Login

आई आणि अर्णव भाग ३ अंतिम

अर्णवला पडलेले प्रश्न
आई आणि अर्णव भाग ३ शेवट

"तरी म्हंटलं माझ्या खिशातील पैसे जातात कुठे?" रमेश गालातल्या गालात हसत म्हणाला.

"त्या दिवशी मी घेतले होते पैसे. माझ्याकडे सुट्टे पैसे नव्हते. तुम्ही झोपला होता म्हणून तुम्हाला उठवलं नाही.  मी ठेवणारच होते पैसे;  पण कामाच्या गडबडीत राहून गेलं." ती स्वतःची बाजू मांडत म्हणाली.


"अर्णव, तुझ्यामुळे खूप गोष्टी कळत आहेत. नाहीतर मला काही कळलंच नसतं." तो राधाकडे तिरपा कटाक्ष टाकत म्हणाला.

"बाबा आणि त्यादिवशी ना.."  त्याला अजून खूप काही सांगायचं होतं.
तो पुढे काही बोलणार तितक्यात राधाने त्याला शांत बसवलं.

"अर्णव, तुला सांगून ठेवते यापुढे अजिबात पर्सला हात लावायचा नाही. कळलं का? नाही तर देव बाप्पा आपले  कान कापतो."


"आई, देव बाप्पा माझेच कान कापणार का? मी तर फक्त एकदाच तुझ्या पर्समधून पैसे घेतले ते पण ड्रॉइंग काढायची होती म्हणून. तू तर किती वेळा पप्पांचे पैसे  घेतले; मग बाप्पाने तुझे कान कापले नाही?"


त्याच्या ह्या निरागस प्रश्नाचे उत्तर काय द्यावं ? तिला समजत नव्हतं. पण अर्णव छोटा पॅकेट बडा धमाका असाच होता.  जसजसं कळायला लागलं होतं, तसं तो अनेक गोष्टी पटकन बोलून मोकळा होत, त्यामुळे राधाची फजिती होत असे.  कितीतरी प्रसंग घडतच राहायचे. आजही तो असं बोलून गेल्यामुळे राधाला काही कळत नव्हतं.


एक दिवस घरी पाहुणे आले होते. राधाची शाळेतील खास मैत्रीण आणि तिचा नवरा. राधाने पाहुण्यांसाठी समोसे, वेफर , असं ठेवलं होतं. त्या दोघांचं तिने खूप छान पद्धतीने स्वागत केलं.

राधा अर्णवला नेहमी सांगायची की , पाहुणे आले आणि त्यांना काही खायला दिलं तर त्यामधील काहीच खायचं नाही. ते सर्व काही पाहुण्यांसाठी असतं. ते अर्णवच्या लक्षात होतं.

बराच वेळ गप्पा मारत बसले होते. जुन्या मित्र मैत्रिणींचे किस्से राधा आणि तिची मैत्रिणी एकमेकींना सांगत होत्या. खूप वर्षानंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला होता.

अर्णव मात्र शहाण्या बाळासारखा एका ठिकाणी बसून होता. तसं त्याला आईने सांगितलं होतं.

"पाहुणे आल्यावर अजिबात मस्ती करायची नाही, त्यामुळे आईने सांगितलेल्या नियमाचे तो तंतोतंत पालन करत होता. आईने सांगितल्याप्रमाणे जर वागलं नाही, तर आई ओरडणार हे देखील त्याला माहीत होतं, त्यामुळे ओरडा खायला लागू नये, म्हणून तो आज जरा जास्तच शांत बसला होता. राधाच्या मैत्रिणीला अर्णव शांत बसलेला पाहून आश्चर्य वाटलं. इतका लहान मुलगा आणि तरीही किती तो शांत बसला होता.

तिने अर्णवला आवाज दिला आणि म्हणाली,

"अर्णव, बाळा तू पण घे."

अर्णव आईकडे बघत होता.

पुन्हा ती म्हणाली, "असा आईकडे काय पाहतोयस ? तू पण घे."


अर्णव म्हणाला "नाही मी हे नाही घेऊ शकत. आई मला म्हणाली आहे पाहुण्यांना जे देणार त्यातलं काहीच घ्यायचं नाही. हो पण तुम्ही जेव्हा आता तुमच्या घरी जाणार ना तेव्हा मला आई खाऊ देणार आहे.  तुम्ही तुमच्या घरी कधी जाणार म्हणजे मला खाऊ मिळेल."

हे ऐकून सगळेच हसायला लागले.

राधाची मैत्रीण आणि तिचा नवरा निघून गेल्यावर राधा त्याला म्हणाली,

"अर्णव, हे सगळं का बोललास तू?"


"आई, तूच तर म्हणते नेहमी खरं बोलावं. मी खोटं कुठे बोललो. खरं काय तेच सांगितलं. चल मला आता खाऊ पाहिजे. तू मला प्रॉमिस केलं होतं की, तू मला खाऊ देणार.  तुला माहित आहे ना मला समोसा किती आवडतो आणि तू सांगितल्याप्रमाणे मी किती शांत बसलो होतो. अगदी गुड बॉय सारखं. मी अजिबात आवाज केला नाही. आता तर तुला खाऊ द्यावाच लागेल."

त्याने तिच्या गालावर पापी दिली आणि डायनिंग टेबलवर जाऊन बसला. त्याच्या आवडत्या खाऊची वाट पाहत.

अर्णवच्या ह्या बोलण्यावर  तिला हसावं की रडावं काहीच कळत नव्हतं.

_________________________________________________

राधा अर्णवला शाळेत आणायला गेली होती.
अर्णवचा मित्र अथर्व त्याची आई शीतल तिची मैत्रीण होती.

राधा शीतलसोबत गप्पा मारत होती.

"काय गं  राधा आज तुला सकाळी अर्णवला शाळेत सोडायला खूप उशीर झाला."

"हो गं अर्णवला किती वेळ झालं उठवत होते; पण उठतच नव्हता. नंतर त्याची तयारी करण्यात वेळ निघून गेला. त्यामुळेच खूप उशीर झाला."

नेमकं ते अर्णवणे ऐकलं आणि  त्याच्या छोट्याशा नाकावर राग मोठा राग आला.

तो म्हणाला,

"आई, तू खोटं का बोलतेय? मी तुझ्या आधी उठलो होतो. उलट आज तू उशिरा उठली.  तू मला नेहमी सांगते खोटं बोलायचं नाही. आणि आज तू स्वतःच खोटं बोलतेय."

अर्णवने राधाची बोलतीच  बंद केली  होती.  शितलला देखील हसू आलं.

राधाने हे सर्व किस्से एका डायरीत लिहिले होते आणि जेव्हा तो वीस वर्षाचा झाला तेव्हा ती डायरी त्याला वाचायला दिली होती. अर्णवला आज ते सर्व वाचून खूप हसू येत होतं.

खरंच बालपण खूप सुंदर असतं. निरागस बालमन, खूप सारे प्रश्न आणि एक वेगळीच दुनिया. अशी होती गोड अर्णवची दुनिया.

समाप्त.

__________________________________________

कसा वाटला अर्णव छोटा पॅकेट बडा धमाका? कंमेन्टमध्ये जरूर सांगा.
अष्टपैलू लेखक.
विनोदी कथा.