भाग दुसरा:
“मिस्टर अमोल ह्यांच्यासोबत कोण आहेत? त्यांना आत बोलवा.” मुख्य डॉक्टरांनी तिथल्या असिस्टंट डॉक्टरकडे निरोप दिला. त्यासरशी प्रिया लगोलग आत आली.
"हे बघा, हे आता स्टेबल आहेत. तरी आपण ह्यांना अंडर ऑबजर्वेशन ठेवणार आहोत. तोपर्यंत त्यांच्या ह्या सगळ्या टेस्ट करून पाहूया. असे नेमके कशामुळे झाले हे आपल्याला पण कळेल." डॉक्टर म्हणाले.
"ठीक आहे डॉक्टर. मी त्याला भेटू शकते का?" प्रियाने डॉक्टरांना विचारले.
डॉक्टरांची परवानगी घेऊन ती अमोलच्या बेडजवळ गेली. त्याला पाहून त्याच्या छातीवर डोके ठेवून रडू लागली.
"कधी म्हणून माझे ऐकत नाहीस. किती घाबरले होते मी. तुला कळते का? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आता इथून घरी गेलो की तुझे काम कमी करायचे. वर्कआऊट पण झेपेल तितकाच करायचा. चल प्रॉमिस कर मला." प्रिया रडतच अमोलला म्हणाली.
"बरं ते सोड. डॉक्टरांनी काही टेस्ट सांगितल्या आहेत त्या आपण करून घेऊया." प्रिया पुढे म्हणाली.
"तुला माहित आहे ना मला इंजेक्शन आणि रक्त पाहून किती भीती वाटते? तू पण माझ्यासोबत सगळ्या टेस्ट करून घे. तसेही तुझे रेग्युलर चेकअप पेंडीग आहे आणि तुलाही काही दिवसांपासून अशक्तपणा जाणवतोय आणि लो फिल होत आहे." टेस्ट करायचे नाव ऐकून घाबरलेल्या अमोलने प्रियाला विनंती केली.
"ठीक आहे, मी पण तुझ्यासोबत सगळ्या टेस्ट करते." असे म्हणत तिने अमोलला धीर देत टेस्ट करायला तयार केले.
दोघांच्या टेस्ट झाल्या. काही रिपोर्ट्स दुसऱ्या दिवशी तर काही पुढील दोन दिवसात आल्या.
अमोलच्या रिपोर्ट मध्ये बी ट्वेल आणि डी थ्री चे प्रमाण नॉर्मल रेंजपेक्षा बऱ्यापैकी कमी झालेले दिसून आल्यामुळे त्याला चक्कर आली असावी आणि हे घडले. असे डॉक्टर निदान करतात.
"यासाठी आपण इंजेक्शन आणि गोळ्यांचा कोर्स करूया. मग गोष्टी आटोक्यात येतील. आता तुम्हाला मी डिस्चार्ज देतो आहे. तरी हे दिलेले डाएट पण तुम्हाला फॉलो करावे लागेल." असे डॉक्टरांनी सांगितले.
पुढे डॉक्टर प्रियाचे रिपोर्ट्स पाहून म्हणाले की, "प्रियाला लंग कॅन्सर आहे. तोही ऍडवान्स लेवलचा."
हे समजताच अमोलच्या पायाखालची जमीन सरकली.
"हे काय म्हणता आहात डॉक्टर तुम्ही? नाही, नाही. असे होऊच शकत नाही. तिला एवढ्यात थकल्यासारखे वाटते आहे पण तशी ती ठीक आहे. आपण पुन्हा एकदा वेरिफाय करूया का? प्लीज डॉक्टर प्लीज?" अमोल कळकळीने डॉक्टरांना म्हणाला.
"हे बघा तुम्ही पॅनिक नका होऊ. तुम्हीच असा धीर नाही धरणार तर मग प्रियाला कसे सावराल?" डॉक्टरांनी अमोलला शांत करण्याचा प्रयत्न केला.
"डॉक्टर काहीतरी उपाय असेल ना? तुम्ही सांगाल ते सगळे करायची तयारी आहे माझी. पण माझी प्रिया बरी झाली पाहिजे." अमोल रडकुंडीला आला होता.
"आपण सर्जरी करू शकतो पण त्यानंतर सुद्धा वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. त्यापेक्षा आहे ते दिवस तुम्ही त्यांना जसे आयुष्य हवे तसे जगू द्या. त्यांच्या काही राहिलेल्या इच्छा असतील त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा." डॉक्टरांनी सांगितले.
"डॉक्टर किती वेळ आपल्या हातात आहे?" अमोलने डॉक्टरांना आशेने विचारले.
"हे बघा, तसं म्हटले तर दोन महिने आणि म्हटले तर एक वर्ष देखील त्या जगतील. आता सगळे त्या विध्यात्याच्या हातात आहे." डॉक्टरांनी स्पष्टपणे अमोलला सगळी परिस्थिती समजावून सांगितली.
प्रिया रूममध्ये अमोलला भेटायला आली. तिला पाहून अमोलला ती त्याच्या आयुष्यात आल्यापासूनचे सगळे क्षण क्षणात डोळ्यासमोर तरळले. त्याला खूप भरून आले होते पण त्याने स्वतःला प्रियासाठी आवर घातला होता.
"काय मग? चला डॉक्टरांनी डिस्चार्ज सांगितला आहे. आता स्वतःची काळजी घ्यायची." प्रिया आनंदाने अमोलला म्हणाली. ते ऐकून अमोलच्या डोळ्यात आता टचकन पाणी आले.
"काय रे काय झाले? मला पण डॉक्टरांनी सगळे सांगितले आहे. डोन्ट वरी, मी बघ एकदम धडधाकट आहे. मला काही होणार नाही. त्या कॅन्सरला पळवून लावणार मी. बघच तू." प्रियाने खंबीरपणे ती परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. त्याचे मात्र अश्रू थांबत नव्हते.
"सॉरी यार. मी लग्नानंतर नुसता कामात व्यस्त झालो. आपले काम, नवनवीन टार्गेटस् आणि अचिवमेंट्स ह्यामध्ये ना तुला वेळ देऊ शकलो ना कुठे फिरायला निवांत असे कुठे गेलो. पण आता प्रॉमिस मी तुला सोडून कुठे जाणार नाही. आपण ना अजून एक दोन डॉक्टरांचे ओपिनियन घेऊया." अमोल रडत रडत प्रियाला म्हणाला.
"मी पाठवले रिपोर्ट्स एक दोन डॉक्टरांना. त्यांचे ही म्हणणे तेच आहे जे इथे आपल्याला डॉक्टरांनी सांगितले." प्रिया म्हणाली.
"नको ना असं बोलूस यार. मी काय म्हणतो की, आपण ना दोघे कुठेतरी जाऊया फिरायला. तुला काय काय आवडते जे राहून गेले ते सगळे करूया. तू मला हवी आहेस प्रिया." अमोल म्हणाला आणि दोघांनी रडत रडतच एकमेकांना घट्ट मिठी मारली.
कसे असते ना हे जीवन? कधी काय समोर येईल काहीच सांगता येत नाही.
पाहूया पुढे काय होते प्रियाच्या आणि अमोलच्या आयुष्यात. प्रिया बरी होईल का? अमोलमध्ये काही बदल होईल का? तो आयुष्य जगायला शिकेल का? पाहूया पुढील भागात.
क्रमशः
©® सुप्रिया महादेवकर
©® सुप्रिया महादेवकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा