही.

एक दिवस दुकानात काम करताना अदिती अचानक चक्कर येऊन पडली. डॉक्टरांनी सांगितलं, “अशक्तपणा आहे. विश्रांती हवी.” ती हसून म्हणाली, “सध्या वेळ नाही.” आई घाबरली. “तू स्वतःकडे लक्ष दे.” अदितीने उत्तर दिलं नाही.

दरम्यान सावित्रीने शहरात पहिलं पारितोषिक मिळवलं, वक्तृत्व स्पर्धेत. शाळेत तिचं नाव गाजलं. पेपरमध्ये फोटो आला. आई आनंदाने रडली. वडील अभिमानाने म्हणाले,
“आपली मुलगी मोठी होणार.”

अदितीने तो पेपर हातात घेतला. तिच्या ओठांवर हलकंसं हसू आलं. त्या रात्री तिने शांतपणे दिवा बंद केला. पण सावित्री घरी आली तेव्हा काहीतरी बदललेलं होतं.
“ताई, तू इतकी कडक का असतेस?” तिने थेट विचारलं.

अदिती क्षणभर थांबली. “कारण मला तू हरवलेली नकोस.” “पण मला माझं आयुष्य जगायचं आहे,”
सावित्री थोडी उंच आवाजात म्हणाली. “जग,” अदिती म्हणाली, “पण विसरू नकोस, त्याची किंमत असते.”
त्या रात्री दोघींमध्ये अंतर निर्माण झालं.

सावित्रीला वाटलं, ताईला माझं यश आवडत नाही.
अदितीला वाटलं, माझी सावित्री हातातून निसटतेय.
सावित्री परत शहरात गेली. फोन अजून कमी झाले.
अदितीला एक दिवस पत्र आलं, कॉलेजमधून.

तिच्या नावावर अजूनही शिष्यवृत्तीची संधी होती, पण तिने ती कधीच वापरली नव्हती. तिने पत्र दुमडून ठेवून दिलं. त्या रात्री तिला पहिल्यांदाच एक प्रश्न पडला, मी कुणासाठी जगतेय आणि स्वतःसाठी कधी?
गाव शांत होतं. पण अदितीच्या मनात वादळ होतं.


क्रमशः
0

🎭 Series Post

View all