आई आणि अर्णव भाग २
"आई, मलाही चुगली करायची आहे. मला सांग कशी करतात चुगली?"
"अर्णव, काहीही काय बोलतोय?"
" दुपारी आपल्या घरी जेव्हा तुझ्या फ्रेंड्स आल्या होत्या, तेव्हा लता काकी बोलत होत्या ना की मैत्रिणीसोबत चुगली करण्यात वेगळीच मजा आहे तेव्हा मला समजलं की चुगली करण्यात मज्जा आहे. नक्की ही चुगली कशी करतात? मला पण बघायची आहे मज्जा कशी मिळते?"
'देवा! हा मुलगा काय काय ऐकत असतो. लता पण ना कुठे काय बोलावं तिला काहीच कळत नाही. किती वेळा सांगितलं आहे तरी ऐकत नाही. इथे अर्णवच्या प्रश्नांची उत्तरं मला द्यावी लागतात. कधी सुधारणार ही लता देव जाणे.' ती मनातल्या मनात हे सारं बोलत होती ; पण तिचे भाव रमेश टिपत होता. त्यालाही मनातल्या मनात हसू येत होतं. अर्णवने या मैत्रिणींची चांगलीच पोल खोलली होती.
"राधा, आओ बहण चुगली करो संघटनेचे काम जोरदार सुरू आहे वाटतं? तुम्ही बायका खास या कारणासाठीच भेटता की काय? " रमेश हसतच म्हणाला.
"नाही हो असं काहीच नाही. ती तर असं सहज म्हणाली. आम्ही बायका काय घरातल्या गोष्टी बोलत नाही. आमच्याकडे बाकीचे इतर विषय असतात. तुम्हाला माझी मैत्रीण माधवी माहिती आहे? तिने स्वतःचं केकचं दुकान ओपन करायचं ठरवलं आहे. पुढच्या महिन्यात उद्घाटन आहे. तेच ती सांगत होती. छान पार्टी ठेवणार आहे. अशा बऱ्याच गोष्टी असतात आम्हा बायकांकडे . तुम्ही अर्णवचं काय ऐकताय? हा लहान आहे ह्याला काय कळतं का? काहीही बोलतो." ती स्वतःची बाजू सावरत म्हणाली.
तितक्यात अर्णव म्हणाला.
"आई, तू पण तर..."
तो पुढे काही बोलणार तितक्यात ती त्याला रुममध्ये घेऊन गेली.
"अर्णव उद्या परीक्षा आहे. अभ्यास कर. मोठी माणसं काय बोलतात याकडे लक्ष द्यायची गरज नाही. तू लहान आहेस. चल पटकन अभ्यासाला बस बरं."
"आई, मी अभ्यास करतो; पण मला सांग चुगली म्हणजे काय?"
"काही नाही. ते तुझ्यासाठी महत्त्वाचं नाही. चल अभ्यासाकडे लक्ष दे."
राधाला कळून चुकलं होतं. अर्णव खेळत जरी असला तरी त्याचे कान मात्र तीच्या बोलण्याकडे असतात.
"राधा, आता तुम्हा महिला मंडळचं खरं नाही. हे लहान जासुस तुमच्या अवतीभोवती असतात, त्यामुळे बोलताना जरा जपून बरं का? नाहीतर सासू-सुनांमध्ये महाभारत व्हायचं. " तो ही मिश्किल हसत म्हणाला.
"तुम्ही पण ना त्याचं काय ऐकताय तो काहीही बोलतो. लहान आहे तो."
ती रमेशला सांगत जरी असली तरी तिला कळून चुकलं होतं, आता ह्यापूढे अर्णवसमोर जपून बोलावे लागणार होते.
____________________________________________
गावावरून राधाची सासू येणार होती. राधाची एक्सट्रा कामं चालली होती. सासूबाईंना सगळं जिथल्या तिथं लागत. अर्णव तर आजी येणार म्हणून भलताच खुश झाला होता. आजी सोबत त्याला मनसोक्त खेळायचं होतं. आजी आली की, त्याला मस्त बाहेर फिरायला घेऊन जात, गार्डनमध्ये घेऊन जात. तो दिलखुलासपणे आजी सोबत राहायचा.
तो दिवस आला. अर्णवची आजी शामल आली होती. येताना अर्णव साठी खूप सारा खाऊ, खेळणी घेऊन आली होती.
चकचकीत घर पाहून शामल खुश झाली.
सुनेचं तोंड भरून कौतुक केलं. टापटीप आणि स्वच्छ घर.
"राधा, घर टापटीप ठेवलं आहेस हो. सुरेखच."
राधालाही खूप बरं वाटलं.
"आजी, बरं झालं तू आली." आजीच्या गळ्याभोवती हातांचा विळखा घालतो म्हणाला.
"हो का." आजी.
"तू येणार म्हणून आईने घर छान स्वच्छ केलं आणि त्यामुळे ही माझी हरवलेली फेवरेट कार जी बेडच्या मागे किती दिवस होती ती सापडली."
हातातील इवलीशी कार इथून तिथून नाचवत तो म्हणाला.
शामलला अर्णवच्या बोलण्यावर हसू आलं.
__________________________________________________
"तुम्हाला इंजेक्शन घ्यावं लागेल." असं डॉक्टर म्हणाले
राधा खूपच घाबरत होती. इंजेक्शनची भीतीच वाटायची. अर्णव शामल देखील सोबतीला होते. अर्णवला त्याच्या आईवर फार दया आली, त्यालाही माहित होतं आईला इंजेक्शनची खूप भीती वाटते. तो डॉक्टरला म्हणाला,
राधा खूपच घाबरत होती. इंजेक्शनची भीतीच वाटायची. अर्णव शामल देखील सोबतीला होते. अर्णवला त्याच्या आईवर फार दया आली, त्यालाही माहित होतं आईला इंजेक्शनची खूप भीती वाटते. तो डॉक्टरला म्हणाला,
"माझ्या आईला इंजेक्शन नका देऊ. माझ्या आजीला इंजेक्शन द्या; कारण आजी इंजेक्शनला घाबरत नाही." तो अगदी रडतच डॉक्टरांना म्हणाला. इतकासा जीव; पण आईला त्रास नको म्हणून त्याची धडपड चालली होती. डॉक्टर देखील जोरजोरात हसू लागले.
__________________________________________________
"अर्णव, तू माझ्या पर्समधील पैसे घेतलेस का?"
" हो आई तू झोपली होती, मला टेन रूपीसचा कॉइन पाहिजे होता. चित्र काढायचे होते."
" तुला किती वेळा सांगितलं आहे असं न विचारता माझ्या पर्सला हात लावायचा नाही."
"अर्णव बाळा असं न विचारता कधीच कोणाच्याही वस्तूला हात लावायचा नाही." रमेश त्याला समजावत म्हणाला.
" बाबा, मग तुम्ही झोपेत असता तेव्हा आई तुमच्या शर्टच्या खिशातील पैसे का घेते."
राधाचा चेहरा गोरा मोरा झाला होता.
ती इथे तिथे बघू लागली.
________________________________________________
क्रमशः
अर्णवचे किस्से अजून बाकी आहेत. पुढचा भाग जरूर वाचा.
क्रमशः
अर्णवचे किस्से अजून बाकी आहेत. पुढचा भाग जरूर वाचा.
