Login

आधार... भाग - ४ (अंतिम भाग)

कडकपणाच्या आड लपलेलं तिचं प्रेम घराला सावरत राहिलं आणि शेवटी त्याच त्यागातून तिला स्वतःचं हरवलेलं स्वप्नं परत मिळालं.
आधार... भाग - ४ (अंतिम भाग)


शहरात सावित्रीच्या आयुष्यात तो दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाण्यासारखा होता. मोठ्या महाविद्यालयात प्रवेश, पूर्ण शिष्यवृत्ती, शिक्षकांचं कौतुक, सगळं काही जसं स्वप्नासारखं. मित्रमैत्रिणी आनंदात होत्या, फोनवर अभिनंदनाचे मेसेज येत होते.

पण त्या सगळ्या आनंदात एक गोष्ट तिला सतत अस्वस्थ करत होती, ताईचा शांतपणा. तीन दिवस झाले होते, फोन लागत नव्हता. नेहमी सकाळी “वेळेवर उठ” असं सांगणारी ताई आज गप्प होती. सावित्रीने चौथ्यांदा आईला फोन केला. “आई, खरं सांग… ताई ठीक आहे ना?” आईचा आवाज भारावला. “ती म्हणते ठीक आहे… पण तिच्या चेहऱ्यावर तसं दिसत नाही.”

त्या रात्री सावित्रीला झोपच लागली नाही. तिला आठवलं,
ताईने कधी स्वतःसाठी काही मागितलं नाही. नवे कपडे नाहीत, मैत्रिणी नाहीत, स्वप्नांबद्दल बोलणं नाही. फक्त नियम, शिस्त, कडक शब्द.

पहाटेच तिने निर्णय घेतला. ती घरी जाणार होती.
गावी पोहोचल्यावर घराचं दृश्य पाहून तिच्या छातीत कालवाकालव झाली. दार उघडं होतं. आत अदिती चुलीपाशी बसलेली, हात थरथरत होते. चेहरा कृश, डोळ्यांत थकवा. “ताई…”

तो शब्दच तुटका निघाला. अदिती वळली. क्षणभर आश्चर्य, मग नेहमीचा कडकपणा. “तू इथे का आलीस? कॉलेज आहे ना?” “कॉलेज थांबेल,” सावित्री म्हणाली,
“पण तू थांबलीस तर सगळं संपेल.” त्या वाक्याने अदिती गप्प झाली.

आईने सावित्रीला आत बोलावलं. कपाटातून एक जुनी पिशवी काढली. त्यात अदितीचे कॉलेजचे अर्ज, फीच्या पावत्या, शिष्यवृत्तीची पत्रं आणि ती वही, स्वप्नांची वही.
“ही सगळी तुझ्यासाठी होती,” आई म्हणाली, “आणि आम्हाला उशिरा कळलं.”

सावित्रीची नजर वहीतल्या पानांवर फिरली. “माझं शिक्षण… माझं भविष्य…” प्रत्येक ओळीखाली अदितीचं मौन ओरडत होतं. ती अदितीकडे धावली. “ताई, तू माझ्यामुळे तुझं आयुष्य थांबवलंस!”

अदिती पहिल्यांदाच खचली. “मी थांबवलं नाही, सावी. मी निवडलं.” “पण मला तुझ्या त्यागावर उभं राहायचं नाही,” सावित्री रडत म्हणाली. “मग उंच उड,” अदिती हळू आवाजात म्हणाली, “कारण माझं स्वप्न तू आहेस.”
त्या क्षणी सावित्रीला उमगलं, ताईचा कडकपणा हा राग नव्हता, तो भिती होता, घर तुटू नये म्हणूनची.

डॉक्टरांनी सांगितलं, अदितीचं शरीर थकलंय, पण मन त्याहून जास्त. विश्रांती हवी होती. आधार हवा होता.
सावित्रीने ठाम निर्णय घेतला. “आता मी तुझ्यासाठी जबाबदार आहे.”

तिने कॉलेजमध्ये चौकशी केली, अदितीच्या जुन्या गुणपत्रकांवरून पुन्हा अर्ज केला. काही आठवड्यांनी पत्र आलं, अदितीला पुन्हा शिष्यवृत्ती मंजूर. अदितीला ते कळल्यावर ती खूप वेळ काहीच बोलली नाही. मग म्हणाली, “मला भीती वाटते… स्वतःसाठी जगायला.”

सावित्रीने तिचा हात धरला. “आता शिक. कडकपणा नाही… स्वतःसाठी प्रेम ठेव.” काही महिन्यांनी गावात वेगळीच चर्चा होती. “ती कडक मुलगी परत शिकतेय!”
अदिती मात्र बदलली होती. अजूनही शिस्तप्रिय, पण आता स्वतःलाही जागा देणारी.

त्या रात्री तिने स्वप्नांची वही उघडली. शेवटच्या रिकाम्या पानावर लिहिलं, “मी कठोर होते, कारण मला कोसळण्याची मुभा नव्हती आज मी थोडी मवाळ आहे, कारण मला उभं राहायला कुणीतरी मिळालं.”

दिवा बंद करताना तिने पहिल्यांदाच मनापासून हसून पाहिलं. कडकपणा संपला नव्हता… तो फक्त प्रेमात बदलला होता.


समाप्त
0

🎭 Series Post

View all