आईचे लग्न भाग २

आईचे लग्न भाग २
जलद लेखन
कर्तव्य
आईचे लग्न भाग २

सुजय आपल्याला कधीच दिसणार नाही ही कल्पना सुद्धा सुवर्णा करू शकत नव्हती. तिला खूप मोठा धसका बसलेला होता. सुवर्णा सारखी आशिष कडे बघत होती तिलाही कळत होते की आपल्याला आता सावरावे लागणार आहे. परंतु वास्तव स्वीकारण्यास तिचे मन तयार होईना.

म्हणतात नां "काळ हे सर्व रोगांवरचे रामबाण औषध आहे."

हळूहळू सुवर्णा स्वतःला सावरू लागली. तिला आता आशिष साठी जगावे लागणार होते.

परंतु या घटनेने सुवर्णाला पार उध्वस्त करून टाकले होते. पूर्वीची अवखळ,चुनचुनीत सुवर्णा आता एकदम अबोल झाली होती.

दिवसामागून दिवस जात होते. आशिष चा आजच बारावीचा निकाल जाहीर झाला होता आशिषला सर्वच विषयात खूप छान गुण मिळाले होते.आशिषचे डॉ. बनण्याचे स्वप्न होते. वारंवार तसा तो आईला बोलूनही दाखवायचा.

एक दिवस आशिष सुवर्णाला म्हणाला.

"आई आता मला शिक्षणासाठी बाहेर जावे लागेल. तुला एकटीला सोडून मी कसा जाऊ?"

"अरे बाळा ,राहीन मी एकटी. तुला तुझ्या भविष्याचा विचार करावा लागेल नां?"

वरवर सुवर्णाने आशिषला समजावले.

"आशिष, आपल्याला २,३ दिवसांसाठी तुझ्या मामाकडे जायचं आहे."मामा एवढ्यात येईलचं आपल्याला घ्यायला. सुवर्णा म्हणाली.

"हो गं आई. जाऊया आपण मामाकडे. तुलाही थोडं बरं वाटेल."

दुसऱ्या दिवशी ते दोघेही मामाच्या गावी आले. आपल्या बहिणीची ही अवस्था भावांना बघवत नव्हती. दोन,तीन दिवस राहून आशिष व त्याची आई आपल्या गावी येण्यासाठी निघणार होते.

अशातच आशिषचे पेपरमधील एका बातमीने लक्ष वेधून घेतले.

"मुलाने लावून दिले आईचे दुसरे लग्न."

आशिषच्या मनात विचारचक्र सुरु झाले."मला आता शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जावे लागणार.आपल्यामागे आईचे काय होणार. यापेक्षा आपणही आपल्या आईच्या दुसऱ्या लग्नाचा विचार केला तर.....

प्रत्येक आईवडिल मुलांप्रति असलेल्या आपल्या कर्तव्याबद्दल किती जागरूक असतात.माया,ममता, वात्सल्य, कर्तव्य,प्रेम या गोष्टी भरभरून ते मुलांना देतात.अगदी कशाचीच कसर ते करत नाही. मग मुलांनीही त्याचे कर्तव्य करायलाच पाहिजे नां? आणि मी ते कर्तव्य निभावणार.

आशिषने जणू या गोष्टीचा प्रण केला. वडिलांच्या निधनाने आणि आईच्या अवस्थेने त्याला जणू अकाली प्रौढत्व आलं होतं.

दुसऱ्या दिवशी सुवर्णा व आशिष आपल्या गावी आले. परंतु आईच्या लग्नाचा विचार त्यांच्या मनातून जाईना.कसेही करून आपण आईला याबाबत विचारायचंच हे आशिषने मनाशी ठरविले.

असेच एक दिवस आपले सारे बळ एकवटून आशिषने आपल्या आईला तिच्या दुसऱ्या लग्नाबाबत विचारणा केली.

आशिषचे बोलणे ऐकून सुवर्णा खूप संतापली.

"मला सांग आशिष तुझ्या मनात हा विचार आला तरी कसा?"

पण आशिषने अत्यंत संयमाने आईला शांत केले.तिला सर्व परिस्थिती समजावून सांगितली.पण सुवर्णा काहीही ऐकण्यास तयार नव्हती.

तेव्हा आशिषने यासाठी आपल्या मामाची मदत घ्यायचे ठरविले.फोनवरच त्याने आपल्या मामाशी विचारविनिमय केला.त्याच्या मामालाही ही गोष्ट पटली.त्यांनी सुद्धा आपल्या बहिणीचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण काहीही उपयोग होत नव्हता.आता आशिष त्यांच्या पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात निघून गेला.

आता तर सुवर्णाला एक एक क्षण युगाप्रमाणे वाटू लागला. सारखा अवतीभवती राहणाऱ्या आशिषच्या आठवणीने ती अगदी सैरभैर होऊ लागली. पण...

आपल्या मुलाचे करिअरही तेवढेच महत्त्वाचे आहे. ही गोष्टही ती नजरेआड करुन शकत नव्हती.

पुढे काय होणार? सुवर्णा लग्नासाठी तयार होईल कां?हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग अवश्य वाचा.

क्रमशः

सौ. रेखा देशमुख