Login

आहेर..

लग्नात होणाऱ्या गोष्टींवर ही कथा आहे.
अनुराधा बाई आज फार आनंदात होत्या. कारण त्यांच्या नातीचं म्हणजेच नताशाच्या मुलीच श्रेयाचं अगदी महिन्याभरातच लग्न ठरलं होतं. घरभर लगबग, नातेवाईकांमध्ये चर्चा, आणि अनुराधा बाईंंचं हसणं थांबेना.
पण त्या आनंदासोबतच त्यांच्या मनात थोडीशी काळजीही होती — “आहेर काय काय द्यायचं?” हाच प्रश्न त्यांना आतून कुरतडत होता.

अनुराधा बाईंंचे पती पाच वर्षांपूर्वीच गेले होते. त्यांनां दोन मुलं-मुली — मोठी नताशा आणि धाकटा रमन. रमन नताशापेक्षा बऱ्याच वर्षांनी लहान होता. इतका लहान की नताशाची मुलगी श्रेया ही रमनपेक्षा फक्त सात वर्षांनीच लहान होती.त्यामुळे श्रेया रमनला ‘मामा’पेक्षा मित्रच मानायची .

अनुराधा बाईंंच्या नवऱ्याचा स्वतःचा व्यवसाय होता, पण मोठा तोटा झाल्याने कर्जाचा डोंगर चढला आणि त्या धक्क्यानं ते अकाली गेले. उरलेलं थोडंफार संपत्ती विकून अनुराधा बाईंनी आणि रमनने ते सगळं कर्ज फेडलं. अखेर घरात फक्त एकच गोष्ट उरली — हा त्यांचा छोटासा घरकुल.



रमनचं लग्न दोन वर्षांपूर्वी नेहाशी झालं होतं. दोघंही नोकरी करत, काटकसरीनं संसार चालवत. लग्नात झालेलं थोडं कर्ज फेडायचं होतं आणि त्यातच अनुराधा बाईंच्या औषधोपचारांचा खर्चही होता. त्यामुळे दोघंही सध्या मूल होऊ द्यायचं नाही, असं ठरवून सेव्हिंग्ज वाढवत होते.

त्या रविवारी नताशा यायचं ठरलं होतं. कारण लग्न जवळ आलं होतं आणि आहेराची लिस्ट तयार होती. सगळे घरात होते, आणि नताशा आली तेव्हा तिच्या हातात मोठी वही होती.

“आई, ही माझ्या सासरकडच्या अपेक्षांनुसार लिस्ट आहे,” ती म्हणाली.
लिस्ट ऐकताच अनुराधा बाई थिजल्या. रमन आणि नेहा दोघांनी एकमेकांकडे पाहिलं.

“ताई,ही लिस्ट थोडी जास्तच नाही का?” नेहाने विचारलं.
“आहेर असंच द्यायचंच असतं वहिनी माहेरून.” नताशा थोड्या ठाम आवाजात म्हणाली.

अनुराधा बाई हळू आवाजात म्हणाल्या—
“पण बाळ, आपली परिस्थिती तुला माहीत आहे. एवढं सगळं कसं जमवायचं?”
नताशा चिडून म्हणाली—
“आई, असं सांगून माझी नाक कापायची आहे का तुम्हाला सासरी?”

रमनने मध्येच म्हणायचा प्रयत्न केला,
“ताई , तू तरी थोडं समजून घे…”

“नाही रमन, जर देऊ शकत नाही, तर येऊ नका लग्नाला. पण आलात तर माझं हसू होईल असं काही करू नका. आणि लक्षात ठेवा — प्रॉपर्टीत माझा हिस्सा आहे.”

त्या शब्दांनी घरात शांतता पसरली. अनुराधा बाईंच्या डोळ्यांत पाणी आलं. पण नताशा काही ऐकायला तयार नव्हती. जाताना ती एवढंच म्हणाली —
“जर आहेर नीट देऊ शकत नसाल, तर प्रॉपर्टीचे पेपर तयार ठेवा.”


त्या दिवसानंतर अनुराधा बाई काही बोलल्या नाहीत, पण त्यांचं मन सतत बेचैन होतं. त्यांना विश्वास बसत नव्हता की, तीच नताशा जी एकेकाळी वडिलांच्या छायेत राहत होती, आज आईशी एवढ्या कठोर शब्दांत बोलेल.
वडिलांनी नताशाच्या नवऱ्याचा व्यवसाय उभा राहावा म्हणून स्वतःच्या पैशातून त्याला मदत केली होती, हे ती विसरली होती.

शेवटी लग्नाच्या तीन दिवस आधी अनुराधा बाई नताशाच्या घरी गेल्या. सगळे सासरचे लोक बसले होते. नताशा आश्चर्याने विचारते—
“आई, तु एकटीच आली ? रमन-नेहा नाही आले?”

अनुराधा बाईंनी शांतपणे उत्तर दिलं,
“बाळा, तूच सांगितलं होतंस — आहेर नीट करू शकत असाल तर या, नाहीतर प्रॉपर्टीचे पेपर तयार ठेवा. म्हणूनच मी पेपर घेऊन आलेय.”

घरात सगळ्यांचे चेहरे बदलले. नताशा घाबरून बघत राहिली.

“पण आई, हे काय बोलते तू?
“बाळा, माझ्या नावावर फक्त हे घर आहे. म्हणून विचार केला — ते मी दोघा मुलांमध्ये समान वाटून टाकते. पण त्याआधी थोडा हिशोब करु या.”

“कसला हिशोब?”
“तुझ्या वडिलांनी तुझ्या नवऱ्याला व्यवसायासाठी पाच लाख रुपये दिले होते. ते पैसे परत कर. आणि तू म्हणतेस की प्रॉपर्टीत हिस्सा हवा, तर मग जबाबदारीतही हिस्सा हवा — मी आजारी असते तेव्हा रमन एकटाच सगळं पाहतो, तू कधी आलीस का माझी विचारपूस करायला?”

नताशा थिजली. सासरच्यांसमोर तिच्या शब्दांचा भार तिच्याच डोक्यावर कोसळत होता.


“आई, तु माझं असं सगळ्यांसमोर अपमान का करते ?” नताशा डोळे पुसत म्हणाली.

अनुराधा बाई शांत पण ठाम आवाजात म्हणाल्या—
“मी नाही करत बाळा. तूच केलंस तेव्हा, जेव्हा माझ्या सूनबाईसमोर, माझ्या नातीच्या लग्नाच्या निमित्ताने, मला लाजवायचं ठरवलंस. जेव्हा तू म्हणालीस — ‘आहेर नाही दिलं तर येऊ नका.’ त्या क्षणी मी मेलीच होते मनानं.”

सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. नताशाने आईचा हात पकडला—
“आई, मला माफ कर . मी अंधळे प्रेम आणि अहंकारात सगळं विसरले.”

अनुराधा बाईंच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले.
त्या म्हणाल्या,
“चूक सगळ्यांकडून होते, पण ती कबूल करायला मोठं मन लागतं. माझी नताशा अजून माझ्या मनातलीच आहे.”

दोघी आई-मुलगी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. घरातलं वातावरण पुन्हा शांत होतं.
आणि त्या दिवशी नताशाने ठरवलं — “आहेरच वजन सोन्याचं नसतं, तर नात्याच्या सन्मानाचं असतं.”



“स्वतःच्या लोकांसाठी दिलेला सन्मान हा सर्वात मोठा आहेर असतो. पैसा संपतो, पण प्रेम आणि आदर कधी संपत नाही.


समाप्त.
©निकिता पाठक जोग
0