आहे तोपर्यंत.
भाग तीन. (अंतिम भाग)
भाग तीन. (अंतिम भाग)
सुट्टी होताच अमोल आणि प्रिया दोघेही हॉस्पिटलमधून घरी आले. प्रियाला जे हवे, जे खायचे, जिथे जायचे ते सगळे आपण करायचे असे ठरवून अमोलने आपले काम बाजूला ठेऊन ऑफिसमध्ये दिड महिन्याची सुट्टी टाकली.
"अमोल, आपण काश्मीरला जाऊया का? आपण दोघेही तिथे फक्त जाऊ जाऊ म्हणत राहिलो पण जाणे नाही झाले. काश्मीर म्हणजे आपल्या भारतातील नंदनवन जणू स्वर्ग." प्रियाने अमोलला विचारले.
प्रियाच्या सांगण्यावर अमोलने डॉक्टरांची परमिशन काढली आणि लागणारी सगळी गरजेची औषधे, सामान त्या दोघांनी पॅक केले. म्हणता म्हणता ते दोघे काश्मिरच्या प्रवासाला निघाले.
त्या दोघांनी दिल्लीपर्यंत मधे मधे थांबत, छान आवडती गाणी ऐकत, एकमेकांची कंपनी एन्जॉय करत रोड ट्रीप केली. तिथून फ्लाईटने ते श्रीनगरला गेले. दाल लेक वरील हाऊसबोट मध्ये एक दिवस मुक्काम केला. तिथून ते निघाले तेव्हा त्यांना प्रियाच्या कॉलेजमधली बेस्ट फ्रेंड रिया आणि तिचा नवरा उमेश भेटले. ते देखील काश्मीर फिरायला आले होते. त्यांना पाहून प्रियाला खूप आनंद होतो.
"अमोल त्यांना आपण जॉईन होऊया का?" प्रियाने अमोलला विचारले आणि आता त्या चौघांचा ग्रुप तयार झाला होता.
दुसऱ्या दिवशी श्रीनगरमधील हिरवाईने नटलेली निसर्गाची सुंदरता, बर्फाने आच्छादले उंचच उंच पर्वत याचा अनुभव घेत ते सगळे गुलमर्गला पोहोचले.
गुलमर्ग हे प्रसिद्ध हिल स्टेशन आणि एक अद्भुत स्कीइंग डेस्टिनेशन. तिथे त्यांव स्कीइंग,माउंटन बाईकिंग करून स्वच्छंदी जीवनाचे काही क्षण अनुभवले.
प्रिया आणि अमोलने आईस स्केटिंग सुद्धा केले.
प्रिया, अमोल, रिया आणि उमेश चौघांनी बर्फातून उंच पर्वतातून चालत ट्रेकिंगचा आनंद घेतला. एकमेकांवर बर्फाचे गोळे फेकत असताना अमोलने प्रियाच्या हसऱ्या चेहऱ्यावरील हसू त्याच्या डोळ्यात आणि कॅमेरात अलगद टिपले. ह्या प्रवासात त्याला प्रियाच्या काळजीने मधे मधे भरून येत होते.
त्याला ह्या प्रवासात कळून चुकले होते की आयुष्यात फक्त पैसा नाही तर आपल्या माणसांना दिलेला वेळ आणि त्यांच्या चेहऱ्यावरील ते हसू हे माणसाला खऱ्या अर्थी श्रीमंत बनविते.
टूर मध्ये देखील मधे मधे काही महत्वाचे कॉल्स आणि ऑनलाईन मीटिंग करणे हे अमोलचे सुरूच असते. मोबाईलची रेंज गेली की प्रियाला खूप हायसे वाटत होते. मोबईलच्या बिना नेटवर्कमुळे माणसातील आपसात असलेले नाते घट्ट होते हे तिला त्याला शिकवायचे असते. त्यालाही थोडी कामातून उसंत काढल्यावर प्रिया सोबत निसर्गाची सैर करताना खऱ्या जीवनाची परिभाषा समजली होती.
तिथल्या निसर्गाचा आस्वाद घेत घेत ते सोनमर्गच्या दिशेने जायला निघाले. सोनमर्ग मध्ये वॉटर रिव्हर राफ्टिंग करताना अमोलला जोरात ठसका लागला आणि त्याच्या नाकातून रक्त आले. रुमालाला लागलेले रक्त पाहून अमोल तिथेच कोसळला.
प्रिया रिया आणि उमेशच्या मदतीने अमोलला घेऊन दवाखान्यात पोहोचले. अमोल शुद्धीत आल्यावर त्याला घेऊन ते पुन्हा घरी येण्यास निघाले.
"लंग कॅन्सर हा प्रियाला नाही तर तुलाच झाला आहे. तुला हे आधीच कळले असते तर ह्या मागच्या काही दिवसात जे जीवन तू जगला आहेस ते तू अनुभवले नसते. ना तू त्याच्या कामाच्या व्यापातून बाहेर पडू शकला असता." तिथल्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर प्रिया आणि डॉक्टरांनी अमोलला सांगितले.
प्रियाने डॉक्टरांच्या मदतीने हे सत्य त्याच्यापासून लपवलेले होते. एवढेच काय तर प्रियाची मैत्रीण रिया तिचा नवरा हे देखील ओंकोलोजीस्ट होते. ते सतत त्यांच्या सोबत असल्याने प्रिया निर्धास्त होती. हा सगळा प्लॅन प्रियाने डॉक्टरांसोबत चर्चा करून ठरवलेला होता.
केवळ आपला नवरा अतिशय भित्रा आहे म्हणून त्याचे जे थोडे आयुष्य उरलेले आहे ते आनंदाने त्याला जगण्यासाठी प्रियाने त्याच्यापासून सारे काही लपवून ठेवले होते.
त्याची किमोथेरेपी करून ते घरी आले.
शेवटचे हे दिवस प्रिया अमोल सोबत घालवत होती. त्याचा वाढत जाणारा त्रास, ते दुखणे बघणे तिला सहन होत नव्हते. ती रोज आतल्या आत रडत होती.
"आता कुठे हा आयुष्य जगायला शिकला, त्याला त्याची चूक समजली आणि देवा काय हे आमच्या पुढे वाढून ठेवलेस?" असे सारखे ती देवाला विचारत होती.
शेवटी शेवटी त्याच्या वेदना असह्य होत गेल्या तेव्हा त्याला प्रियाने हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले. शेवटी अमोलने जगाचा अखेरचा निरोप घेतला.
त्याला शेवटचे पाहत तिने त्याचा हात हातात घेतला.
"तू कायम माझ्या सोबत राहणार आहेस. मी एक बाळ दत्तक घेते आहे ज्याचे नाव मी अमोल ठेवणार आणि त्या अमोलला मी आता मोठे करणार. तेच माझ्या जीवनाचे ध्येय असेल.
एक बायको म्हणून मी तुला खरे आयुष्य कसे जगावे? कामापुढे स्वतःला आपल्या माणसांना कसे जपावे? हे शिकवण्यास कमी पडले किंवा त्या गोष्टीला उशीर झाला पण ह्या अमोलला मी आई म्हणून आयुष्य जगायला, माणसे जपायला शिकवणार. अमोल माझ्यातल्या तुला मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत जपणार. माझ्यासाठी प्रेम म्हणजे फक्त तूच होतास आणि कायम राहणार. " असे म्हणून तिने त्याच्या छातीवर डोके ठेऊन जोरात टाहो फोडला.
समाप्त.
©® सुप्रिया महादेवकर
©® सुप्रिया महादेवकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा