Login

आई आणि अर्णव भाग १

बालमन आणि बरंच काही
"अर्णव जेवायला ये बरं." राधाने अर्णवला आवाज दिला.

बराच वेळ झाला तरी अर्णव काही आला नाही.

तिने पाहिले तर अर्णव खिडकीपाशी ईवल्याश्या हाताने काहीतरी बाहेर टाकत होता.

"आरु, काय करतोय." तिने त्याच्या डोक्यावर अलगद हात फिरवत विचारले.

"आई, तू म्हणाली होती ना की पक्ष्यांना आणि प्राण्यांना खायला द्यायचे. तेच करतोय."


"हो बाळा. प्राणिमात्रांवर नेहमी दया करावी."  स्वतःचं चार वर्षाचं मूल किती छान वागत आहे. आपण दिलेले संस्कार त्याप्रमाणे वागत आहे. तिने त्याला गोड पापा दिला.

अर्णव देखील खुश झाला.

त्याच्या हातातून काहीतरी पडले.

राधाने ते पाहिले तर बदाम होते.

"आरु, हे काय ? तुला भूक लागली का?"


"मला नाही भूक लागली आई. ते पक्षी आहेत ना त्यांना मी देतोय. तू म्हणते ना आपण नेहमी हेल्दी फूड खायचं. आपल्या शरीरासाठी ते चांगलं असतं.  मी त्यांना देखील हेल्दी फूड देतोय. पक्षी देखील हेल्दी होतील." हे बोलताना त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली.


तीने बदामाचा डबा पाहिला. तर कालच एक किलो बदाम जे डब्यात भरले होते तो डबा अर्णवच्या कृपेमुळे रिकामा झाला होता.


__________________________________


"आई, मला केडबरी पाहिजे."  अर्णव.

"अजिबात नाही." आई.

अर्णवचे सगळे दात किडले होते, म्हणून आईने त्याला हल्ली गोड खायला द्यायचे बंद केले होते. आता तो ऐकत नाही म्हंटल्यावर तिने शक्कल लढवली.

"दे ना आई." अर्णव काही ऐकेना.

"अर्णव माझ्याकडे पैसे नाही."

आता आईकडे पैसे नाही. आता काय करावं बरं?

त्याला वाईट देखील वाटलं.

गार्डनमध्ये एक लहान मुलगी तिच्या बाबासोबत खेळत होती. तिच्या हातात एक केडबरी होती. ते पाहून अर्णवच्या तोंडाला पाणी सुटले.

त्या मुलीच्या वडिलांनी अर्णवला पाहिले.

अर्णव एकटक त्या केडबरीकडे पाहत होता.

तिच्या वडिलांनी त्याला बोलावले.

"बाळा, तुला पण हवी आहे का केडबरी?" 

अर्णवच्या डोळ्यात पाणी होते.

"काय झालं बाळा?"


"मला केडबरी हवी आहे; पण माझी आई बोलते अनोळखी लोकांकडून कोणत्याही वस्तू घ्यायच्या नाही. मी आईला मागितली केडबरी ;पण ती म्हणाली तिच्याकडे पैसे नाही." हे बोलायला आणि राधा यायला.


"अर्णव." राधाने त्याला आवाज दिला.


तो माणूस हसून अर्णवला बघत होता.


"अर्णव, तू त्यांना काय सांगत होता?"

"आई, तूच म्हणाली ना? की आपल्याकडे पैसे नाही."

"अर्णव, कसं बरं तुला समजावू?"

असा हा अर्णव भोळा भाबडा. आई म्हणेल तसंच वागणारा.

____________________________________________


अर्णवला शाळेत आणायला गेली तर तो तोंड पाडून उभा होता.
नक्कीच काहीतरी पराक्रम केला होता असंच वाटत होतं.

राधा गेली.


"मॅडम, तुमच्या मुलाने एका मुलाच्या चेहऱ्यावर नखाने ओरखडले आहे." त्याच्या शिक्षिका म्हणाल्या.


राधा अर्णवला पाहू लागली.


त्याने मान खाली केली.


"अर्णव का केलं असं?" राधाने विचारले.


"आई, तो माझ्या टिफिनमधील बनाना चिप्स घेत होता."


"मग घेऊ द्यायचं ना."


"हो पण त्याच्या टिफिनमध्ये चीज सँडविच होतं ते तो मला देत नव्हता आणि तूच म्हणते ना की, समोरचा जसा वागेल तसं आपण वागायचं. त्याने मला नाही शेअर केलं, तर मी पण नाही शेअर केलं.
मग मी रागात तसं केलं."

राधाला पुढे काय बोलावं सुचेना.

हा असा आपला अर्णव. राधाला तर चक्कर यायची बाकी होती.


_________________________________


"अर्णव, दारू सिगारेट फार वाईट आहे." राधा म्हणाली.

"का आई?"


"कारण व्यसन केलं की शरीर खराब होतं. वेगवगळे आजार होतात."

"ठीक आहे आई." 


अर्णवच्या डोक्यात ती गोष्ट पक्की बसली.


आता तो कोणत्याही व्यक्तीला व्यसन करतांना बघत तर तोंड वाकडं करत.


असंच एकदा राधा दुकानात सामान आणायला गेली होती.

तिथे रस्त्याच्या कडेला एक माणूस सिगारेट ओढत होता.

अर्णवने त्याला पाहिले तसे तो मोठयाने म्हणाला.

"आई, हे अंकल बघ काय करतात? आता त्यांचे बॉडी पार्टस खराब होणार. त्यांना पण आजार होणार का?"


हे त्या माणसाने ऐकले. तो ओशाळला आणि निघून गेला.
आजूबाजूची लोकं अर्णवच्या बोलण्यावर हसू लागली.

_______________________________________


खूप दिवसाने राधा आणि तिच्या मैत्रिणी राधाच्या घरी जमल्या होत्या.

सगळ्याच सुख दुःख शेअर करण्यात दंग झाल्या होत्या. कोणी सासुबद्दल सांगत होतं तर कोणी नवऱ्याबद्दल.

अर्णव खेळणी घेऊन त्याच्या मित्रांसोबत खेळत होता.


गप्पा झाल्या आणि सगळ्या निघून गेल्या.


संध्याकाळी राधाचा नवरा रमेश आला.


राधा दिवसभर काय काय झालं ते रमेशला सांगत होती.


तितक्यात अर्णव आला आणि म्हणाला.


"आई,  चुगली म्हणजे काय?"


"हे काय बोलतोय?" राधा तर एकदमच शांत बसली.

रमेश देखील लक्ष देऊन ऐकू लागला.


क्रमशः

अश्विनी ओगले.

अर्णव असं का बरं बोलला असेल? जाणून घेण्यासाठी पुढचा भाग जरूर वाचा.