Login

आधार..

राकेश कधीच गीताच्या बाजूने बोलत नाही. पण गीताला नंतर कळतं तो कसा आहे.
सकाळची कोवळी किरणे खिडकीतून डोकावत होती.
गीता शांतपणे नाष्टा तयार करत होती. मनात मात्र अस्वस्थता होती. रोजचे वाद, कटू बोलण्याला ती त्रासलेली होती.


गीता नेहमीच सासू सिंधुताईंचा आदर करत होती . पण त्या मात्र संधी मिळेल तितक्या तिला टोमणे मारत बोलत असायच्या.

त्या दिवशी गीताने राकेशला आवडतं म्हणून तिने थोडा रव्याचा शीरा केला होता. पण शीरा टेबलावर येताच घरात वादळ उठलं.

“हे काय फाजील खर्च? सकाळी सकाळी तुपातला शीरा?” सासरे म्हणाले.
“सुनबाई,तूप तुझ्या माहेरून आलाय का?” सिंधुताई टोमणा मारून म्हणाल्या.

“सासूबाई, राकेशला खूप आवडतो म्हणून…” गीता हळूच म्हणाली आणि राकेशकडे पाहू लागली.
कदाचित तो काही बोलेल… तिची बाजू घेईल…

पण सिंधुताई पुन्हा बोलल्या — “माझ्या मुलाचं कारण देऊ नकोस… तुलाच खायची हौस असते!”

राकेश मात्र गप्पच. शीरा न खाताच ऑफीसला निघून गेला.
गीतेच्या डोळ्यांत पाणी दाटलं.


संध्याकाळी गीता जेव्हा त्यांच्याशी बोलायाचा प्रयत्न करू लागली तेव्हा राकेश फक्त एवढंच म्हणाला —

“या घरात आईच्या पसंतीचं जेवण बनवलं जातं. पुढे माझ्या नावाखाली काही बनवू नकोस.”

ते उदासीन बोलणे गीतेला आतपर्यंत पोखरून गेलं.


काही दिवसांनी गीता म्हणाली—"सासूबाई, मीं चार दिवस माहेरी जाऊन येते. बाबांची खूप आठवण येते. आई पण परवा म्हणत होती, खूप दिवस झाले तू भेटायला नाही आली.”

सिंधुताई म्हणाल्या —
“तू तिथे गेलीस की आठवडाभर येत नाहीस. घराची कामं कोण करणार? मला चक्कर येत असतात … फक्त एक दिवसासाठी जा.”

मन मारून गीता एक दिवसासाठी माहेरी गेली… पण तिथे पोचताच तिला आणखी मोठा धक्का बसला.
घरात ना आई… ना वडील… ना पूर्वीसारखे हसून स्वागत करणारी वहिनी.

वहिनी हळूच म्हणाली —
“ते दोघं तीर्थयात्रेला गेले. आणि तू किती दिवस राहणार? कारण मला पण माहेरी जायचं आहे.”

वहिनीच्या वागण्यातला हा बदल पाहून गीता हादरली.
अचानक तिला समजलं — मागचा वेळेला तिने प्रॉपर्टीच्या पेपरवर सही केली होती … तो गोडवा फक्त त्या सहीसाठी होता!

ती म्हणाली —"दोन दिवसापूर्वी आईशी बोलले तेव्हा मला तिने तीर्थयात्रेच नाही सांगितलं काही.

वहिनी म्हणाली —"अचानक ठरलं आणि ते आजच निघाले सकाळी.म्हणून सांगितलं नसेल.

तिला तिकडे अजिबात आवडत नव्हतं.

ती म्हणाली —" वहिनी, मला घरून फोन आलाय. सासूबाईंना बरं नाही. मला जायला लागेल.मीं येईन परत, आता निघते."


मन भरून आलेल्या गीतेने मंदिरात जाऊन देवाच्या चरणी निःशब्द नमन केलं आणि थोडं बसली.आईला फोन लावून बघितलं तर फोन बंद येत होता.

अचानक नजरेसमोर — तिचे आई-बाबा एका झाडाखाली बसलेले दिसले.

ती पळत त्यांच्या जवळ गेली.
आई रडू लागली. बाबांनी सांगितलं —

“तुझ्या वहिनीने तुला खोटं सांगितलं. तुझ्या भावाने आम्हाला घराबाहेर काढलं.तुझा भाऊ आणि वहिनी म्हणाले —"गीताला इतके पैसे दिले,आम्हाला काहीच राहू दिलं नाही.आता हे घर आमचा आहे."

हे सगळं ऐकून गीताने लगेच भावाला फोन केला, तिचा भाऊ म्हणाला —" आमचे खर्च पूर्ण होतं नाही, त्यात ह्यांचे औषधं, दवाखान्यातला खर्च. मला नाही परवडणार. तुला वाटत असेल तर त्यांना तुझ्या घरी घेऊन जा. मला परत फोन करून नकोस."

गीतेचं हृदय तुटलं. पण ती त्यांना सासरी आणू शकत नव्हती — जिथे तिचीच किंमत नाही, तिथे आई-वडिलांना काय मान मिळाला असता.
गीता त्यांना जवळच्या वृद्धाश्रमात घेऊन गेली. आणि कार्यकर्तेना सगळं सांगून सासरी यायला निघाली.
तिथून निघताना तिचे पाय जड झाले.
ती घरी पोचली.


त्या रात्री तिने सगळं रडत रडत राकेशला सांगितलं.
“आपण आई-बाबांना इथे आणू का?”

राकेश शांत… काहीच उत्तर नाही.
गीतेला फारच राग आला.ती मनात पुटपुटली—

“आजपासून मी पण तुझ्या आई-वडिलांची सेवा करणार नाही!”



तिची चिंता वाढत गेली.


३-४ दिवसांनी ती परत वृद्धाश्रमात गेली. तिला अजिबात चैन पडत नव्हतं.
तिकडे गेल्यावर तिला कळलं की आई - बाबा तिकडून दुसरीकडे गेले. ती वृद्धाश्रमाच्या कार्यकर्तेकडे गेली. तिकडे तिने आई-बाबांची विचारपूस केली.
त्यांनी एक पत्ता तिच्या हातात दिला.

गीता धावत त्या पत्त्यावर गेली.
दरवाजा उघडला — एक मुलगी.

“तुम्ही गीता ताई ? आत या.”

आत गेलेली गीता थक्क झाली — तिचे आई-वडील सुंदर घरात आरामात बसलेले.

ते म्हणाले—
“बाळा आम्ही व्यवस्थित आहोत.तू गेल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी जावईबापू वृद्धाश्रमात आले होते.त्यांनी आम्हाला लग्नात भेट म्हणून दिलेले ५० लाख परत केले. आणि त्यातून हा घर खरेदी करून दिलं. आम्हाला बघायला ही मुलगी ठेवली आहे.”

आम्ही त्यांना खूप समजावलं पण त्यांनी काही ऐकलाच नाही. ते म्हणाले —" माझ्या आई-बाबांनी हे पैसे बिजनेससाठी मागितले होते आणि ते कधी सुरुच नाही झालं. मीं कधीच ठरवलं होतं की मीं ते पैसे तुम्हाला परत करणार."
"तुम्ही पण माझे आई- बाबा आहे. "

गीता थरारली.

“पण हे सर्व… मला का नाही सांगितलं?”

आई म्हणाली—
“राकेश म्हणाला— 'तुम्ही आता तिला काही सांगू नका.गीता समजेल सगळं. तिचं मन नाही दुखलं पाहिजे."



त्या रात्री गीता रडत राकेशजवळ गेली.

“तु हे सगळं माझ्यापासून का लपवलं?”
"मला आई - बाबांनी सगळं सांगितलं."

राकेश हसत म्हणाला —

“कारण ते फक्त तुझे आई-वडील नाहीत… माझेही आहेत.
त्यांचा आत्मसन्मान दुखावू नये म्हणून त्यांना मुलीच्या घरी आणलं नाही.
ते पैसे मी परत करणं माझं कर्तव्य होतं.”

गीतेला आज जाणवलं —
राकेश गप्प असला तरी मनाने किती मोठा आहे!

तेवढ्यात दारातून सासू सिंधुताईंचा आवाज आला—

“सुनबाई, ते पैसे आम्ही कर्ज म्हणून घेतले होते. परत करणं आमचं कर्तव्य होतं. आता रडू नकोस… आणि सकाळी नाष्टा वेळेत बनला पाहिजे हं!”

त्यांच्या त्या अगदीच रोजच्या बोलण्यावर गीता, राकेश आणि सिंधुताई पण हसले.



गीतेला शेवटी उमगलं —
शब्दात प्रेम दिसत नाही, पण कृतीतून ते कळतं.
आणि राकेशचं प्रेम तिला आज नव्यानं जाणवलं.


समाप्त.
0