Login

आहे तोपर्यंत

Live Life With Love To The Fullest.
आहे तोपर्यंत.
भाग एक:


"चला आज काय बनवूया बरं? अमोलला भरले वांगे आणि गरमागरम बाजरीची भाकरी खूप आवडते. यऽऽस तेच करूया." प्रियाने आज एकदम उत्साही मूडमध्ये जेवणाचा बेत ठरवला.


'रात्रीचे बारा वाजले हा अजून आला नाही.' अचानक जाग आलेल्या प्रियाची नजर घड्याळावर गेली. झोपमोड झाल्यामुळे तिला आता काही झोप लागत नव्हती. अमोलला फोन लावला तर तो एंगेज येत होता.


साडेबाराला अमोल घरी आला आणि आपल्याकडे असलेल्या चावीने त्याने दार उघडले. लाइट्स ऑन करून पाहतो तर काय प्रिया समोर उभी होती.


"हे काय तू अजून झोपली नाहीस?"


"झोपेचे सोड मी तुझी वाट पाहत जेवले पण नाही. काय यार अमोल? किती दिवस हे असे चालणार? इथे मी तुझ्यासोबतच्या एक एक प्रेमाच्या क्षणासाठी तरसते आहे. मला तर ना कधी कधी प्रश्नच पडतो की हा तोच अमोल आहे का जो माझ्यासाठी अगदी वेडा होता. माझ्या प्रेमात अगदी अखंड बुडलेला. " थोडे रागवूनच प्रिया म्हणाली.


"थोडी शांत हो यार. तहान लागली आहे मला खूप. पाणी देतेस का?" अमोल प्रियाला कंटाळलेल्या स्वरात म्हणाला.


"जाऊ दे रे. तुला काही बोलायची सोय नाही. नेहमी मी तुझ्या काळजीने बोलते. नुसते काम काम हे काही बरोबर नाही. फॅमिली लाईफ पण काही असते ना?" प्रिया प्रचंड चिडली होती.


"अरे हो मला माहित आहे तू माझ्या काळजीत बोलते आहेस. डोन्ट वरी, मी भाजी पोळी ऑर्डर करून खावून घेतले होते नऊ वाजता. तुला फोन किंवा मेसेज करायला नाही जमले. सकाळपासून क्लायंटचे कॉल सुरू होते. तुला बोललो होतो ना की ह्या महिन्यात मी खूप व्यस्त असणार आहे. त्यात सध्या नवीन प्रॉडक्टचे रिलीज सुरू आहे. आय अल्सो लव्ह यू डियर. फक्त हा फेज थोडा जाऊ देत." दमून आलेला अमोल तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता.


"ठीक आहे झोप आता. खूप उशीर झाला आहे. उद्या परत लवकर उठायचे आहे. राहिलेले निवांत बोलू सकाळी." नाराज आणि वैतागलेल्या स्वरात प्रिया म्हणाली.


अमोल दिसायला स्मार्ट हँडसम होता. अगदी कोणत्याही मुलीने त्याच्याकडे पाहून प्रेमात पडावे असा. त्याच्या स्वप्नांच्या मागे धावणारा, करीयर ओरिएंटेड आणि म्हटले तर तसा वर्कोहोलीकच होता. त्याचे काम हे त्याचे पॅशन होते आणि ते त्याला अगदी प्रिय होते. व्यस्त असला तरी त्याचे डाएट आणि रोज पहाटे एक तास वर्कआऊट तो न चुकता फॉलो करायचा.


त्याउलट प्रिया म्हणजे उत्साही, वेगवेगळ्या कला अवगत असलेली, आयुष्य भरभरून जगणारी. ती सतत अमोलला आणि तिला वेळ मिळावा आणि अमोलने निवांत स्वतःसाठी वेळ काढावा म्हणून प्रयत्न करणारी. दोघेही अगदी विरुद्ध स्वभावाचे पण म्हणतात ना 'अपोजिट अट्रॅक्ट्स' अगदी तसेच एकमेकांच्या प्रेमात वेडे आणि म्हणूनच दोघांनी लव्ह मॅरेज केले होते. सध्या मात्र त्यांचे ग्रहमान एकंदरीत बिघडले होते.


रोजची ठरलेली धावपळ, दिवसरात्र काम असे अमोलचे रूटीन सुरूच होते. प्रियाला मात्र सतत वाटायचे कसा झाला आहे हा? जीवनात काही रस नसल्यासारखा. नुसते काम, ना कुठे फिरणे, ना काही चेंज. काय करावे? कसे ह्याला ह्या फसलेल्या चक्रव्यूहातून बाहेर काढावे? ह्या विचारात ती रोज त्याच्या आवडीचे खायला बनवून, शृंगार करून त्याची वाट पाहायची पण तो मात्र रोज उशीराच घरी येत होता. दिवस असेच जात होते.


एक दिवस सकाळच्या वेळी प्रिया किचनमधे अमोलचा टिफीन भरत असताना अचानक जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला. आवाज ऐकून प्रिया आणि तिच्याकडे काम करणाऱ्या मावशी दोघीही दचकल्या आणि घाबरून गेल्या. कुठून आला आवाज? काय पडले हे बघायला दोघी घरातील सगळ्या रूममध्ये जावून पाहू लागल्या.


“ताईऽऽ” प्रियाच्या कामवाल्या मावशी जोरात किंचाळल्या.


त्यांचा आवाज ऐकून प्रिया जोरात पळत गेली. पाहिले तर काय अमोल जमिनीवर कोसळलेला होता आणि त्याच्या डोक्याच्या एका बाजूने रक्त येत होते. ताबडतोब प्रियाने मावशींच्या साहाय्याने अमोलला गाडीत बसवले आणि थेट हॉस्पिटल गाठले.


‘ट्रेडमिलवर चालताना हा कसा काय पडला? काय झाले असे? देवा, त्याला काही नको व्हायला.’ असे प्रश्न तिला भेडसावू लागले होते. घाबरलेल्या अवस्थेत प्रिया घामाने भिजलेली होती. तिच्या हृदयाचे ठोके जोरजोरात सुरू होते


ती हॉस्पिटलमध्ये कशीबशी पोहोचली. तिथल्या वॉर्डबॉयने स्ट्रेचरवर अमोलला घेतले आणि इमर्जन्सी वॉर्ड मध्ये घेऊन गेले. प्रियाने तिथे बाहेरच थांबून थरथरत्या हाताने फॉर्मवर सगळे डिटेल्स कसेबसे भरले.


'अमोलला सुखरूप बरे कर बाप्पा.’ तिथे इमेर्जन्सी वॉर्ड बाहेर असलेल्या बाप्पाच्या मूर्तीकडे एकटक पाहत हेच मागणे मागितले.

काय झाले असेल अमोलला? तो बरा होईल ना? नक्की तो कसा पडला की कोणी त्याला ढकलले? सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करूया पुढील भागात.

क्रमशः
©® सुप्रिया महादेवकर
__________

🎭 Series Post

View all